अमरावती आणि अकोला येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
अमरावती : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव-मस्तानी या चित्रपटामध्ये इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले असल्यामुळे त्यावर तात्काळ बंदी घालावी, तसेच तेलंगण शासनाचा १९५ चर्चसमवेत होणारा नाताळचा कार्यक्रम रहित करावा या दोन मागण्यांसाठी राजकमल चौक येथे २० डिसेंबरला अमरावती येथे आणि अकोला येथे नुकतेच राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले.
अमरावती येथील आंदोलनाच्या वेळी आपले मत व्यक्त करतांना छावा संघटना आणि भगवा सेना यांचे श्री. नितीन व्यास यांनी त्यांचे विचार मांडतांना सांगितले, “अशा प्रकारे इतिहासाचे विकृतीकरण करणे अतिशय अयोग्य आहे. हा चित्रपट आम्ही हिंदू एकत्रित येऊन बंद करूच.” तसेच श्री योगवेदांत सेवा समितीचे श्री. मानव बुद्धदेव यांनी यासंदर्भात आपला विरोध दर्शवला आणि कवितास्वरूप स्वतःचे विचार मांडले.
हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रेणुका टवलारे यांनी त्यांचे विचार मांडतांना हिंदूंचा इतिहासाविषयी अभ्यास आणि आदर अल्प झाल्याने अशी स्थिती निर्माण झाली आहे, असेे सांगितले आणि समस्त हिंदूंना हिंदुत्वाच्या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले.
सनातन संस्थेच्या सौ. विभा चौधरी यांनीसुद्धा या चित्रपटाला संस्थेच्या वतीने विरोध दर्शवला. या वेळी सनातन राष्ट्र संघाचे अध्यक्ष श्री. निखिल वर्मा, हिंदु महासभा विदर्भ प्रांत युवा प्रभारी श्री. विक्रांत अलगुजे, भारतीय विद्यार्थी सेनेचे सर्वश्री प्रमोद घाटे, केतन मलतकर, अक्षय पवार, अनिकेत तायडे, आदर्श खंडारे, अमीत खंडारे, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. उपस्थित हिंदु युवक स्वतःहून आंदोलनामध्ये उत्फूर्तपणे सहभागी झाले आणि घोषणा देत होते.
२. आंदोलनामध्ये आलेल्या नवीन युवतींनी पुढील सेवेमध्ये सहभाग घेणार असल्याचे स्वतःहून सांगितले.
अकोला येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
अकोला : अकोला येथे नुकतेच हिंदुत्ववाद्यांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये योग वेदांत समितीचे श्री. प्रताप विरवाणी, अधिवक्ता मनिष कोटवानी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय ठाकुर, श्री. कोपेकर तसेच समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात