नवी देहली / वाराणसी : उत्तरप्रदेशात बजरंग दलाने पुरुषांना हिंदूंच्या रक्षणासाठी शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम चालू केल्यावर त्याविरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांच्या संयोजकांना अटक करण्याची घटना नुकतीच घडली. आता अशा प्रकारचे प्रशिक्षण विश्व हिंदु परिषदेची महिला शाखा असणार्या दुर्गावाहिनीकडून वाराणसी येथे महिलांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देण्यास आरंभ झाला आहे. यापूर्वी फैजाबाद, नोएडा येथेही अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र चालवण्यात येत आहे.
१. या प्रशिक्षणात महिलांना आणि मुलींना लाठीकाठी, तसेच एअर रायफल चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. देशातील वाढत्या आतंकवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी हे प्रशिक्षण देण्यात येत आहे, असे दुर्गावाहिनीकडून सांगण्यात आले आहे.
२. येथील विहिंपच्या कार्यालयाजवळील भारतीय शिक्षा मंदिर नावाच्या शाळेमध्ये हे प्रशिक्षण केंद्र चालू आहे. यात ११ जिल्ह्यांतील १०० महिला आणि मुली सहभागी झाल्या आहेत.
३. महिला प्रशिक्षक कमला मिश्रा यांनी सांगितले की, या प्रशिक्षणाद्वारे महिलांना आणि मुलींना आत्मनिर्भय बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच महिलांनी आतंकवाद्यांच्या हातून मरू नये म्हणूनही त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिहादी आतंकवादी महिलांच्या हातून ठार झाल्यास त्याला स्वर्गप्राप्ती होत नाही.
४. मोनी या युवतीने म्हटले की, प्रशिक्षण घेऊन गावी गेल्यावर तेथील महिलांना आणि मुलींनाही प्रशिक्षण देणार आहे.
५. विहिंपचे संघटक दिवाकर म्हणाले की, देशाच्या रक्षणासाठी एकीकडे सैन्य असेल, तर दुसरीकडून बजरंग दलाचे आणि दुर्गावाहिनीचे कार्यकर्ते उभे असतील. प्रत्येक वर्षी राज्यातील वेगवेगळ्या भागात महिलांसाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येते. येथे १० वर्षांनंतर अशा प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात