Menu Close

आजच्या स्त्रीला स्वातंत्र्याची नाही, तर स्त्रीशक्ती संघटित करण्याची आवश्यकता – पू. दीदी मां साध्वी ऋतंभरा

‘राजमाता जिजाऊ जयंती’ आणि ‘स्वामी विवेकानंद जयंती’ यांच्यानिमित्त पुणे येथे कार्यक्रम !

पू. दीदी मां साध्वी ऋतंभरा

पुणे– भारतीय स्त्रीला प्राचीन काळापासून सन्मान देऊन तिला समानतेची वागणूक दिली आहे. त्रिदेवांनाही बालक बनवणारी ती ‘अनुसया’ होती. ती सर्वस्वाचे समर्पण करणारी आहे. तिची ओळख ही पुत्र, पती, कुल, कर्माने धर्मसंस्कारित होती; म्हणून तर माता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा पुत्र धर्मासाठी दिला. आजच्या स्त्रीला स्वातंत्र्याची आवश्यकता नाही, तर स्त्रीशक्ती संघटित करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पू. दीदी मां साध्वी ऋतंभरा यांनी केले. त्या ‘स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान, वानवडी’ आणि ‘माय होम इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राजमाता जिजाऊ जयंती’ आणि ‘स्वामी विवेकानंद जयंती’ यांनिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होत्या. हा कार्यक्रम १२ जानेवारी या दिवशी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी ५ वाजता पार पडला.

या वेळी उपस्थित असलेले ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’चे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे, भाजपचे नेते सुनील देवधर, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय देहलीच्या प्रथम महिला कुलगुरु डॉ. शांतीश्री धुलिपुडी पंडित यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी हिंदुत्वासाठी, तसेच गोरक्षणासाठी कार्य करणार्‍या १२ युवकांचा, तसेच सर्व क्षेत्रांतील कर्तृत्ववान अशा १०० महिलांचा सन्मान करण्यात आला.

पू. दीदी मां साध्वी ऋतंभरा पुढे म्हणाल्या की,

१. पाश्चिमात्यांनी स्त्रीला ‘पैंजण, टिकली, साडी आणि मंगळसूत्र हे बंधन आहे’, असे सांगितले. हे षड्यंत्र होते. खरेतर हीच स्त्रीची शक्तीस्थाने आणि ऊर्जास्रोत आहेत.

२. स्त्रीचे अस्तित्व तप आणि साधना यांतून निर्माण होते; म्हणून तर भारतामध्ये अनेक जिजाऊमाता निर्माण झाल्या आहेत. परस्त्रीला माता संबोधणारे होते; म्हणून तर छत्रपती शिवराय, स्वामी विवेकानंद यांसारखे महापुरुष निर्माण झाले.

३. स्त्रियांच्या केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी साक्षात् देव अवतार घेतात. युगपुरुष जन्माला येतात.

श्रीराममंदिर होते, हाच हिंदुत्वाच्या राज्याचा सूर्योदय आहे ! – स्वामी जितेंद्रानंद सरस्वती, ‘गंगा महासभा’चे सरचिटणीस

स्वामी विवेकानंद यांनी पहिल्यांदा ‘गर्व से कहो हम हिंदु है ।’ असे सांगितले. हिंदु म्हणजे हीन, दुर्बल, कर्मठ ही मानसिकता निर्माण केली गेली होती. स्वामी विवेकानंदांनी हिंदु मनाला ऊर्जा, चेतना दिली. श्रीराममंदिर हे केवळ मंदिर नाही, तर ती राष्ट्रीय एकात्मता, हिंदूंचे राष्ट्रीय मंदिर आहे. श्रीराम मंदिर होते, हाच हिंदुत्वाच्या राज्याचा सूर्योदय आहे.

स्त्रोत : सनातन प्रभात मराठी

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *