Menu Close

श्रीराममंदिर बाबरी ढाच्यापेक्षा कितीतरी पटींनी मोठे होते – के.के. महंमद, माजी संचालक, भारतीय पुरातत्व विभाग

के.के. महंमद

नवी देहली – भारतीय पुरातत्व विभागाचे माजी संचालक के.के. महंमद म्हणाले, ‘‘पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात सापडलेला प्रत्येक पुरावा हे श्रीराममंदिर बाबरी ढाच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे असण्याची साक्ष देत होते. मलाही श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे. यामुळे मला पुष्कळ आनंद झाला आहे. अयोध्येत हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा यांची पर्वा न करता तेथे लोकांना येतांना मी पाहिले आहे. तेव्हा मंदिर नव्हते; पण लोकांची श्रद्धा होती. हा ५०० वर्षांचा लढा होता, जो आता संपला आहे. भारतियांच्या हृदयावर तो पुष्कळ मोठा आघात होता. त्या जखमा आता भरल्या आहेत. भगवान श्रीरामाने या ऐतिहासिक आणि प्रचंड कार्यासाठी माझी निवड केली, त्याविषयी मी कृतज्ञ आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलतांना के.के. महंमद यांनी अनेक सूत्रांवर समर्पक उत्तरे दिली. त्यांतील महत्त्वाची सूत्रे खाली दिली आहे.

श्रीराममंदिर अस्तित्वात असल्याचे पुष्कळ पुरावे !

वर्ष १९७६ मध्ये पुरातत्व विभागाचे १० जणांचे पथक प्र्रा.बी.बी. लाल यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येला पोचले. येथील बाबरी ढाच्याजवळ गेल्यावर पोलिसांनी आम्हाला आत जाण्यापासून रोखले. त्यांना सांगितले की आम्ही संशोधनासाठी आलो आहोत. त्यानंतर आम्हाला आत प्रवेश देण्यात आला. आत गेल्यावर १२ खांब १२ व्या शतकातील असल्याचे दिसत होते आणि त्यांवर मंदिरांशी संबंधित पुरावे होते. त्यांवर देवतांची शिल्पेही होती; पण त्यांचे चेहरे विद्रुप होते. त्यांच्यावर कलशही कोरले होते. हा पहिला पुरावा होता. यानंतर वर्ष २००३ मध्ये डॉ. बी.आर्. मणी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उत्खननात महत्त्वाचे पुरावे सापडले. यामध्ये मंदिरात होणार्‍या अभिषेकाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी होत्या. शिलालेख सापडले, आतमध्ये ९० खांब सापडले, ज्यावर एकेकाळी एक भव्य मंदिर उभे असावे. २१६ पेक्षा अधिक टेराकोटाच्या मूर्ती सापडल्या.

नोकरी जाण्याची वेळ आली असतांनाही श्रीराममंदिराविषयी ठाम भूमिका घेणारे प्रा. महंमद !

वर्ष १९९० मध्ये इरफान हबीब, रोमिला थापर इत्यादी साम्यवादी इतिहासकारांनी वृत्तपत्रांत विधाने प्रसिद्ध केली की, अयोध्येतील बाबरी ढाच्यात उत्खननात काहीही सापडले नाही आणि तो ढाचा सपाट भूमीवर उभा आहे. ‘पुरातत्वशास्त्रज्ञ प्र्रा.बी.बी. लाल यांनाही उत्खननात काहीही आढळले नाही’, असे खोटेच सांगितले गेले. त्यामुळे ‘बाबरी ढाच्याच्या खाली मंदिर असल्याचा पुरावा आहे’, असे म्हणणे चुकीचे असल्याचा दावा या साम्यवाद्यांनी वर्तमानपत्रात केला. दुसर्‍या दिवशी प्रा. लाल यांनी वर्तमानपत्रांना मुलाखत देऊन सांगितले की, साम्यवाद्यांनी चुकीचे तथ्य प्रसिद्ध केले आहे. तेथे मंदिराचे अस्तित्व असल्याचे पुरावे मिळाले आहेत. यानंतर प्रा. लाल यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न केला गेला. सर्वजण त्यांना खोटे ठरवण्यासाठी पुढे सरसावले. त्या वेळी ‘हे सर्व चुकीचे होत आहे’, असे मला त्या वेळी वाटले. त्यानंतर मी अयोध्येतील उत्खननात सहभागी असल्याचे प्रसारमाध्यमांसमोर सांगितले. ‘तेथे मंदिराचा पुरावा सापडला आहे. प्रा. लाल यांनी सत्यच सांगितले आहे’, असे मी प्रसारमाध्यमांसमोर ठामपणे सांगितले. माझे विधान प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले. मला नोकरीवरून काढून टाकण्याची सिद्धता करण्यात आली. मला देहलीत बोलावून पुष्कळ फटकारण्यात आले; पण मी ठामपणे सांगितले की मी खोटे बोलू शकत नाही. माझी नोकरी गेली, तरी माझ्या शब्दांवर मी ठाम राहीन. त्या वेळी वरिष्ठ आय.ए.एस्. अधिकारी एच्. महादेवन् आणि मद्रास विद्यापिठाचे प्रा. के.बी. रमण यांनी मला साहाय्य केले. त्यामुळे माझी नोकरी वाचली; पण माझे गोव्यात स्थानांतर करण्यात आले.

मुसलमानांनी हिंदूंची स्थाने त्यांना परत करावीत !

मुसलमानांसाठी मक्का आणि मदिना जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच श्रीरामाचे जन्मस्थान अयोध्या, मथुरा-काशी हिंदूंसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे येथे मंदिर बांधण्यासाठी मुसलमानांनी स्वत: पुढे आले पाहिजे. ही स्थळे हिंदूंच्या स्वाधीन करा आणि सर्व वाद संपवा. श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवसापासून आपण सर्व जण नव्या उत्साहाने पुढे जाऊया. या आनंदाच्या सोहळ्यात सर्व भारतियांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महम्मद यांनी केले.

मूर्ती स्थापित असणारे ठिकाण मशीद कशी ?

वर्ष २००३ मध्ये उत्खननाच्या वेळी ११ व्या शतकातील एक शिलालेख सापडला होता.  त्यावर लिहिले होते की, हे मंदिर बालीचा वध करणार्‍या, रावणाचा वध करणार्‍या भगवान श्रीविष्णूच्या अवताराला समर्पित आहे. यावरून येथे श्रीरामाचा उल्लेख होत असल्याचे स्पष्ट झाले. श्री गणेशाच्या मूर्तीही सापडल्या होत्या. मशिदीत मूर्ती स्थापित करता येत नाही. त्यामुळे तेथे मशीद कशी असेल ?

स्त्रोत : सनातन प्रभात 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *