Menu Close

महाराष्ट्रातील रेल्वेस्थानकांवरील बंद ‘वॉटर वेंडिंग मशीन्स’ नागरिकांच्या सुविधेसाठी तत्काळ सुरु करण्याची सुराज्य अभियानाची मागणी

नागरिकांची गैरसोय होत असतांना उपाययोजना न काढणारे असंवेदनशील रेल्वे प्रशासन !

एक रुपयात मिळणाऱ्या पाण्यासाठी नागरिकांना मोजावी लागत आहे पाचपट रक्कम !

मुंबई – रेल्वे प्रशासनाच्या ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम् कॉर्पाेरेशन’च्या (‘आय.आर्.सी.टी.सी.’च्या) वतीने वर्ष २०१७ मध्ये रेल्वेस्थानकांवर अत्यल्प दरात पिण्याचे शुद्ध पाणी देणारी ‘वॉटर वेंडिंग मशीन्स’ (पाण्याची विक्री करणारी यंत्रे) बसवण्यात आली होती. या यंत्रांची दुरुस्ती आणि देखभाल यांचा ठेका ‘फॉन्टस् वॉटर प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनाला देण्यात आला होता; मात्र कोरोनाच्या काळात म्हणजे मागील २ वर्षांपासून ही यंत्रे बंद आहेत. कोरोना महामारीनंतर रेल्वे चालू झाल्या, तरी ही सेवा चालू करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाखो रुपयांची ही यंत्रे रेल्वेस्थानकांवर धूळ खात पडलेली आहेत आणि नागरिकांना अत्यल्प दरात मिळणारे पाणी ५-६ पट अधिक पैसे मोजून रेल्वेच्या अधिकृत विक्रेत्याकडून घ्यावे लागत आहेत.

१. कोरोनाच्या कालावधीत रेल्वे बंद असल्यामुळे रेल्वेस्थानकांवर नागरिकांचा वावर नव्हता. त्यामुळे या यंत्रांचा वापर झाला नाही.

२. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने यंत्र चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन न दिल्यामुळे यंत्र बंद असल्याचे सांगितले. त्यामुळे या कामाविषयी नव्याने निविदा काढण्याची प्रक्रिया चालू आहे.

३. मुंबईतील मध्य रेल्वेच्या ३५ स्थानकांवर, तर संपूर्ण महाराष्ट्रात विविध रेल्वेस्थानकांवर मिळून २०० हून अधिक ‘वॉटर वेंडिंग मशीन्स’ बसवण्यात आली होती. ही सर्व यंत्रे सध्या बंद आहेत. नव्याने निविदा काढतांना ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम् कॉर्पाेरेशन’ने याचे दायित्व विभागीय रेल्वेस्थानकांवर सोपवले आहे. त्यामुळे याची निविदा आता विभागीय रेल्वेस्थानकांद्वारे काढण्यात येत आहे.

४. वॉटर वेंडिंग यंत्रामधील पाण्याचे दरपत्रक

५. २१ मार्च २०२२ या दिवशी मुंबईतील मध्ये रेल्वेने याची निविदा काढली आहे; मात्र अद्याप त्याला प्रतिसाद मिळालेला नाही.

६. सध्या रेल्वेस्थानकांवर ही यंत्रे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे रेल्वेफलाटावरच असलेल्या रेल्वेच्या अधिकृत विक्रेत्यांकडून नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. ३०० मिलीलिटर पाण्यासाठी ५ – ६ रुपये मोजावे लागत आहेत. निविदा प्रक्रियेला होणाऱ्या विलंबामुळे नागरिकांना मात्र पाण्यासाठी अधिक मूल्य द्यावे लागत आहे, ही वस्तूस्थिती आहे. (पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीसाठी एवढे पैसे द्यावे लागणे, हे अयोग्य आहे. रेल्वे प्रशासनाने अत्यल्प दरात नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी चालू केलेली ही सुविधा स्तुत्य आहे; मात्र त्यातील त्रुटी दूर करून आणि निविदा प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून ही सेवा नागरिकांसाठी पुन्हा चालू करावी, असे जनतेला वाटते ! – संपादक)

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *