Menu Close

ज्ञानवापीमध्ये हिंदूंना पुन्हा पूजा करण्याची अनुमती !

  • वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाचा आदेश !

  • वर्ष १९९३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी तोंडी आदेश देऊन बंद केली होती पूजा !

  • गेली ३० वर्षे केवळ सरकारच्या तोंडी आदेशाने बंद झालेली पूजा पुन्हा चालू करण्यासाठी हिंदूंना न्यायालयात जावे लागणे, हे नंतरच्या सरकारांना लज्जास्पदच होय ! नंतरच्या सरकारांनी तोंडी आदेश देऊन ही पूजा पुन्हा का चालू केली नाही ? असा प्रश्‍न प्रत्येक हिंदूच्या मनात उपस्थित होतो ! -संपादक 

श्री. नीलेश कुलकर्णी, विशेष प्रतिनिधी, वाराणसी, उत्तरप्रदेश

पहिल्या ओळीत डावीकडून याचिकाकर्त्या सीता साहू, रेखा पाठक, मंजू व्यास, अधिवक्ता विष्णु शंकर जैन, अधिवक्ता सुभाष चतुर्वेदी, अधिवक्ता दीपक सिंह आणि श्री. सोहनलाल

वाराणसी (उत्तर प्रदेश) – ज्ञानवापीच्या ‘व्यास’ तळघरामध्ये हिंदूंना नियमित पूजा करण्याची अनुमती जिल्हा न्यायालयाने दिली आहे. या निर्णयामुळे आता प्रत्येक हिंदु या तळघरात जाऊन दर्शन आणि पूजा करू शकणार आहे. वर्ष १९९३ च्या पूर्वी येथे नियमित पूजा केली जात होती; मात्र तत्कालीन सरकारने यावर बंदी घातली होती. हिंदु पक्षाकडून आता पूजा करण्याची अनुमती मिळण्याची मागणी करण्यात आली होती. पुढील ७ दिवसांत हिंदूंना पूजा करण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याचा आदेशही न्यायालयाने वाराणसीच्या जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सध्याच्या काशी विश्‍वनाथ मंदिराच्या आवारात असलेल्या नंदीच्या समोरून ज्ञानवापीच्या व्यास तळघराकडे जाणारा मार्ग निर्माण करण्यात येणार आहे. सध्या येथे लोखंडी कुंपण घालण्यात आलेले आहे. ‘काशी विश्‍वनाथ ट्रस्ट’ अंतर्गत तळघरात पूजा केली जाणार आहे. ज्ञानवापी येथे मंदिर पाडून मशीद बांधण्यात आली होती, याचे पुरावे पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणातून उघड झाल्याचे त्याच्या अहवालातून काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. त्यानंतर आता पूजा करण्याची अनुमती मिळाल्याने हिंदूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना अधिवक्ता विष्णु शंकर जैन

हिंदु पक्षकारांचे अधिवक्ते विष्णु शंकर जैन यांनी सांगितले की, हिंदूंचे स्वप्न पूर्ण झाले आहे. व्यास कुटुंबीय आता तळघरात पूजा करणार आहेत. आम्ही पूजा करण्याची अनुमती मागितली होती. सोमनाथ व्यास यांचे कुटुंब वर्ष १९९३ पर्यंत तळघरात पूजा करत होते. वर्ष १९९३ नंतर तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या सरकारच्या तोंडी आदेशावरून तळघरातील पूजा बंद करण्यात आली. या संदर्भातील कोणताही लिखित आदेश अस्तित्वात नाही. न्यायाधीश के.एम्. पांडे यांनी १ फेब्रुवारी १९८६ या दिवशी श्रीरामजन्मभूमीवरील श्रीराममंदिराचे टाळे उघडण्याचा निर्णय दिला होता. आजच्या निर्णयाची तुलना आम्ही न्यायाधीश पांडे यांच्या निर्णयाशी करत आहोत. वाराणसी जिल्हा न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक असा आहे. याआधी सरकारांनी सत्तेचा दुरूपयोग करून हिंदु समाजाची पूजा रोखली होती, त्याला आज न्यायालयाने खोडून काढले आहे. यापुढे आता वजूखान्याचे (नमाजपठण करण्यापूर्वी हात-पाय धुण्याच्या जागेचे) सर्वेक्षण करणे, हे आमचे लक्ष्य असेल.

वाराणसी जिल्हा प्रशासनाकडे ज्ञानवापीचे नियंत्रण

वाराणसी जिल्हा प्रशासनाने २४ जानेवारी या दिवशी ज्ञानवापीच्या आवारातील दक्षिणेकडे असलेल्या तळघराचे नियंत्रण घेतले होते. आचार्य वेद व्यास पीठ मंदिराचे मुख्य पुजारी शैलेंद्र कुमार पाठक यांनी यासंबंधी खटला प्रविष्ट (दाखल) केला होता. त्यानंतर वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापीच्या दक्षिणेकडील तळघराचे नियंत्रण वाराणसी जिल्हा दंडाधिकार्‍यांकडे दिले होते.

निवृत्त होण्यापूर्वी न्यायाधीश ए.के. विश्‍वेश यांचा शेवटचा आदेश !

जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश ए.के. विश्‍वेश यांनी पूजेची अनुमती देणारा आदेश दिला. विशेष म्हणजे न्यायाधीश विश्‍वेश यांचा आज (३१ जानेवारी) जिल्हा न्यायालयातील कामकाजाचा शेवटचा दिवस होता. त्यांचा कार्यकाल आज समाप्त होऊन ते निवृत्त झाले आहेत.

मुसलमान पक्ष जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयाला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे त्यांनी घोषित केले आहे.

ज्ञानवापी प्रकरणातील अधिवक्ते आणि याचिकाकर्ते यांच्याशी ‘सनातन प्रभात’च्या विशेष प्रतिनिधींनी साधला संवाद !

हे सर्व बाबा विश्‍वनाथच करत असून आम्ही केवळ निमित्तमात्र ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

१ फेब्रुवारी १९८६ या दिवशी न्यायमूर्ती के. एम्. पांडे यांनी ज्याप्रकारे अयोध्येतील श्रीराममंदिराचे कुलूप उघडून तेथे पूजा करण्याची अनुमती हिंदूंना दिली होती, त्याप्रकारेच  ज्ञानवापीच्या संदर्भात दिलेल्या निर्णयाकडे पहायला हवे. ज्ञानवापी प्रकरणाच्या संदर्भात हा मैलाचा दगड आहे. हे सर्व बाबा विश्‍वनाथच करवून घेत आहेत. आम्ही सर्व केवळ निमित्तमात्र आहोत. राज्यघटनेतील कलम २५ च्या ‘धर्मस्वातंत्र्या’च्या अधिकाराच्या अंतर्गत हिंदूंना तेथे पूजा करण्याची अनुमती मिळणार आहे.

हिंदु समाजाने आज कथित ज्ञानवापी मशिदीच्या आत प्रवेश केला आहे ! – अधिवक्ता मदन मोहन यादव

हा हिंदूंचा ऐतिहासिक विजय आहे. गेल्या ३० वर्षांपासून हिंदूंना पूजा करण्यापासून जी मनाई करण्यात आली होती, ती रहित करण्यात आली आहे. आज न्यायालयाच्या या आदेशामुळे हिंदु समाजाने आज कथित ज्ञानवापी मशिदीच्या आत प्रवेश केला आहे.

शृंगार गौरीला शोधण्यास गेलो होतो, तर आम्हाला साक्षात् शिवच भेटले ! – याचिकाकर्त्या मंजू व्यास

तलवारीच्या जोरावर आमच्या पूजास्थळांना नष्ट करण्यात आले होते. आज आम्ही कायद्याच्या आधारे विजय प्राप्त केला आहे. आम्ही ज्ञानवापीतील शृंगार गौरी देवीच्या मंदिराची पूजा करण्याची अनुमती मागितली होती. तिला शोधण्यासाठी गेलो होतो; पण आम्हाला आज साक्षात् शिवच भेटले !


सनातनी हिंदूंचाच नाही, तर संपूर्ण विश्‍वाचा विजय ! – याचिकाकर्त्या सीता साहू

आजचा विजय हा सनातन आणि सत्य यांचा विजय आहे. सर्वांचे अभिनंदन ! नंदीची वर्षांपासूनची प्रतीक्षा आता पूर्ण झाली आहे. हा केवळ सनातनी हिंदूंचाच नाही, तर संपूर्ण विश्‍वाचा विजय आहे; कारण आज सत्य जिंकले आहे.

श्रीराम विराजमान झाले आणि त्यांनी त्यांच्या आराध्याचा मार्ग प्रशस्त केला ! – श्री महंत शिवप्रसाद पांडे लिंगिया महाराज, आदि विश्‍वेश्‍वर ज्योतिर्लिंग, ज्ञानवापी

आज कोट्यवधी हिंदूंच्या विजयपर्वाचा हा दिवस आहे. भगवान राम विराजमान झाले आणि त्यांनी त्यांच्या आराध्याचा मार्ग प्रशस्त करून दिला !

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *