Menu Close

ओ.टी.टी.वरील अनैतिकतेचा प्रसार रोखण्यासाठी कठोर कायदा करा – उदय माहूरकर, संस्थापक, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’

ओ.टी.टी.साठी नैतिकतेची आचारसंहिता बनवण्याचीही मागणी !

(‘ओटीटी’ या आस्थापनांनी दिलेल्या सेवेमुळे लोक चित्रपट, वेब सिरीज आदी मनोरंजन कार्यक्रम पाहू शकतात.)

डावीकडून श्री. रमेश शिंदे, श्री. उदय माहूरकर आणि स्वाती गोयल शर्मा

मुंबई – बलात्कार आणि लैंगिक अत्याचार यांमध्ये वाढ होण्यासाठी लैंगिक प्रसार सामग्री हा एक प्राथमिक घटक आहे, असे अभ्यासात आढळले आहे. हे लक्षात घेऊन ओ.टी.टी. प्लॅटफॉर्मवरील अशा लैंगिक, विकृत आणि अनैतिक सामग्रीचा प्रसार रोखण्यासाठी अशा सामग्रीवर सर्वसमावेशक बंदी घालावी. सर्व ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’साठी नैतिकतेची आचारसंहिता (‘एथिक्स कोड’) बनवावी, तसेच या कायद्यामध्ये कारावासाच्या शिक्षेचे प्रावधानही करावे. अशा सामग्रीला राष्ट्रविरोधी संबोधून त्याचे उत्पादन हा एक दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा मानला जावा अन् पुराव्याचा भार आरोपीवर टाकला जावा, अशा मागण्या, तसेच शिफारसी ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’चे संस्थापक आणि माजी केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर यांनी केल्या आहेत. ते प्रेस क्लब, मुंबई येथे २४ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी प्रख्यात पत्रकार आणि ‘जेम्स ऑफ बॉलीवूड’च्या सहसंस्थापिका स्वाती गोयल शर्मा आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे हेही उपस्थित होते.

२५ फेब्रुवारीला मुंबईत ‘ओ.टी.टी. आणि ‘फिल्मी दुनियेचे दुष्कर्म’ यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम !

ओ.टी.टी.वर चालू असलेल्या अश्‍लीलतेच्या प्रसाराविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘ओ.टी.टी. आणि फिल्मी दुनियेचे दुष्कर्म – वाढत्या बलात्कारांचे मुख्य कारण !’ हा विषय घेऊन रविवार, २५ फेब्रुवारी सायं ५.३० ते ७.३० या वेळेत सूर्यवंशी क्षत्रिय ऑडीटोरियम, वीर सावरकर मार्ग, दादर (प.), मुंबई येथे आयोजित कार्यक्रम आयोजित केला आहे. यात जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

श्री. उदय माहूरकर या वेळी म्हणाले

१. देशाला हादरवून सोडणार्‍या बलात्काराच्या अलीकडच्या धक्कादायक घटना पहाता यामागील मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न केला. याला सामोरे जाण्यासाठी आम्ही समविचारी संघटना आमचे प्रयत्न वाढवत आहेत.

२. धक्कादायक गोष्ट म्हणजे बलात्काराच्या प्रकरणांतील गुन्हेगारांनी त्यांच्या स्मार्टफोनवर सहज उपलब्ध असलेली लैंगिक सामग्री, विशेषतः ‘पोर्नोग्राफी’चा (लैंगिक लघुपटाचा) प्रभाव असल्याची स्वीकृती दिली.

३. या सर्व स्थितीत तातडीने पालट होण्यासाठी समविचारी संघटनांनी या आक्षेपार्ह सामग्रीचे वर्गीकरण आणि नियमन सुलभ करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायद्यात सुधारणा करण्याचा आग्रह धरला आहे.

४. भारताने आपल्या सांस्कृतिक सार्वभौमत्वावर ठाम रहाण्याची आणि आपली परंपरागत मूल्ये जपण्याची वेळ आली आहे.

५. लैंगिक विकृत सामग्रीच्या प्रसारणावर नियंत्रण आणून आमच्या देशाच्या नैतिक चौकटीचे रक्षण करू शकतो आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध भारताचे आमचे स्वप्न साकार करू शकतो.’’

लैंगिक विकृत सामग्रीमुळे निर्माण झालेल्या धोक्याचा सामना करण्याासठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक ! – स्वाती गोयल शर्मा, सहसंस्थापिका, ‘जेम्स ऑफ बॉलीवूड’

स्वाती गोयल शर्मा

लैंगिक विकृत सामग्रीचा प्रसार केवळ आपल्या सांस्कृतिक मूल्यांनाच नष्ट करत नाही, तर सामाजिक अस्वस्थतेलाही कारणीभूत ठरतो. या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी आणि आपल्या समाजाच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येणे अत्यावश्यक आहे. ‘जेम्स ऑफ बॉलिवूड’ने प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह सामग्रीचा प्रसार उघड करणारी ‘ओटीटी आक्षेपार्ह सामग्री संशोधन’ नावाची एक व्यापक श्‍वेतपत्रिका जारी केली आहे. हे संशोधन भारताच्या सांस्कृतिक अखंडतेचे रक्षण करते, तसेच स्त्रिया आणि मुले यांच्या संरक्षणासाठी सामूहिक कृतीची तातडीची आवश्यकता अधोरेखित करते.

भारतीय संस्कृतीचे पावित्र्य अल्प करणार्‍या आक्षेपार्ह मजकुरा विरोध करणे आवश्यक ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

आमची संस्था पारंपरिक मूल्ये जपण्याच्या आणि भारतीय संस्कृतीचे पावित्र्य अल्प करणार्‍या आक्षेपार्ह मजकुराच्या प्रसाराला विरोध करण्याच्या आपल्या संकल्पावर ठाम आहे. आम्ही धोरणकर्ते आणि संबंधित यांना या महत्त्वपूर्ण प्रयत्नात सहभागी होण्याचे आवाहन करतो.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *