Menu Close

मंदिरांच्या रक्षणासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा लांजा तालुक्यातील मंदिर विश्वस्तांचा निर्धार !

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मंदिर विश्वस्त बैठक

डावीकडून सर्वश्री सुनील सहस्रबुद्धे, संजय जोशी, विनय पानवळकर, विनोद गादीकर आणि उदय केळुसकर

लांजा (महाराष्ट्र)– मंदिरांचे सरकारीकरण होणार नाही याची दक्षता घेण्यासह मंदिरांचे पावित्र्य अबाधित राखून मंदिरांच्या रक्षणासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार लांजा तालुक्यातील मंदिर विश्वस्तांनी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने लांजातील श्री बसवेश्वर सदन येथे अलीकडेच झालेल्या बैठकीत केला. या बैठकीला २० मंदिरांचे ४० मंदिर विश्वस्त उपस्थित होते.

बैठकीचे सूत्रसंचलन श्री. चंद्रशेखर गुडेकर यांनी, तर आभारप्रदर्शन श्री. उदय केळुस्कर यांनी केले. यावेळी सर्वश्री श्रीराम करंबेळे, जयेश शेट्ये, अनिल मांडवकर, डॉ. समीर घोरपडे, भैरूलाल भंडारी आदी उपस्थित होते.

मंदिर संस्कृती रक्षणासाठी संघटनात्मक भूमिका आवश्यक ! – विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती

आज सर्वच क्षेत्रात संघटन आहे. ज्या मंदिरांमुळे गाव आणि समाज संघटित आहे, सामाजिक ऐक्य टिकून आहे, त्या मंदिरांचेही संघटन होणे आवश्यक आहे. मंदिरांचे संघटन नसल्यामुळे अनेक समस्यांना मंदिरांना एकट्याने लढून सामोरे जावे लागते. हेच लढे जर संघटितपणे दिले, तर निश्चितच शासन दरबारी याची गांभीर्याने दखल घ्यावी लागेल.

युवा पिढीला मंदिर संस्कृतीकडे वळवणे आवश्यक !- सुनील सहस्रबुद्धे, महाराष्ट्र मंदिर महासंघ

संपूर्ण जगात केवळ भारतामध्ये युवा पिढीच्या संख्येचे प्रमाण जास्त आहे. हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी युवा पिढीवर धार्मिक संस्कार होणे आवश्यक आहे. मंदिरांमधून उत्सवांच्या वेळी देवतांचे नामसंकीर्तन करत गोफ विणणे, एक्का आदी जुन्या रुढी, प्रथा, परंपरा यांचे पुनरुज्जीवन केल्यास युवा पिढी हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्यास उद्युक्त होऊ शकेल.

मंदिरे ही धर्मशिक्षण मिळण्याचा उत्तम स्रोत बनू शकतात !- विनोद गादीकर,हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्मावर होणारे विविध आघात रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी धर्मशिक्षणवर्ग, धार्मिक ग्रंथ उपलब्ध करणे यांसारखे उपक्रम मंदिरांमधून चालू करू शकतो.

आदर्श सुव्यवस्थापनामुळे मंदिरे स्वयंपूर्ण होतील ! –  संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती

मंदिरांची स्वच्छता, पाय धुणे, पिण्याचे पाणी आदी सोयी, उत्सव आणि यात्रांच्या वेळी सुलभ दर्शन, मंदिर विश्वस्त आणि पुजारी यांमधील चांगला समन्वय इत्यादींचे सुव्यवस्थापन केल्यास मंदिरांकडे भाविकांचा ओघ वाढून मंदिरे स्वयंपूर्ण होऊ शकतील.

मंदिर विश्वस्तांचे अभिप्राय

१. श्री. प्रकाश कुंभार, श्री. अनंत साळवी (संचालक), श्री. विलास गांधी (कार्यवाह) श्री जुगाई, पौलतेश्वर मंदिर, लांजा – मंदिरांची चांगली देखभाल व्हावी यांसाठी मंदिरे  विश्वस्तांच्याच ताब्यात असली पाहिजेत. सातबारा उतार्‍यावर देवस्थानाचे नाव हवे.

२. श्री. संतोष लिंगायत, पुजारी, श्री जुगाई, पौलतेश्वर मंदिर, लांजा – मंदिरांच्या संघटनासाठी आम्ही सहभाग घेऊ.

३. श्री. विजय कुरूप आणि श्री. विठोबा लांजेकर, मानकरी, लांजा शहरातील सर्व मंदिरे – धर्म आणि मंदिरे संरक्षणासाठी हाती घेतलेले ही चळवळ अत्यंत स्तुत्य आहे.

४. श्री नितीन शेट्ये, देवस्थान प्रमुख, श्री भगवती मंदिर, लांजा आणि श्री. ओंकार शिंदे, श्री. संजय शिंदे, कार्यवाह, श्री दत्त भवानी मंदिर, लांजा, प्रदीप हर्चेकर, भक्त – महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संघटित प्रयत्नाने चालू असलेले मंदिरे आणि धर्म रक्षणाचे कार्य कौतुकास्पद आहे.

५. श्री. सुभाष मसणे, मानकरी, श्री केदारलिंग, महादोबा, आदिष्टीमाता मंदिर पन्हळे-आनंदगाव – पूर्वापार चालत आलेल्या गावातील रूढी, परंपरांचे रक्षण व्हावे, तसेच मानकरी आणि पुजारी यांच्यामध्ये चांगला समन्वय व्हावा, या दृष्टीने महाराष्ट्र मंदिर महासंघाने पुढाकार घ्यावा.

६. श्री. सचिन कदम, गोरक्षा प्रमुख, बजरंग दल, लांजा – मंदिरांचे सरकारीकरण थांबवण्यासाठी नक्की प्रयत्न करू. यासाठी माझ्यासोबत जेवढे जोडता येतील त्यांना जोडण्याचा प्रयत्न करीन.

बैठकीत उपस्थित असलेल्या विश्वस्तांची मंदिरे –

लांजा शहरातील श्री राघोबा मंदिर, श्री सिद्ध भैरीनाथ मठ, श्री जुगाई, पौलतेश्वर मंदिर, श्री गणपति मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, श्री जांगलदेव मंदिर, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, श्रीराम मंदिर, श्री भगवती मंदिर, श्री बसवेश्वर सदन, श्री केदारलिंग, आदिष्टी मंदिर, श्री नवलाई जुगाई मंदिर, श्री चव्हाटा मंदिर, श्री जाकादेवी मंदिर, श्री दत्त भवानी मंदिर, धुंदरे येथील श्री वांझोदेवी मंदिर, कोलधे येथील श्री कालिका मंदिर, बेनीखुर्द येथील श्री कालभैरव योगेश्वरी मंदिर, कुवे येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर, पन्हळे-आनंदगाव येथील श्री केदारलिंग, म्हादोबा, आदिष्टीमाता मंदिर

विशेष :

  • उपस्थित सर्व २० मंदिरांच्या विश्वस्तांनी ‘मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करू’, असे सांगितले.
  • मंदिरामधून धर्मशिक्षण वर्ग सुरू करणे, धर्माचरणाचे प्रशिक्षण देणे, धर्म जागृतीपर व्याख्याने ठेवणे, धर्म वाचनालय चालू करणे आदी उपक्रम सुरू करण्यास काही मंदिर विश्वस्तांनी सहमती दर्शवली.
  • दर महिन्याला लांजा येथे मंदिर विश्वस्तांची बैठक घेण्याचे ठरले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *