पिंपरी : क्रांतिकारकांचे कुलपुरुष आणि हिंदुहृदयसम्राट असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदु राष्ट्राचे प्रखर पुरस्कर्ते होते. त्यांच्या या जयंतीदिनी त्यांच्या जाज्वल्य विचारांचे स्मरण करून हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प करूया, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य तागडे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त काळेवाडी येथील पार्वती इंग्लिश मिडियम शाळेच्या पटांगणावर आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी ५० हून अधिक सावरकरप्रेमी नागरिक उपस्थित होते.
चैतन्य तागडे पुढे म्हणाले की, सावरकर म्हणत की, हिंदूंनो, अहिंदू म्हणून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळाले, तरी ते लाथाडून शेवटचा हिंदू म्हणून मी मरेन, अशी प्रतिज्ञा घ्या. धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर, अशी धर्मांतराविषयी सावरकरांची भूमिका होती. ज्याप्रमाणे अग्निहोत्री यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित ठेवतो, त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग अंतःकरणात जतन करून ठेवा. हिंदु राष्ट्राला आता केवळ हुतात्मे नको. आमच्या पिढीने राष्ट्रास हुतात्म्याच्या पायरीवर आणले. आता पुढच्या पिढीने वीर बनून विजयाच्या पायरीवर चढले पाहिजे. यावरून सावरकरांची दूरदृष्टी दिसून येईल की, पुढील पिढीची स्वधर्माविषयीची मानसिकता काय असली पाहिजे.
सावरकरांनी आपल्या कार्यकाळात उत्तुंग क्रांतिकार्य केले, त्यामध्ये भाषाशुद्धी, हिंदूंचे शुद्धीकरण, जातीपातीत अडकलेल्या हिंदूंना एकत्र आणणे आदी कार्य केले. हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी झटणे, हीच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना खरी आदरांजली ठरेल.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. जयेश बोरसे यांनी केले. पार्वती इंग्लिश मिडीयम शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नढे-पाटील यांनी व्याख्यानासाठी शाळेचे पटांगण उपलब्ध करून दिले. या वेळी सनातन संस्था ठाणेच्या वतीने क्रांतीकारकांची माहिती सांगणारे क्रांतीगाथा प्रदर्शन लावण्यात आले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात