Menu Close

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पकडण्यात आलेल्या १० बांगलादेशी नागरिकांना पोलीस कोठडी

बांदा येथे ६ आणि आरोंदा येथे ४ जणांचे होते वास्तव्य

बांगलादेशी घुसखोर

सिंधुदुर्ग (महाराष्ट्र) : जिल्ह्यात अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या एकूण १० बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी २४ फेब्रुवारी या दिवशी कह्यात घेतले होते. त्यातील ६ जण सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथे, तर ४ जण आरोंदा गावात वास्तव्य करत होते. या सर्वांना येथील न्यायालयाने २५ फेब्रुवारीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सिंधुदुर्गवासियांनी सतर्कता बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन

देशात अवैधरित्या वास्तव्य करणार्‍यांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याकरता केंद्रशासन, राज्यशासन, तसेच पोलीस महासंचालक या कार्यालयांकडून वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार गोपनीय यंत्रणा सतर्क करून अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या परकीय, तसेच बांगलादेशी नागरिकांची माहिती घेण्याची कार्यवाही चालू करण्यात आली होती. सिंधुदुर्गवासियांनी स्वत:च्या आजूबाजूस कुणी बांगलादेशी नागरिक अवैधरित्या वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यास याविषयी स्थानिक पोलीस ठाणे, तसेच पोलीस नियंत्रण कक्ष यांना माहिती द्यावी. हे १० नागरिक भारतात कसे आले ? त्यांना येथे येण्यासाठी कुणी साहाय्य केले ? त्यांच्यासह अन्य कोण आहेत का ? याची माहिती घेण्याचा प्रयत्न चालू आहे.

बांदा येथून ६ बांगलादेशी पोलिसांच्या कह्यात

२३ फेब्रुवारी या दिवशी बांदा आणि सावंतवाडी पोलीस ठाण्यांच्या सीमेत अवैधरित्या बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने बांदा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात बळवंतनगर येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याचे समजले. त्यानुसार बांदा पोलीस ठाण्याच्या पथकाने बळवंतनगर येथे जाऊन ६ नागरिकांना कह्यात घेतले अन् त्यांची चौकशी केली. त्या वेळी हे सर्व जण बांगलादेशी असल्याचे, तसेच त्यांनी भारतात येण्यासाठी आणि वास्तव्य करण्यासाठी पारपत्र काढलेले नसल्याचे उघड झाले. या ६ जणांच्या विरोधात बांदा पोलीस ठाण्यात विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १४ (अ), १४ (ब) आणि १४ (क), पारपत्र (भारतात प्रवेश) अधिनियम १९२० चे कलम ३ (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करून पुढील कायदेशीर कारवाई चालू करण्यात आली आहे.

आरोंदा येथून ४ नागरिक पोलिसांच्या कह्यात

सावंतवाडी तालुक्यातील देऊळवाडी, आरोंदा येथील श्री सातेरी भद्रकाली देवतांच्या मंदिराच्या मागे असलेल्या एका पत्र्याच्या शेडमधून ४ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी कह्यात घेतले. हेही नागरिक अवैधरित्या रहात असल्याचे निदर्शनास आले होते. तेथे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाईस प्रारंभ केला आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *