Menu Close

अपहरणकर्ते असल्याच्या संशयावरून बंगालमध्ये ३ साधूंना जमावाकडून मारहाण

पुरुलिया (बंगाल) – येथे ११ जानेवारीच्या सायंकाळी ३ साधूंना जमावाकडून मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. हे साधू बंगालच्या गंगासागर मेळ्यासाठी उत्तरप्रदेशहून आले होते. या हे साधू अपहरणकर्ते असल्याचे समजून ही मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेवरून भाजपने तृणमूल काँग्रेसवर टीका केली आहे. ‘राज्यात तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्यामुळेच साधूंवर आक्रमणे होत आहेत’, असा आरोप भाजपने केला आहे. पोलिसांनी मात्र ही घटना गैरसमजुतीतून झाली असल्याचे म्हटले आहे.

१. एका भाड्याच्या गाडीतून हे ३ साधू, एक व्यक्ती आणि तिची २ मुले, असे उत्तरप्रदेशातून गंगासागर मेळ्यासाठी आले होते. पुरुलियामध्ये त्यांनी अल्पवयीन मुलींना पत्ता विचारला. या मुलींनी साधूंना घाबरून ओरडत पळ काढला. यामुळे स्थानिक लोक तेथे जमले. त्यांना हे साधू मुलींचे अपहरण करण्यासाठी आले असल्याचा त्यांना संशय आला. त्यानंतर लोकांनी या साधूंना मारहाण केली. या वेळी साधू हात जोडून गयावया करत होते, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

(सौजन्य : TV9 Bharatvarsh)

२. जमावाने साधू ज्या गाडीतून आले होते, त्या गाडीची तोडफोड केली. या वेळी पोलिसांनी साधूंना जमावाच्या कह्यातून सोडवून पोलीस ठाण्यात नेले.

३. पोलीस अधीक्षक अभिजीत बॅनर्जी यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून आम्ही या घटनेची सखोल चौकशी करत आहोत. ज्या लोकांनी मारहाण केली, त्यांनाही कह्यात घेण्यासाठी पथक पाठवण्यात आले आहे. साधू मेळ्याला जात असतांना रस्ता चुकले होते. त्यामुळे रस्त्यात थांबून तिथून जात असलेल्या २ मुलींना त्यांनी पत्ता विचारला; मात्र साधूंच्या वेषाकडे पाहून मुली घाबरल्या आणि तिथून पळ काढू लागल्या. या साधूंनी त्यांची छेड काढली असावी किंवा ते अपहरणकर्ते असावेत, अशी स्थानिकांची समजूत झाली.

तृणमूल काँग्रेसशी संबंधित असणार्‍यांकडून साधूंना मारहाण ! – भाजपची टीका

भाजपच्या माहिती आणि तंत्रज्ञान शाखेचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, साधूंना झालेली मारहाण ही पालघर (महाराष्ट्र) येथील जमावाकडून साधूंच्या झालेल्या हत्येसारखी घटना आहे. तृणमूल काँग्रेसशी निगडित असलेल्या लोकांनी गंगासागर मेळ्याला जात असलेल्या साधूंना जबर मारहाण केली आहे.

ममता बॅनर्जी यांच्या राज्यात अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) पथकावर आक्रमण करणार्‍या आतंकवादी शाहजहा शेख याला संरक्षण मिळते आणि साधूवरही आक्रमणे होतात. बंगालमध्ये हिंदु असणे आता गुन्हा झाला आहे.

स्त्रोत : सनातन प्रभात मराठी

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *