ठाणे (महाराष्ट्र) – श्री मलंगगडाविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्वासन ते नक्कीच पूर्ण करतील. जनतेच्या मनातील भावना लवकरच पूर्ण होतील, असे आश्वासन शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले. कल्याण तालुक्यातील श्री मलंगगडाच्या जवळच उसाटणे येथे हरिनाम सप्ताह चालू आहे. तिथे वारकर्यांना संबोधित करतांना त्यांनी हे आश्वासन दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच ‘जनभावना ओळखून लवकरच श्री मलंगगडाची मुक्तता करू’, असे आश्वासन दिले होते. त्यावर एम्.आय.एम्.चे ओवैसी यांनी विरोधी प्रतिक्रियाही दिली होती.
गेल्या अनेक वर्षांपासून मलंगगडावर अतिक्रमण !
नवनाथांपैकी ५ नाथांच्या समाध्या आणि प्रामुख्याने मच्छिंद्रनाथ यांची समाधी असलेल्या हिंदूंच्या श्री मलंगगड येथे हाजीमलंग नावाने दर्गा बांधण्यात आला आहे. येथे हिंदूंना जाण्यास, तसेच तेथे पूजा आणि आरती करण्यास मोठा विरोध होत असून गेली अनेक वर्षे हा संघर्ष चालू आहे. १३ व्या शतकात येमेनहून आलेले सुफी फकीर हाजी अब्दुल रहमान शाह मलंग उपाख्य मलंग बाबा यांची ही कबर या जागेवर बांधण्यात आली आहे. ८० च्या दशकापासून शिवसेना याविषयी लढा देत आहे. हे सूत्र न्यायालयातही गेलेले आहे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात