मंगळुरू येथे एक दिवसाची मंदिर परिषद
मंगळुरू (कर्नाटक) – हिंदु धर्मरक्षणात देवस्थानांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देवस्थानांचे व्यवस्थापन शासनाच्या कह्यात गेल्यावर म्हणजे मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर मंदिर भावपूर्ण पद्धतीने नव्हे, तर शासनाच्या दृष्टीने चालवले जाते. धर्मशास्त्राचा नाश करून धर्मादाय कायद्याच्या माध्यमातून सरकार हिंदु धर्मावर राज्य करू लागले आहे. आपण आता जागृत झालो नाही, तर देवस्थानांत नमाजपठणाला प्रारंभ होईल. आपल्याला टिकून रहाण्यासाठी, आपल्या अस्तित्वासाठी एकजुटीची आणि संघटनाची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्व जण संघटितपणे लढा देऊया, असे आवाहन कटीलु क्षेत्रातील दुर्गापरमेश्वरी मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी श्री. श्रीहरि नारायण दास अस्रण्णा यांनी केले. ते २६ जानेवारी या दिवशी शहरातील श्रीनिवास कल्याण मंडप येथे आयोजित दक्षिण कन्नड जिल्हास्तरीय मंदिर परिषदेत बोलत होते. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा, रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी जितकामानंदजी, श्री. श्रीहरि नारायण दास अस्रण्णा, श्रीविष्णु मूर्ती मंदिराचे श्री. श्रीकृष्ण संपिगेताय आणि ‘कर्नाटक मंदिर-मठ आणि धार्मिक संस्थांचा महासंघ’ याचे राज्य संयोजक श्री. मोहना गौडा यांनी दीपप्रज्वलन करून या परिषदेचे उद्घाटन केले.
मंदिरांच्या विश्वस्तांना कायदेशीर मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम करण्यात आला. तसेच पुढे आपल्या परिसरातील मंदिरांशी संबंधित कामे कशी करावी, यावर गटचर्चा घेण्यात आली आणि मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता (मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली) लागू करणे, धार्मिक शिक्षण फलक लावणे आदींविषयी निर्णय घेण्यात आले.
देवस्थानांकडून संस्कृतीरक्षणही झाले पाहिजे ! – जितकामानंदजी
देवस्थानांना केवळ पूजेपुरते मर्यादित न ठेवता संस्कृतीचे रक्षणही झाले पाहिजे. देवस्थानांतून धर्म आणि परंपरा यांचे शिक्षण दिले गेले पाहिजे. तशा कार्यक्रमांचे नियोजन केले पाहिजे. उदाहरणार्थ भगवद्गीता शिकवणे, बालकाश्रम चालवून तेथे वेदाध्ययन चालू केले पाहिजे. पारंपरिक वाद्ये वाजवणे शिकवले पाहिजे. याद्वारे संस्कृतीचे संरक्षण होऊ शकणार आहे. एवढेच नव्हे, तर आजूबाजूच्या परिसरातील लोकांसाठी धर्मशिक्षणाच्या कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशी माझी विनंती आहे.
देवस्थाने सुदृढ आणि सशक्त झाली, तर धर्म, राष्ट्र आणि समाज ही सुदृढ, सशक्त होईल ! – पू. रमानंद गौडा
सनातन धर्मात देवस्थाने ही अत्यंत पवित्र स्थाने आहेत. देवस्थाने ही देवतांचा निवास असलेली अत्यंत चैतन्यमय क्षेत्रे आहेत. ती हिंदु धर्माचा आधारस्तंभ आहेत. देवस्थाने ही धर्माचा प्राण आहेत आणि धर्म राष्ट्राचा प्राण आहे. राष्ट्र हा समाजाचा आत्मा आहे. म्हणून देवस्थाने सुदृढ राहिली, तर धर्म, राष्ट्र आणि समाज सुदृढ राहील.
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील १०० हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा मंदिरांचा निर्णय ! – मोहना गौडा
मंदिरे ही हिंदु धर्मातील पवित्र स्थाने आहेत. आज भाविक पाश्चात्त्य पोशाख घालून मंदिरात प्रवेश करतात. त्यामुळे मंदिरांचे पावित्र्य नष्ट होत आहे. त्यासाठी दक्षिण कन्नड जिल्ह्यातील १०० हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचे तेथील व्यवस्थापकांनी स्वेच्छेने मान्य केले आहे.
स्रोत : दैनिक सनातन प्रभात