१९ जानेवारीला देशभर होणार प्रदर्शित
नवी देहली – श्रीरामजन्मभूमीच्या ५०५ वर्षांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘शदानी फिल्म्स’कडून चित्रपट बनवण्यात आला आहे. ‘६९५’ असे या हिंदी चित्रपटाचे नाव असून तो १९ जानेवारी या दिवशी देशातील ८०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. त्यापूर्वी देहलीतील कॅनॉट प्लेस या ठिकाणी असणार्या ‘पी.व्ही.आर्. प्लाझा’ या चित्रपटगृहात मान्यवरांसाठी खेळ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ‘शदानी दरबार’ या आध्यात्मिक संस्थेचे आदरणीय युधिष्ठिर महाराज, कथाकार डॉ. मनमोहन कृष्ण, पं. राम नरेश तिवारी महाराज, विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष अधिवक्ता आलोक कुमार, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, ‘सुदर्शन टीव्ही’ वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते श्री. इंद्रेश कुमार, दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या ‘रामायण’ मालिकेत श्रीरामाची भूमिका केलेले अभिनेते श्री. अरुण गोविल आदी उपस्थित होते. या वेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
श्रीकृष्णजन्मभूमी आणि काशी विश्वनाथ मंदिर यांची मुक्ती, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा पाया रचला जाईल ! – सद्गुरु डॉ. पिंगळे
चित्रपटाविषयी सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले की, श्रीराममंदिरासाठी गेल्या ५०५ वर्षांपासून हिंदु शारीरिक, मानसिक अशा सर्व स्तरांवर संघर्ष करत आहेत. २ घंट्यांच्या या चित्रपटांमध्ये ५०५ वर्षांच्या संघर्षाचे प्रयत्न अतिशय सुरेखपणे मांडण्यात आले आहेत. चित्रपटात ज्याप्रमाणे श्रीरामजन्मभूमीवर श्रीराममंदिराच्या उभारणीसाठीचा संघर्ष दाखवण्यात आला आहे, यातून एक प्रकारे श्रीकृष्णजन्मभूमी आणि काशी विश्वनाथ मंदिर यांची मुक्ती, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा पाया रचला जाईल.
चित्रपटाच्या ‘ ६९५’ नावामागील अर्थ !
या चित्रपट निर्माते श्याम चावला आहेत. त्यांनी सांगितले की, श्रीराममंदिरासाठी ६, ९ आणि ५ क्रमांकांचे मोठे योगदान आहे. ६ डिसेंबर १९९२ या दिवशी अयोध्येत बाबरी ढाचा पाडण्यात आला, ९ नोव्हेंबर २०१९ या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय श्रीराममंदिराच्या बाजूने आला आणि त्यानंतर ५ ऑगस्ट २०२० या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान श्रीराममंदिराच्या बांधकामाचे भूमीपूजन केले.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात