Menu Close

कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी संघटना पंजाबवर हल्ला करण्याच्या तयारीत

nijjar_320चंदिगड : पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या सहा महिन्यानंतर गुप्तचर विभागाने कॅनडा सरकारला पत्र पाठवून त्यांच्या देशात खलिस्तानी दहशतवादी संघटना कार्यरत असल्याचा अलर्ट पाठवला आहे. गुप्तचर विभागाने पाठवलेल्या अलर्टमध्ये ब्रिटीश कोलंबियामधील मिशन सिटीमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांच्या समर्थकांकडून कॅम्प चालवले जात आहेत, जिथे पंजाबवर हल्ला करण्याची योजना आखली जात असल्याची माहिती दिली आहे.

पंजाबमधील गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार कॅनडामधील शीख हरदीप निज्जर याने खलिस्तानी दहशतवादी संघटनेच्या ऑपरेशनल हेडची जबाबदारी घेतली आहे. शीख तरुणांना भरती करण्यात येत असून पंजाबवर हल्ला करण्यासाठी त्यांना तयार केले जात आहे. हरदीप निज्जरच्या प्रत्यार्पणासाठी पंजाब सरकारने अगोदरच परराष्ट्र मंत्रालय आणि गृहमंत्रालयाकडे आपला रिपोर्ट सादर केलेला आहे.

पठाणकोट एअर बेसवर २ जानेवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत तयार करण्यात आलेल्या अहवालात निज्जरची माहिती देण्यात आली आहे. निज्जर पाकिस्तानातून शस्त्रपुरवठा करणार होता. मात्र पठाणकोट दहशतवाही हल्ल्यानंतर सीमारेषेवर असलेल्या कडक सुरक्षेमुळे आणि पंजाबमधील हाय अलर्टमुळे तो करु शकला नसल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे.

निज्जर १९९५ पासूनच कॅनडामधील पासपोर्टच्या आधारे सरे येथे राहत आहे. पंजाब सरकारने निज्जरला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. २००७ मध्ये शिंगार सिनेमागृहात झालेल्या स्फोटाप्रकरणी निज्जर वॉण्टेड आहे. लुधियानामध्ये झालेल्या या स्फोटात सहा लोकांचा मृत्यू झाला होता.

खलिस्तान दहशतवादी संघटनेचा सदस्य मनदीप सिंग याच्या अटकेमुळे ही सर्व माहिती हाती लागली आहे. लुधियानामधून दोन आठवड्यापुर्वी त्याला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना दल खालसा इंटरनॅशनलचा म्होरक्या गजिंदर सिंग आणि निज्जरला केलेल्या फोनच्या आधारे त्याला अटक करण्यात आली.

संदर्भ : लोकमत

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *