भारतात संस्कृत भाषेला मृत भाषा ठरवणार्यांना चपराक ! कुठे संस्कृतचे महत्त्व जाणणारे पाश्चात्त्य, तर कुठे या भाषेला मृत भाषा घोषित करून तिची उपेक्षा करणारे नतद्रष्ट भारतीय !
ऑकलॅन्ड (न्यूझीलंड) : आज स्वत:च्या देशात अर्थात् भारतात अपमान अन् उपेक्षा झेलत असलेली देवभाषा संस्कृत जगामध्ये मात्र एक सन्माननीय भाषा समजली जाते. संस्कृत शिकणे म्हणजे शिकण्यातील महत्त्वपूर्ण दर्जा प्राप्त करणे, असे मानले जाते. जगातील अनेक शाळांमध्ये संस्कृत भाषेला पाठ्यक्रमातील महत्त्वाचा भाग म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.
न्यूझीलंडची राजधानी असलेल्या ऑकलॅन्डच्या माउंट इडेन क्षेत्रातील एका शाळेत विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी आधी संस्कृत शिकवले जाते. ‘फिकिनो’ नावाच्या या शाळेतील शिक्षकांचे म्हणणे आहे की, संस्कृतमुळे मुलांची शिकण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वृद्धींगत होते.
शाळेचे मुख्याध्यापक पीटर क्रॉम्पटन म्हणाले, ‘‘संस्कृत ही एकमेव अशी भाषा आहे, जी व्याकरण आणि उच्चारण यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. जगातील कोणतीही भाषा शिकण्यासाठी संस्कृत आधार ठरते. संस्कृत शिकायला मिळाल्याने शाळेतील विद्यार्थी आनंदी आहेत. संस्कृत शिकल्यामुळे मुलांमध्ये इंग्रजी भाषा उत्तम पद्धतीने बोलणे आणि ती समजून घेण्याच्या क्षमतेत वृद्धी झाली आहे. शाळेत दाखला घेणार्या प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक आम्हाला विचारतात की, तुम्ही तुमच्या पाठ्यक्रमात संस्कृत भाषेला स्थान का दिले आहे ? त्यावर आम्ही त्यांना सांगतो की, ही भाषा श्रेष्ठ आहे. जगातील अत्युच्च प्रतीचे साहित्य याच भाषेत झाले आहे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात