सामाजिक माध्यमांतून भारतियांकडून संताप व्यक्त
हिंदी चित्रपटामध्ये पाकिस्तानी गायकाला गाण्याची संधी देणारे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक हे राष्ट्रघातकीच होत ! अशांच्या चित्रपटावर बहिष्कार घालणे हे प्रत्येक राष्ट्रप्रेमीचे राष्ट्रकर्तव्य होय ! -संपादक
मुंबई – पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम ७ वर्षांनंतर पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करणार आहे. ‘लव्ह स्टोरी ऑफ ९०’ या चित्रपटामधील एक गाणे तो गाणार आहेत. अमित कसारिया हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, तर हरेश आणि धर्मेश संघानी या चित्रपटाचे निर्माते आहेत. अतिफ अस्लम याच्या पुनरागमनामुळे चित्रपटाशी संबंधित दिग्दर्शक आणि निर्माते यांनी आनंद व्यक्त केला आहे; मात्र भारतीय संतप्त झाले असून अनेकांनी सामाजिक माध्यमांतून याचा विरोध केला आहे.
वर्ष २०१६ मध्ये उरी येथील आतंकवादी आक्रमणानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम केलेले नाही. ‘आता पुन्हा असले प्रकार चालू होणार का ?’, असा प्रश्न विचारला जात आहे.
सामाजिक माध्यमांतून भारतियांचा विरोध
अस्लम याला गाण्याची संधी दिल्याविषयी अनेकांनी बॉलीवूडच्या हेतूविषयी शंका उपस्थित केली. ‘एकीकडे भारतीय सैनिक पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांशी लढत असून देशासाठी बलीदान देत आहेत, तर दुसरीकडे कलेच्या नावाखाली बॉलीवूड पाकिस्तानी गायकांचे स्वागत करत आहे’, अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली आहे.
अतिफ अस्लम याचा भारतद्वेष !
अनेक पाकिस्तानी कलाकार भारताच्या विरोधात गरळओक करतांना दिसतात. भारताने काश्मीरला विशेषाधिकार देणारे ३७० रहित केल्यावर अस्लम याने ‘काश्मिरी लोकांवर केला जाणारा अन्याय आणि अत्याचार यांचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो’, असे त्याने म्हटले होते. (अशांना भारतात पायघड्या घातल्या जाणे संतापजनक होय ! – संपादक)
स्रोत: दैनिक सनातन प्रभात