अयोध्येतील राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने संदेश !
श्रीरामजन्मभूमीत श्री रामललांची मूर्ती विराजमान होत आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे. गेली ५०० वर्षे सतत हिंदूंनी अयोध्येत श्रीराममंदिर उभारण्यासाठी जो संघर्ष केला, त्याच्या पूर्तीचा हा क्षण आहे. या रामकार्यार्थ ज्या ज्या रामभक्त हिंदूंनी नि:स्वार्थपणे त्याग, बलीदान आणि धर्मदान केले, त्या सर्वांची आध्यात्मिक उन्नती होईल, याची निश्चिती बाळगा !
प्रभु श्रीराम ही संपूर्ण भारतवर्षाची आराध्य देवता आहे. अयोध्येत श्रीरामललांची मूर्तीप्रतिष्ठापना झाल्याने संपूर्ण देशाला आध्यात्मिक ऊर्जा आणि चैतन्य प्राप्त होणार आहे.
श्रीराममंदिराच्या लढ्यामुळे हिंदूंमध्ये विजिगीषू वृत्ती निर्माण होऊन ते सध्याच्या धर्मनिरपेक्ष (अधर्मी) व्यवस्थेत धार्मिक गुलामगिरीत अडकलेल्या मंदिरांच्या मुक्तीसाठी संघर्ष करू लागले आहेत. खरेतर हिंदूंच्या धार्मिक अधिकारांचा हा संघर्ष म्हणजे हिंदु राष्ट्र-स्थापनेचा संघर्ष आहे. अयोध्येतील श्रीराममंदिराच्या पुनर्उभारणीमुळे या संघर्षाला आता प्रभु श्रीरामाचे अधिष्ठान प्राप्त होणार आहे. त्यामुळे अयोध्येत श्रीरामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणे, हा एकप्रकारे भावी हिंदु राष्ट्राचा पाया आहे !
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, प्रेरणास्रोत, हिंदु जनजागृती समिती