Menu Close

पुणे विद्यापिठात नाटकातून प्रभु श्रीरामाचा अवमान करणार्‍या कलाकार विद्यार्थ्यांना अभाविपकडून चोप !

  • तक्रारीनंतर पोलिसांकडून विभागप्रमुखासह ६ विद्यार्थ्यांना अटक

  • सीतामातेची भूमिका करणारा कलाकार शिव्या देतांना आणि सिगारेट ओढतांना दाखवून अक्षम्य विडंबन !

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुण्यात कलेच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांचा अपमान करणे लज्जास्पद आहे. देवतांचे विडंबन करून विद्यार्थ्यांची दिशाभूल करणार्‍या या नाटकाचे आयोजक आणि संबंधित दोषी यांवर कठोर कारवाई करावी, तरच वारंवार घडणार्‍या अशा घटना थांबू शकतील ! -संपादक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरु यांना निवेदन देतांना पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते

पुणे (महाराष्ट्र) – पुणे विद्यापिठातील ‘ललित कला मंचा’ने २ फेब्रुवारीला आयोजित केलेल्या एका नाटकात सीतामातेची भूमिका करणारा पुरुष कलाकार शिव्या देतांना आणि सिगारेट ओढतांना दाखवला आहे. तसेच यामध्ये प्रभु श्रीराम आणि सीतामाता यांची भूमिका विदूषकाप्रमाणे दाखवण्यात आली आहे. नाटक चालू असतांना देवतांचा अपमान सहन न झाल्याने अभाविपच्या कार्यकर्त्यांनी हे आक्षेपार्ह नाटक बंद पाडले. (देवतांचे विडंबन रोखणार्‍या अभाविपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! – संपादक) तसेच नाटकात रामायणातील प्रसंग चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी नाटकातील कलाकारांना चोप दिला. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ‘ललित कला केंद्रा’चा विद्यार्थी असलेल्या भावेष राजेंद्र नावाच्या विद्यार्थ्याने या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

दोषींवर कारवाई करा ! – अभाविप

‘हिंदूंच्या देवतांविषयी अशा प्रकारची भाषा मुळीच खपवून घेतली जाणार नाही आणि संबंधित दोषींविरुद्ध कारवाई करण्यात यावी’, अशी भूमिका अभाविपच्या शुभंकर बाचल यांनी मांडली आहे.

नाटकातील आक्षेपार्ह भाग

हर्षवर्धन हरपुडे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की

१. सदर नाटकाचे प्रदर्शन होत असतांना सीतामातेचा अभिनय करणारा मुलगा हा व्यासपिठावर सिगारेट ओढत होता.

२. सदर नाटकात श्री लक्ष्मणाचे पात्र हे रावणाची मालीश करीत असल्याचे दाखवण्यात आले.

३. रावणास पाहून श्रीराम पळून गेले आणि ‘राम भागा-भागा’ असा एकेरी भाषेत श्रीरामाचा उल्लेख केला गेला.

विद्यापिठाच्या विभाग प्रमुखासह ६ विद्यार्थ्यांना अटक !

या प्रकरणी अभाविपने तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी ‘ललित कला केंद्र’ विभागाच्या प्रमुखासह ६ विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंदवून त्यांना अटक केली आहे. विद्यापिठाच्या विभाग प्रमुखाला अशा पद्धतीने अटक केल्याची ही पहिलीच घटना आहे. पोलिसांनी या प्रकरणी ‘ललित कला केंद्रा’चे विभाग प्रमुख डॉ. प्रवीण भोळे, भावेश पाटील, प्रथमेश सावंत आदी तसेच इतर अनोळखी विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. तसेच सर्व आरोपींना अटक केली आहे.

विभागप्रमुख आणि विद्यार्थी यांच्यावर कारवाई करण्याची पतित पावन संघटनेची निवेदनाद्वारे मागणी !

पुणे – या प्रकरणी पतित पावन संघटनेने पुणे विद्यापिठाला निवेदन दिले आहे. यात सांगितले आहे की, सामान्य विद्यार्थी आणि कार्यकर्ते या नाटकाच्या प्रसंगाविषयी शांततेच्या मार्गाने आवाज उठवत असतांना ‘ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी नाटकाविषयी आक्षेप घेणार्‍या विदयार्थ्यांना कुदळ-फावडे आणि दंडुके यांनी मारहाण केली. ही सर्व घटना निंदनीय आहे. संबंधितांवर वि  प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी आणि त्याचसमवेत सर्व दोषींना तात्काळ निलंबित करावे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, सबंधित ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख प्रविण भोळे, साहाय्यक कुलगुरु यांना या सर्वांची कल्पना होती. या प्रकरणी त्वरित कारवाई न केल्यास संघटना तुमच्या विरोधात तीव्र आंदोलन करील, याची नोंद घ्यावी.

ललित कला केंद्रात शाईफेक आणि तोडफोड

या प्रकरणी ‘ललित कला केंद्रा’चे प्रमुख डॉ. प्रविण भोळे यांच्यासह ६ जणांना अटक करून न्यायालयात उपस्थित करण्यात आले आहे. न्यायालयाने सरकारी पक्षाची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली आणि डॉ. प्रविण भोळे यांच्यासह आरोपी असलेल्या ५ विद्यार्थ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आरोपींना जामीन मिळवण्यासाठी लगेच अर्ज करण्याची प्रक्रिया चालू आहे.

ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी ललित कला केंद्राच्या परिसरात मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चामुळे अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी ललित कला केंद्राची तोडफोड केली. ललित कला केंद्राच्या बंद दरवाज्यावर, फलकावर शाईफेक करून या कार्यकर्त्यांनी दरवाज्याच्या काचा फोडल्या. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना कह्यात घेतले आहे. या परिसरात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *