Menu Close

प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर श्री रामललाच्या मूर्तीचे भाव पूर्णपणे पालटले !

शिल्पकार अरुण योगीराज यांनी सांगितली अनुभूती !

श्री रामलला

नवी देहली – श्रीराममंदिरात श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर श्री रामलला (श्रीरामाचे बालक रूप) पूर्णपणे वेगळा दिसत होता. मला जाणवले की, हे माझे काम नाही. ‘अलंकरण’ (अलंकार घालणे) विधीनंतर श्री रामललाचे रूप पूर्णपणे पालटले. ज्या वेळी मूर्ती निर्माण झाली, त्या वेळेस रूप वेगळे होते आणि आता मंदिराच्या गाभार्‍यात प्राणप्रतिष्ठा झाल्यावर श्री रामललाचे रूप वेगळे होते. दोन्ही रूपे (प्रतिष्ठापनेच्या आधी आणि नंतर) पुष्कळ वेगळी दिसतात. देवाने वेगवेगळी रूपे धारण केली आहेत, अशी अनुभूती श्री रामललाची मूर्ती साकारणारे शिल्पकार श्री. अरुण योगीराज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितली.

श्री. अरुण योगीराज यांनी श्री रामललाच्या मूर्तीच्या संदर्भात सांगितलेली सूत्रे !

श्री. अरुण योगीराज

मी माझ्या भावना शब्दांत व्यक्त करू शकत नाही !

हे माझ्या पूर्वजांच्या ३०० वर्षांच्या तपश्‍चर्येचे फळ आहे. कदाचित् देवाने मला याच हेतूने पृथ्वीवर पाठवले असावे. या जन्मी प्रभु श्री रामललाची मूर्ती घडवावी, हे माझ्या नशिबात होते. मी सध्या कोणत्या भावनांमधून जात आहे, ते मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.

आमचे घराणे ३०० वर्षांपासून मूर्ती घडवत आहे !

आमचे घराणे शिल्पकारांचेच आहे. माझ्या घरात ३०० वर्षांपासून दगडात मूर्ती कोरल्या जातात. मूर्तीकार म्हणून ही माझी पाचवी पिढी आहे. माझे वडील हेच माझे गुरु आहेत. श्रीरामाच्या कृपेनेच मला श्री रामललाची मूर्ती घडवण्याची सेवा मिळाली. आता देवानेच सांगितले, ‘या आणि माझी मूर्ती घडवा.’ हा अनुभव पुष्कळच सुंदर आणि मन प्रसन्न करणारा होता.

श्री रामलला बालक रूपात दिसावे, यासाठी मुलांसमवेत बराच वेळ देऊन त्यांचे निरीक्षण केले !

श्री रामललाची मूर्ती बनवतांना प्रतिदिन मी लोकांच्या भावनांचा विचार केला. ‘प्रभु रामलला मला बालक रूपात आशीर्वाद देतांना दिसत आहेत’, असे मी अनुभवण्याचा प्रयत्न केला. ५ वर्षांच्या रामाची मूर्ती साकारणे, हे खरोखरच आव्हानात्मक होते. खरे तर दगडात एखादा चेहरा कोरायचा असेल, तर मी २-३ घंट्यांत तो कोरू शकतो; मात्र रामललाच्या मूर्तीचे घडवणे वेगळे होते. आम्ही सर्वांत आधी ५ वर्षांच्या मुलांची माहिती मिळवली. मी लहान मुलांची छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर पाहिली होती. मी १ सहस्र छायाचित्रे संरक्षित करून ठेवली होती. श्री रामललाच्या डोळ्यात श्रद्धा, भक्ती आणि भाव यांची भावना दिसून यावी, यासाठी मी मुलांसमवेत बराच वेळ घालवला. लहान मुले हसल्यावर त्यांच्या डोळ्यातील चमक समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या गालावर येणारे उभार जाणून घेतले. त्या आधारावर मूर्तीवर शेवटचे स्वरूप देण्यात आले आहे.

५ वर्षांच्या मुलांचे चेहरे मनात आणि डोक्यात आणून मूर्ती घडवत गेलो !

जेव्हा मूर्तीच्या चेहर्‍यावर काम करायचे असते, त्या मूर्तीच्या चेहर्‍यावर भाव आणायचे असतात, तेव्हा सुधारणा करण्याची संधी कमी असते. त्यासाठी ज्या शिळेत मूर्ती घडवत आहोत, त्या शिळेसमवेत अधिक काळ रहाणे आवश्यकच असते. मी माझ्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करून होतो. दुसर्‍या दिवशी काय करायचे आहे ? याचा अभ्यास आदल्या दिवशीच करायचो. ५ वर्षांच्या मुलांचे चेहरे मनात आणि डोक्यात आणून मूर्ती घडवत गेलो. त्यातूनच श्रीरामाच्या चेहर्‍यावर निरागस हास्य निर्माण झाले.

७ मास दिवसरात्र प्रभु श्रीरामाचाच विचार होता !

गेल्या ७ मासांपासून मी श्री रामललाची मूर्ती कृष्ण शिळेत कोरत होतो. दिवसरात्र मनात हाच विचार येत होता, ‘संपूर्ण देशाला प्रभु श्रीरामाचे दर्शन मी घडवलेल्या मूर्तीत कसे घडेल ?’ देवाचा आशीर्वाद होता; म्हणूनच मी मूर्ती घडवू शकलो.

‘मूर्ती लोकांना आवडेल कि नाही ?’, असे वाटायचे !

मला एक मुलगा आणि मुलगी आहे. माझी मुलगी ७ वर्षांची आहे. तिला मी विचारायचो, ‘बेटा ही मूर्ती कशी दिसते?’, तर ती म्हणायची, ‘लहान मुलासारखीच दिसत आहे.’ मला मूर्ती घडवतांना केवळ इतकेच वाटायचे की, ही मूर्ती लोकांना आवडेल कि नाही ? मात्र लोकांना, सगळ्या भारतियांना ही मूर्ती आवडली. त्यांनी मनोभावे या मूर्तीला नमस्कार केला, ही माझ्यासाठी प्रचंड समाधान देणारी गोष्ट आहे.

मूर्ती बनवतांना प्रतिदिन येत होते एक माकड !

जेव्हा मी ही मूर्ती घडवत होतो, तेव्हा प्रतिदिन दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास एक माकड तेथे येऊन बसायचे. काही दिवस थंडीचे होते; म्हणून आम्ही मूर्तीशाळेचे दार लावून घेतल्यावर बाहेर आलेल्या माकडाने दार वाजवले. मी जेव्हा ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे सचिव श्री. चंपत राय यांना ही गोष्ट सांगितली, तेव्हा ते म्हणाले, ‘प्रत्यक्ष हनुमानजींनाच बघायचे असेल की, श्री रामललाची मूर्ती कशी घडत आहे ?’ मी जेव्हा झोपण्यासाठी डोळे बंद करायचो, तेव्हाही मला मूर्तीच समोर दिसत होती.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *