Menu Close

धार (मध्यप्रदेश) : भोजशाळेच्या सर्वेक्षणासंदर्भात इंदोर उच्च न्यायालयाने सुरक्षित ठेवला आदेश !

हिंदु पक्षाने वर्ष १९०२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणाचे वैज्ञानिक पद्धतीने अन्वेषण करण्याची केली आहे मागणी !

इंदूर (मध्यप्रदेश) – राज्यातील धार जिल्ह्यात असलेल्या ऐतिहासिक भोजशाळेचे सर्वेक्षण करण्याच्या हिंदूंच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. यासंदर्भातील ७ जनहित याचिकांवर १९ फेब्रुवारी या दिवशी इंदोर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी वर्ष १९०२ मध्ये झालेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या भोजशाळेच्या अन्वेषणाचा दाखला देत नव्याने सर्वेक्षण करण्यात यावे, अशी हिंदु पक्षाने मागणी केली. न्यायालयाने त्याचा निर्णय राखून ठेवला.

१. हिंदु पक्षाचे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन म्हणाले की, वर्ष १९०२ मध्ये झालेल्या भोजशाळेच्या सर्वेक्षणात भारतीय वास्तूकला, विष्णूची प्रतिमा, हिंदु चिन्ह, संस्कृतचे शब्द आदी साक्षी मिळाल्या आहेत. याचे वैज्ञानिक पद्धतीने अन्वेषण करण्यात यावे. याने विषय सुस्पष्ट होऊ शकेल. आमच्या याचिकेत मागणी करण्यात आली आहे की, भोजशाळेत हिंदूंना नियमित पूजा करण्याचा अधिकार आहे. तेथे मुसलमान समाजही नमाजपठण करतो. त्यांच्या पठणावर बंदी आणली पाहिजे.

२. मुसलमान पक्षाने सांगितले की, जबलपूर येथील न्यायालयात या प्रकरणी सुनावणी चालू आहे. त्यामुळे इंदोर उच्च न्यायालयाने त्या याचिकेची माहितीही मागवली आहे.

भोजशाळा येथील घटनाक्रम !

वर्ष १९०२ : लॉर्ड कर्झन धार आणि मांडू यांच्या दौर्‍यांवर होते. त्या वेळी त्यांनी भोजशाळेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ५० सहस्र रुपये खर्च करण्याची अनुमती दिली होती. त्या वेळी भोजशाळेचे सर्वेक्षणही करण्यात आले होते.

वर्ष १९५१ : भोजशाळेला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. त्या वेळी जारी केलेल्या सरकारी पत्रात भोजशाळा आणि कमाल मौला मशीद यांचा उल्लेख आढळतो.

वर्ष १९९५ : या काळात झालेल्या वादानंतर प्रशासनाने मुसलमानानां प्रत्येक शुक्रवारी नमाजपठण करण्यास अनुमती दिली, तर हिंदूंना वसंतपंचमीच्या दिवशी पूजन करण्याची अनुमती देण्यात आली. जेव्हा जेव्हा वसंतपंचमी शुक्रवारी आली, तेव्हा तेव्हा धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले. वर्ष २०१३ मध्ये हिंदूंवर पोलिसांनी लाठीमारही केला होता. पुढे हिंदूंना प्रत्येक मंगळवारी पूजनास, तर मुसलमानांना शुक्रवारी नमाजपठण करण्याची अनुमती देण्यात आली.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *