मूर्तीला पारंपरिक साडी नेसवली नसल्याने अभाविप आणि बजरंग दल यांचे आंदोलन
त्रिपुरामध्ये भाजपचे सरकार असतांना सरकारी महाविद्यालयात असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! -संपादक
आगरतळा (त्रिपुरा) – त्रिपुरातील ‘आर्ट अँड क्राफ्ट’ या सरकारी कला महाविद्यालयात १४ फेब्रुवारीला श्री सरस्वतीदेवीच्या पूजनाचा उत्सव आयोजित करण्यात आला होता; परंतु या कार्यक्रमात श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीला पारंपरिक साडी नेसवली गेली नव्हती. त्यामुळे मूर्ती अश्लील दिसत असल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी मूर्तीला साडी नेसवली. या प्रकरणी या संघटनांनी येथे आदोंलन केले. अ.भा.वि.प.चे त्रिपुरा शाखेचे सरचिटणीस दिवाकर आचार्जी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. अखेर ही मूर्ती महाविद्यालयाच्या प्रशासनाने पालटली असून तिला प्लास्टिक आवारणाने झाकून ठेवण्यात आले आहे.
आचार्जी यांनी सांगितले की, आपल्या सर्वांना ठाऊक आहे की, वसंत पंचमीदिवशी श्री सरस्वतीदेवीची देशभरात पूजा केली जाते. सकाळीच आम्हाला माहिती मिळाली की, शासकीय आर्ट अँड क्राफ्ट महाविद्यालयात श्री सरस्वतीदेवीची मूर्ती अत्यंत चुकीच्या आणि असभ्य पद्धतीने साकारण्यात आली आहे. श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीला पारंपरिक साडी नेसवण्यात आली नव्हती. त्यामुळे या विरोधात आम्ही निदर्शने केली. त्यानंतर याविषयी बजरंग दलाला माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनीही या निदर्शनात सहभाग नोंदवला. यानंतर मूर्तीला साडी नेसवण्यात आली.
(सौजन्य : CHINI KHORANG TRIPURA)
घटनास्थळी पोलिसांनीही भेट दिली; परंतु महाविद्यालयाने निदर्शकांविरोधात कोणतीही तक्रार केली नाही. अ.भा.वि.प. आणि बजरंग दल यांनीही महाविद्यालयाविरोधात कोणतीही तक्रार केली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
पारंपरिक मूर्ती घडवण्यात आली ! – महाविद्यालयाचे स्पष्टीकरण
महाविद्यालय प्रशासनाने म्हटले की, हिंदु मंदिरात पाळल्या जाणार्या पारंपरिक शिल्पकलेचे पालन ही मूर्ती घडण्याच्या वेळी करण्यात आले होते. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता.
मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून महाविद्यालयावर कारवाई करावी ! – अ.भा.वि.प.ची मागणी
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून महाविद्यालय प्राधिकरणाविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी अ.भा.वि.प.ने केली आहे.
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
स्रोत: दैनिक सनातन प्रभात