Menu Close

भारताला विश्वगुरु बनायचे असेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवर चालण्याविना पर्याय नाही – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप

पुणे येथे स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रा !

छायाचित्र सौजन्य : हिंदुस्थान पोस्ट

पुणे, १२ जानेवारी (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार सर्व काळात सुसंगत असे आहेत. भारताला विश्वगुरु बनायचे असेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर चालण्याविना दुसरा पर्याय नाही. आजच्या युवा पिढीला केवळ सावरकरच आदर्श असले पाहिजेत, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सचिव श्री. सुनील देवधर यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांची १४ वर्षे अंदमानातील शिक्षेनंतर येरवडा कारागृहातून ६ जानेवारी १९२४ या दिवशी सशर्त मुक्तता करण्यात आली. या घटनेला यंदाच्या ६ जानेवारी या दिवशी १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने ‘स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारक मुंबई’ आयोजित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रे’चे येथे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप

या मुक्तीयात्रेमध्ये सहस्रो लोक वाहनांसह भगवा ध्वज घेऊन सहभागी झाले होते. मुक्तीयात्रेचे सावरकर स्मारक येथे श्री. सुनील देवधर यांनी पुष्पवृष्टी करत स्वागत केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नातू श्री. रणजित सावरकर, नात विनिता जोशी, माजी आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी, सावरकरप्रेमी अभिनेते श्री. शरद पोंक्षे आदी मान्यवर मुक्तीयात्रेमध्ये सहभागी झाले होते.

या प्रसंगी अभिनेते रणदीप हुडा म्हणाले की, सावरकरांचे स्वातंत्र्ययुद्धातील योगदान, त्यांचा सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन लोकांपर्यंत पोचवला पाहिजे.

सध्याचा हिंदु समाज झोपलेलाच नसून बेशुद्धावस्थेत आहे ! – शरद पोंक्षे, अभिनेते

श्री. शरद पोंक्षे म्हणाले की, आम्ही सावरकरप्रेमी, हिंदु राष्ट्रप्रेमी आहोत. आम्ही महापुरुषांच्या जीवनातील महत्त्वाचे दिवस दणक्यात साजरे करायचे ठरवले आहे. या निमित्ताने पुढील पिढीला महापुरुषांविषयी कळेल. सध्याचा हिंदु समाज झोपलेलाच नसून बेशुद्धावस्थेत आहे. कुणीही येतो आणि काहीही बरळतो. हिंदु समाजाला जागे करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही लोकशाही पद्धतीने दिलेल्या अधिकारांचा वापर करीत आहोत आणि अशा यात्रेच्या माध्यमातून समाजाला जागे करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

स्त्रोत : सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *