Menu Close

रामराज्यासाठी प्रार्थनेसह पुणे येथील विविध मंदिरांची स्वच्छता करण्यात धर्मप्रेमींचा पुढाकार !

श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हिंदु जनजागृती समितीचे ‘मंदिर स्वच्छता अभियान’ !

रामराज्य आणि हिंदु राष्ट्र यांची शपथ घेतांना भाविक

पुणे (महाराष्ट्र) – अयोध्येत श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभर रामराज्यासाठी प्रार्थना करण्यासह स्थानिक मंदिरांची स्वच्छता करण्याचे उपक्रम राबवण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात मंदिर स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. या वेळी स्वतः भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनीही अयोध्येतील श्रीराममंदिरात मूर्तीप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर मंदिरांची स्वच्छता करण्याचे आवाहन केले होते. या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यातही हे अभियान राबवण्यात आले. गोकवडी, आळंदेवाडी, भोर येथील विविध मंदिरे, काळेपडळ, हडपसर येथील मंदिरे, तसेच वाघळवाडी, मोईगाव, आळंदेवाडी, भोर, पिंपळखुटे येथील मंदिरे यांसह पुणे जिल्ह्यातील विविध मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. विशेष म्हणजे या उपक्रमात धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग होता. तसेच मोठ्यांसह लहान मुलेही उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाली होती. धर्मप्रेमी महिला आणि पुरुष यांनी प्रवचन अन् श्रीरामाच्या सामूहिक नामजपासाठी स्वतः घरोघरी जाऊन प्रसार केला, तसेच घरोघरी जाऊन नामपट्ट्यांचे महत्त्व सांगून वितरणही केले.

मंदिर स्वच्छता करतांना धर्मप्रेमी
मंदिर स्वच्छता करतांना धर्मप्रेमी

या मंदिरांची स्वच्छता केल्यानंतर सर्व हिंदूनी एकत्र येऊन एकत्रितपणे रामराज्य आणि हिंदु राष्ट्र यांसाठी शपथ घेतली अन् शेवटी श्रीरामाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

वैशिष्ट्यपूर्ण

१. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिवरे गावात ‘रामराज्याची म्हणजे हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. महिला आणि पुरुष अशा एकूण ३०० पेक्षा अधिक जणांनी या प्रवचनाचा लाभ घेतला. हिंदु जनजागृती समितीचे उपक्रम केवळ हिवरे गावासह आजूबाजूच्या गावांमध्ये घेण्यासाठी प्रसार करण्याचे ध्येय उपस्थित धर्मप्रेमींनी घेतले आहे. या वेळी पुरुष आणि महिला यांनी प्रवचन आणि श्रीरामाच्या सामूहिक नामजपासाठी स्वतः घरोघरी जाऊन प्रसार केला अन् अनेक नामपट्ट्यांचे वितरणही केले.

अखिल श्रीगौड ब्राह्मण समाज, पुणेचे श्री. हीरालालजी ओझा यांना विशेषांक भेट देतांना समितीचे कार्यकर्ते

२. मुरुम गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन हिंदु जनजागृती समितीचे प्रवचन व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न आणि प्रसार केला. या वेळी ३५० हून अधिक महिला आणि पुरुष यांनी या प्रवचनाचा लाभ घेतला. उपस्थित ग्रामस्थांनी धर्मशिक्षणवर्गाची मागणी केली आहे.

वाघळवाडी येथील प्रवचन

३. वाघळवाडी येथेही प्रवचनाचे नियोजन आणि प्रसार हिंदु जनजागृती समितीच्या वाघळवाडी शाखेतील धर्मप्रेमींनी केला. उपस्थित १५० महिला आणि पुरुष यांना प्रभु श्रीरामाची नामजपाची सात्त्विक नामपट्टी देण्यात आल्या. ‘वाघळवाडी गावातच आधी हिंदु राष्ट्र यावे, यासाठी सर्व समितीच्या वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करणार’, असे सर्व महिला आणि पुरुष धर्मप्रेमींनी सांगितले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *