माणगाव (सिंधुदुर्ग) येथे महाराष्ट्र मंदिर – न्यास अधिवेशनात ३७५ हून अधिक मंदिर विश्वस्तांचा सहभाग !
माणगाव (सिंधुदुर्ग, महाराष्ट्र) : मानसन्मान बाळगून मंदिरांचे प्रश्न सुटणार नाहीत. मंदिरांचे प्रश्न खरोखरचे सोडवायचे असतील, तर मंदिरात येतांना आणि धर्मासाठी कार्य करतांना ‘मंदिर रक्षक’ म्हणून एकत्र या. एकत्र आलो, तरच हिंदूंचा आवाज ऐकला जाईल, अशा प्रकारे हिंदूंना संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन सावंतवाडी संस्थानचे युवराज श्री. लखमराजे भोसले यांनी केले. माणगाव येथील परमहंस परिवज्रकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या पवित्र भूमीत श्री दत्त मंदिर न्यासाच्या सभागृहात २१ फेब्रुवारी या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.
महाराष्ट्र मंदिर महासंघ, श्री दत्तमंदिर न्यास आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनात ३७५ हून अधिक मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, पुरोहित आणि मंदिरांचे खटले लढवणारे अधिवक्ता सहभागी झाले होते.
या उद्घाटन सत्राच्या वेळी व्यासपिठावर माजी धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, देवस्थान सेवा समितीचे (विदर्भ) सचिव अधिवक्ता श्री. अनुप जैस्वाल, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट उपस्थित होते. ‘जय श्रीराम’, ‘हर हर महादेव’, ‘सनातन हिंदु धर्माचा विजय असो’ अशा जयघोषात या अधिवेशानाला प्रारंभ झाला. या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागांतून उपस्थित राहिलेल्या मंदिराच्या विश्वस्तांनी मंदिरांच्या समस्या, मंदिरांचे व्यवस्थापन, विश्वस्तांची कर्तव्ये, मंदिर विश्वस्तांचे संघटन आदी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या अधिवेशनात सहभागी विश्वस्तांनी मंदिरांच्या कार्यासाठी स्वत: कृतीप्रवण होण्याची सिद्धता दर्शवली. त्यासाठी परिसंवाद, गटचर्चा यांद्वारे पुढील कार्याच्या दृष्टीने कार्यक्रम निश्चित केला.
लखमराजे भोसले म्हणाले
१. मंदिरांचे अनेक प्रश्न आहेत; मात्र हे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणी पुढे येत नाहीत. मंदिरे सरकारीकरणमुक्त करण्यासाठी आणि मंदिरांचे प्रश्न सोडवण्यासाठी हिंदूंनी काम करणे आवश्यक आहे.
२. युवक ही हिंदु धर्माची शक्ती आहे. मंदिराच्या रक्षणासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. मंदिरात प्रवेश करतांना भारतीय संस्कृतीनुसार कपडे परिधान करायला हवेत.
३. वक्फ बोर्ड आणि ख्रिस्ती मिशनरी संघटित असल्यामुळे बळकट आहेत. हिंदू मात्र मंदिरांसाठी संघटित होत नाहीत.
४. महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनाच्या माध्यमातून मंदिरांच्या विश्वस्तांनी एकत्र यायला हवे. सिंधुदुर्गामधील मंदिरांच्या विश्वस्तांनी संघटित व्हायला हवे. यासाठी तालुक्या-तालुक्यांतून संघटन व्हायला हवे. मंदिरांच्या विश्वस्तांच्या संघटनासाठी सावंतवाडी संस्थानच्या वतीने आम्ही योगदान देऊ. या कार्याला आमचा पाठिंबा आहे.
सिंधुदुर्गातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थानची २७७ मंदिरे मुक्त करून भक्तांकडे द्या ! – सुनील घनवट, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक
सिंधुदुर्गातील मंदिरांसाठी हिंदू संघर्ष करत आहेत; परंतु हा संघर्ष व्यक्तीगत पातळीवर चालू आहे. संकुचित विचार ही हिंदूंची समस्या आहे. जेव्हा सिंधुदुर्गातील मंदिरांसाठी देशभरातील हिंदू आवाज उठवतील, तेव्हा व्यापक संघटनामुळे मंदिरांच्या समस्या सुटतील. आपापसांतील वादविवाद आणि मानापमान यांवरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मंदिरे बंद आहेत. अशा प्रकारे मंदिरे बंद असणे, ही दुर्दैवी गोष्ट आहे. आपल्यातील मतभेदाचा हिंदु धर्मविरोधी शक्ती लाभ घेणार नाहीत, यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजे. सद्य:स्थितीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो मंदिरे आहेत; परंतु केवळ मंदिरांतील दानपेटीतील पैसे घेऊन जाण्याव्यतिरिक्त कुठलेही काम ही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती करत नाही. ‘कर्तव्य तुमचे आणि हक्क अन् अधिकार आमचा’ अशा भूमिकेत असणारा हा ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’ नावाचा पांढरा हत्ती कशाला पोसायचा ? या समितीच्या अंतर्गत असलेली सिंधुदुर्गातील २७७ मंदिरे मुक्त करून ती भक्तांच्या स्वाधीन करावीत.
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक –
https://drive.google.com/file/d/1DIHKKyuwPJnTY8rfbD5_U4VCnzlPv8la/view
…तर मंदिराच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राची स्थापना होईल ! – सुनील घनवट, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक
अयोध्येत श्रीरामाच्या मंदिरामुळे संपूर्ण देशातच नव्हे, तर संपूर्ण विश्वात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. एका मंदिराच्या उभारणीमुळे भारतातील हिंदू संघटित होत आहेत. याही पुढे जाऊन देशातील मंदिराच्या उभारणीतून हिंदू संघटित होऊन भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. एका जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारला आरक्षणाचा निर्णय घ्यावा लागला. मग महाराष्ट्राती सर्व मंदिरांचे विश्वस्त एकत्र आले, तर मंदिराच्या समस्या सुटणार नाहीत का ?, असा प्रश्न या वेळी सुनील घनवट यांनी उपस्थित केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 375 हुन अधिक मंदिर विश्वस्त, पुजारी #मंदिर अधिवेशनात एकत्रित आले आणि मंदिर रक्षणाच्या कार्यासाठी संघटित होऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत येणारी जिल्ह्यातील 277 मंदिरे मुक्त करण्याचा निर्धार केला@HinduJagrutiOrg@ReclaimTemples @PTI_News pic.twitter.com/soTnyLbOKr
— Sunil Ghanwat🛕🛕 (@SG_HJS) February 22, 2024
मंदिरांचा विकास करणे हे विश्वस्तांचे कर्तव्य ! – दिलीप देशमुख, माजी धर्मादाय आयुक्त
प्रभु श्रीराम वनवासात असतांना भरताने अयोध्येचा राज्यकारभार प्रभु श्रीरामाच्या वतीने चालवला. त्याप्रमाणे विश्वस्तांनी मंदिरांचा कारभार सेवक म्हणून चालवावा. ‘मंदिरांचा मालक स्वत: भगवंत आहे’, हे विश्वस्तांनी लक्षात घ्यावे. विश्वस्तांना मंदिराच्या संपत्तीची हानी करण्याचा अधिकार नाही. मंदिरांविषयी कायदेशीर माहिती असावी, यासाठी विश्वस्तांनी महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट अॅक्टचा अभ्यास करायला हवा. देवस्थानच्या घटनेची माहिती विश्वस्तांना असायला हवी. विश्वस्तांमधील आपापसांतील वादामुळे देवस्थानच्या जमिनी अन्यांच्या कह्यात जात आहेत. त्यामुळे देवस्थानच्या चल-अचल संपत्तींचे जतन करणे, हे विश्वस्तांचे दायित्व आहे.
मंदिर संस्कृती पुनरूज्जीवित करण्याचे कार्य आपणाला करायचे आहे ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
प्राचीन काळापासून मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे आहेत. धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे कार्य वेळोवेळी मंदिरांच्या माध्यमातून झाले. त्यामुळे आपल्या विविध शासकांनीही मंदिरे उभारली. मंदिर संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी सर्व प्रकारची साहाय्यता केली. विज्ञानयुगातही मंदिराकडे जो लोकांचा ओढा आहे, हा लक्षणीय आहे. मंदिरात मोठ्या प्रमाणात येणार्या हिंदु समाजाचे जन्महिंदूंपासून कर्महिंदूंमध्ये रूपांतर करण्याचे महत्कार्य मंदिराच्या माध्यमातून होऊ शकते. मंदिरे ही केवळ धर्मस्थळे नाहीत, तर ती एक संस्कृती आहे. त्यामुळे मंदिर संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचे कार्य आपल्याला करायचे आहे.
समस्यांवर चर्चा होऊन ठरला कृतीप्रवण कार्यक्रम !
मंदिरांच्या भूमीवरील अतिक्रमण, कुळकायदा, वक्फ बोर्डद्वारे मंदिरांची भूमी बळकावण्याचा प्रयत्न, मंदिरांचे सरकारीकरण, मंदिरांमध्ये तोकडे कपडे घालणे आदी मंदिरांतील विविध समस्यांवर अधिवेशनात चर्चा होऊन या समस्या सोडवण्यासाठी कृतीशील कार्यक्रम निश्चित करण्यात आले.
मंदिराची भूमी कूळ कायद्याद्वारे जाऊ नये, यासाठी सर्तक रहावे ! – अनुप जैस्वाल, सचिव, विदर्भ देवस्थान समिती
मंदिरांची डागडुजी आणि व्यवस्थापन यांसाठी विदर्भ देवस्थान समितीला मिळालेली भूमी कूळ कायद्याद्वारे त्रयस्त व्यक्तींच्या कह्यात देण्यात आली होती. ही भूमी देवस्थानला पुन्हा प्राप्त करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरण आणि उच्च न्यायालय यांकडे पाठपुरावा केला. कायदेशीर लढा देऊन मंदिराची भूमी आम्ही पुन्हा प्राप्त करून घेतली. कूळ कायद्याद्वारे गेलेली १ सहस्र २०० एकर भूमी पुन्हा विदर्भ देवस्थान समितीला मिळवून देण्यात आम्हाला यश आले आहे. कूळ कायद्याद्वारे राज्यातील अनेक देवस्थानांच्या भूमी अन्य व्यक्तींच्या कह्यात गेल्या आहेत. राज्यातील मंदिरांपुढे ही मोठी समस्या आहे. विश्वस्तांमध्ये समन्वय नसल्याने मंदिरांच्या मालमत्तेचे अवैधपणे हस्तांतर वाढले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील ग्रामदेवता कोतेश्वर मंदिराच्या दीड एकर शेतजमिनीत महसूल विभागाने शासनाचे नाव लावले आहे. हे लक्षात घेऊन मंदिरांची तांत्रिक माहिती व्यवस्थित ठेवायला हवी. मंदिराचे सातबारा आणि प्रॉपर्टी कार्ड अद्ययावत करून घेणे काळाची आवश्यकता आहे, तसेच ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ पद्धतीने मंदिरांचे खटले चालले पाहिजेत.
Over 375 temple trustees participate in Maharashtra Mandir Nyas Adhiveshan in Mangaon.
Set aside personal honours and come together as ‘Temple Protectors’ for the sake of Dharma and Temples – Lakhamaraje Bhosale, Yuvaraj of Sawantwadi Sansthan
Release 277 temples in Sindhudurg… pic.twitter.com/j6EcJIXboa
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 22, 2024
असे झाले अधिवेशन !
शंखनादाने अधिवेशनाला प्रारंभ झाला. प्रार्थना आणि श्लोक यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर वेदमूर्ती राजेंद्र भागवत आणि वेदमूर्ती प्रवीण म्हैसकर यांनी वेदपठण केले. त्यानंतर संतांचा सन्मान आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी मंदिर परिषदेसाठी दिलेल्या संदेशाचे वाचन सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र पाटील यांनी उपस्थितींचे स्वागत केले. श्री. सुनील घनवट यांनी मंदिर महासंघाच्या कार्याची माहिती दिली. मंदिरांचे सुव्यवस्थापन, मंदिरांच्या समस्या आणि त्यांवरील कायदेविषयक उपाययोजना यांविषयी परिसंवाद घेण्यात आला. मंदिर महासंघाची पुढील कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली. मंदिराच्या विविध अडचणी सुटाव्यात यासाठी उपस्थित विश्वस्तांनी एकमताने ठराव करण्यात आले.
बलस्थाने ओळखून मंदिरांचा आर्थिक विकास करायला हवा ! – प्रदीप तेंडोलकर, अध्यक्ष, श्री जीवदानी देवस्थान, विरार
कोकणात छोटी-मोठी अनेक मंदिरे आहेत. ही मंदिरे आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला हवीत; कारण मंदिराच्या माध्यमातून धर्माचे अधिष्ठान सांभाळले जाते. विरार येथील जीवदानी मंदिराला दानपेटी, नारळविक्री, अर्पण साहित्याचा लिलाव यांतून उत्पन्न प्राप्त होत होते. स्थानिक लोकांचा सहभाग आणि भक्तांचे सहकार्य यांमुळे हे मंदिर आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्हाला साहाय्य झाले. मंदिराला अर्पण मिळणार्या नारळांद्वारे आम्ही खोबर्याची वडी प्रसाद म्हणून प्रारंभ केला. यातून प्रतीवर्षाला ३ कोटी रुपये मंदिराला आर्थिक उत्पन्न मिळत आहे. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने मंदिराच्या व्ययामध्ये नियंत्रण आणता येते. सामाजिक माध्यमांद्वारे मंदिरांच्या वैशिष्ट्यांचा प्रसार करायला हवा. प्रत्येक मंदिराचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. ही बलस्थाने ओळखून मंदिरांचा आर्थिक विकास करायला हवा.
देशातील प्रत्येक मंदिरात ‘वस्त्रसंहिता’ लागू होईपर्यंत अभियान राबवा ! – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती
(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)
देशातील अनेक चर्चमध्ये ड्रेसकोड आहे. मुसलमानांमध्ये महिलांना बुरखा घालण्याचा ‘ड्रेेसकोड’ आहे. सध्या हिंदु धर्म न मानणारे किंवा देवतेवर श्रद्धा नसलेले आधुनिकतावादीच मंदिरातील वस्त्रसंहितेला व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली विरोध करतात. मंदिरामध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे याला आम्ही व्यक्तीस्वातंत्र्य म्हणणार नाही. प्रत्येकाला स्वत:च्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत, याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे; मात्र मंदिर हे धार्मिक स्थळ आहे. तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचरण व्हायला हवे. येथे व्यक्तीस्वातंत्र्य नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे. देशातील प्रत्येक मंदिरात ‘वस्त्रसंहिता’ लागू होईपर्यंत अभियान राबवा.
एक इंच भूमीही वक्फ बोर्डाला देणार नाही, अशी हिंदूंनी भूमिका घ्यावी ! – सुनील घनवट, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक
कोकणातील २ सहस्र ३३९ एकर भूमी वक्फ बोर्डाच्या कह्यात आहे. वर्ष १९२५ मध्ये इंग्रजांनी वक्फ बोर्डची व्यवस्था निर्माण केली. याद्वारे मुसलमानेतरांची भूमी मुसलमानांना देण्यात येत आहे. वक्फ बोर्डाने बळकावलेली भूमी आपली आहे, हे सिद्ध करण्यासाठी वक्फ प्राधिकरणाकडे जावे लागते. या कायद्यात काँग्रेस सरकारने अवाजवी अटी घातल्या. त्याद्वारे अल्पसंख्य जैन, बौद्ध, शीख यांचे अधिकार काढून घेण्याचा अधिकारही या वक्फ बोर्डाकडे देण्यात आला आहे. देश आमचा, येथे बहुसंख्य हिंदू राहतात; मात्र वक्फ बोर्डाला हिंदूंची भूमी बळकावण्यासाठी अमर्याद अधिकार देण्यात आले आहेत. यापुढे एक इंचही भूमी वक्फ बोर्डाला देणार नाही, अशी भूमिका हिंदूंनी घ्यायला हवी.
मंदिर सरकारीकरणाद्वारे मंदिरातील चैतन्य नष्ट करण्याचे मोठे षड्यंत्र ! – विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती
मंदिरे ही धर्माची दिशा देणारी केंद्रे आहेत. पूर्वी मंदिरातून धर्मशिक्षण आणि धर्मजागृतीचे कार्य होत असे; मात्र आता ते होत नसल्याने हिंदु समाज धार्मिकदृष्ट्या दिशाहीन झाला आहे. सरकारीकरण झालेल्या पंढरपूर देवस्थानात भ्रष्टाचार झाला. कोल्हापूर देवस्थान आणि तुळजापूर देवस्थान यांमध्ये घोटाळे झाले. सरकारीकरणामुळे मंदिरांची स्थिती दयनीय झाली आहे. देशातील ४ लाख मंदिरांचे सरकारीकरण करण्यात आले आहे; परंतु एकही मशीद किंवा चर्च यांचे सरकारीकरण करण्यात आलेले नाही. देशातील सरकारीकरण झालेली मंदिरे भक्तांच्या नियंत्रणात येण्यासाठी आता सर्व संप्रदायांनी, हिंदु संघटनांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. मंदिर सरकारीकरणाद्वारे ही साकता, चैतन्य नष्ट करण्याचे फार मोठे षड्यंत्र चालू आहे.
पंडित वसंतराव गाडगीळ यांचा सन्मान !
पुणे येथील शारदा ज्ञानपीठाचे संस्थापक पंडित वसंत गाडगीळ अधिवेशनात शेवटपर्यंत सहभागी झाले होते. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने हिंदु जनजागृती पुष्पहार घालून आणि शाल अन् श्रीफळ देऊन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत मणेरीकर यांनी त्यांचा सन्मान केला.
मंदिर रक्षणाचे कार्याला साधनेचे बळ आवश्यक ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था
मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशिला आहेत, चैतन्याचे स्त्रोत आहेत. ते टिकवून ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. मंदिरांचे पावित्र्य राखणे, संघटन करणे, सुव्यवस्थापन करणे हे सर्व कार्य ईश्वराचे अधिष्ठान ठेवून करणे आवश्यक आहे. मंदिरांचे कार्य केवळ शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर होऊ शकत नाही. त्यासाठी धर्मशक्तीचे बळ आवश्यक आहे. यासाठी साधना केली पाहिजे. हिंदूंचे संघटन झाले, तर हिंदु धर्म आणि राष्ट्र यांचे रक्षण होईल. यासाठी हिंदु संघटनाच्या दृष्टीने प्रयत्न करणे हाही समष्टी साधनेचाच महत्त्वाचा भाग आहे.
https://www.facebook.com/jagohindusindhudurg/videos/1509363259622766/?ref=embed_video&t=0
अधिवेशन यशस्वीतेसाठी श्री दत्तमंदिर न्यासाचे पूर्ण सहकार्य
माणगाव येथील श्री दत्तमंदिर न्यासाने ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’चे आयोजन करण्यात आणि ते यशस्वी होण्यात सर्वतोपहरी साहाय्य केले. यामध्ये न्याहारी, महाप्रसाद, सभागृह, वीजव्यवस्था आदी सर्व व्यवस्थांचा समावेश आहे. माणगाव येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयाचे मालक श्री. सुरज नामदेव नाईक यांनी अधिवेशनासाठी आसंद्यांची (खुर्च्यांची) व्यवस्था करून दिली. यांसह हे अधिवेशन यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व धर्माभिमान्यांचे या वेळी आभार व्यक्त करण्यात आले. या वेळी श्री दत्तमंदिर न्यासाचे अध्यक्ष सुभाष भिसे, व्यवस्थापक श्री. शिवराम काणेकर आणि श्री. दत्तप्रसाद सावंत यांचा सत्कार करण्यात आला.