५५० हून अधिक मंदिर विश्वस्तांचा कृतीशील संकल्प !
अमरावती (महाराष्ट्र ) : महाराष्ट्र मंदिर महासंघ, श्री देवस्थान सेवा समिती विदर्भ, श्री पिंगळादेवी संस्थान, श्री नागेश्वर महादेव संस्थान, श्री व्यंकटेश बालाजी मंदिर ट्रस्ट आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महेशभवन, अमरावती येथे आयोजित ‘महाराष्ट्र मंदिर – न्यास अधिवेशना’ला (अमरावती-विदर्भ प्रांत) ५५० हून अधिक मंदिर प्रतिनिधींच्या उपस्थितीत उत्साहात प्रारंभ झाला.
श्री महाकाली शक्तीपीठाचे पीठाधीश्वर श्री शक्ती महाराज, सनातन संस्थेचे पू. अशोक पात्रीकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि गुजरात राज्य समन्वयक, तसेच मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट, रिद्धपूर येथील यक्ष देव मठाचे अध्यक्ष उपाध्याय आम्नाय महंत आचार्य श्री यक्षदेव बाबा शास्त्री, श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग देवस्थानचे सचिव अधिवक्ता श्री. सुरेश कौदरे, व्यंकटेश बालाजी ट्रस्टचे सचिव अधिवक्ता आर्.बी. अटल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनास प्रारंभ झाला. महाराष्ट्र मंदिर महासंघाचा कार्यात्मक आढावा श्री. सुनील घनवट यांनी मांडला.
मंदिरांमधून मिळणारे धर्मशिक्षण बंद झाल्याने हिंदूंची अवस्था बिकट ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
भारत स्वतंत्र झाल्यानंतर देश धर्मनिरपेक्ष झाला. मंदिरांमधून धर्मशिक्षण देणे बंद झाल्याने हिंदूंची बिकट अवस्था झालेली आहे. देवळात गेल्यावर काय करायला पाहिजे ? देवाकडे काय मागावे ? दर्शन कसे घ्यावे ? देवाला काय अर्पण करावे ? हे ठाऊक नाही. सनातन संस्थेच्या माध्यमातून वर्ष २००५ मध्ये मंदिरांविषयी धर्मशिक्षण देण्यास प्रारंभ केला. समितीच्या माध्यमातून भारतभरामध्ये ५२७ धर्मशिक्षणवर्ग घेतले जातात. भाविकांना धर्मशिक्षण दिल्यासच मंदिरे पुन्हा सनातन धर्मप्रसाराची केंद्रे होतील !