मंदिरांशी संबंधित विविध विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन !
सोमेश्वर (जिल्हा पुणे, महाराष्ट्र) – मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ अन् मंदिरांचा विकास यांविषयी मंदिर विश्वस्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बारामती येथील श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे नुकत्याच आयोजित केलेल्या बैठकीत पुरंदर, हवेली आणि पुणे शहर पंचक्रोशीतील मंदिर विश्वस्त बैठकीस उपस्थित होते. ‘श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट’च्या वतीने बैठकीचे नियोजन केले होते.
मंदिरांतील पावित्र्य जपले जावे, यांसाठी दर्शनासाठी येतांना वस्र पेहराव कसा असावा ? देवस्थानच्या माध्यमातून भाविकांसाठी कशा सोयीसुविधा असाव्यात ? मंदिराने वेगवेगळ्या योजना आखून मंदिराचे उत्पन्न कसे वाढवावे ? या संदर्भात चर्चा आणि मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. पुणे जिल्ह्यातील मंदिरांचे प्रतिनिधित्व करणारे मंदिर महासंघाचे पुणे विभागाचे ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज यांनी मागील बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील एकूण ३४ मंदिरांमध्ये वस्रसंहिता या महिन्याअखेरीस लागू होणार यासंदर्भात त्यांनी माहिती दिली. पू. रामनाथ येवले महाराज यांनी मंदिरांचे उत्पन्न वाढवण्याविषयी काय करू शकतो ? याविषयी मार्गदर्शन केले.
विविध विषयांवरील मान्यवरांचे मार्गदर्शन !
१. पू. येवले महाराज म्हणाले की, मंदिराच्या ‘ट्रस्ट’वर असणारी मंडळी ही सात्त्विक असायला हवीत, देवाशी सुसंगत आचरण करणारी असायला हवी. तसेच मंदिरांची संपर्क यंत्रणा वाढवायला हवी आणि त्यातून नवीन उद्योग तरुणांना देऊन त्यातून मंदिरात काही प्रमाणात उत्पन्न मिळू शकेल.
२. हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी मंदिर सरकारीकरणाच्या माध्यमातून होत असलेला भ्रष्टाचार, पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या व्यवस्थापनातील दागिन्यांच्या नोंदी संदर्भातील आनागोंदीविषयी सासवड येथे झालेल्या आंदोलनाविषयी आणि श्री क्षेत्र बाळूमामा मंदिर येथे झालेला भ्रष्टाचार अन् त्यासाठी नियुक्त करण्यात आलेला सरकारी अधिकारी यासंदर्भात माहिती दिली. मंदिर महासंघाचे वस्रसंहिता हे एकच ध्येय नव्हे, तर मंदिरातील आपापसांतील समन्वय होणे, हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून दिली.
बैठकीमधील महत्त्वपूर्ण सूत्रे !
१. पू. रामनाथ येवले महाराज यांनी मंदिर विश्वस्तांनी मंदिराचे उत्पन्न वाढावे आणि या उत्पन्नाच्या माध्यमातून मंदिर, गाव आणि समाजाचा विकास होण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत, असे सांगितले.
२. मंदिरांचे पावित्र्य राखले जावे, यासाठी पुढील काही दिवसांत सर्व मंदिरांमध्ये वस्रसंहितेचा ‘फ्लेक्स’ लावणार, असा ठराव सर्व मंदिर विश्वस्तांनी एक मताने संमत केला.
३. लहान-मोठ्या मंदिरांचे एकीकरण करून मंदिरांच्या, तसेच मंदिर पुरोहित, विश्वस्त यांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी आणि मंदिरात दर्शनासाठी येणार्या भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मंदिर महासंघ प्रयत्न करणार आहे, असे या वेळी सांगितले.
४. वस्रसंहिता फ्लेक्स समवेत वस्रसंहिता का हवी ? याचे उत्तर देणारा फ्लेक्ससुद्धा लावूयात, असे सासवड येथील श्री भैरवनाथ देवस्थानचे मुख्य पुजारी श्री. मोहन काका भैरवकर यांनी सुचवले.
५. सोमेश्वर महादेव मंदिराचे विश्वस्त श्री. मोहनकाका भांडवलकर यांनी सर्वांचे स्वागत करून आभार व्यक्त केले आणि सांगितले की, सोमेश्वर महादेव मंदिराचे आम्ही सर्व विश्वस्त मंदिर महासंघाच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करू.
६. अधिवक्ता मंगेश जेजुरीकर हे खंडोबा मंदिर कडेपठार, जेजुरी गडाचे पुरोहित आहेत. त्यांनी ‘उपस्थित मंदिर विश्वस्तांना मंदिरांच्या संदर्भातील न्यायालयीन साहाय्य करू आणि मंदिरांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू’, असे सांगितले.