Menu Close

पंचगंगेचे प्रदूषण करणारा कत्तलखाना 15 दिवसांत बंद झाला नाही, तर नागरिक बंद पाडतील – हिंदुत्वनिष्ठांची चेतावणी

‘कत्तलखाना हटाव-पंचगंगा बचाव’ मोर्चा

नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र) – इचलकरंजी शहरातील ‘इचलकरंजी अ‍ॅग्रो फूडस् अ‍ॅण्ड ग्यामा एन्टरप्रायझेस’ या कंपनीकडून प्राण्यांच्या कातड्यावर प्रक्रिया केलेले, तसेच कत्तलखान्याचे रक्त आणि मांसमिश्रीत सांडपाणी विनाप्रक्रिया ओढ्यात सोडले जाते. हे पाणी पंचगंगा नदीत मिसळते. या पाण्यात विषारी घटक असल्यानेे नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत, तसेच नागरिकांना त्वचेचे विकारही होत आहेत. हेच पाणी पुढे कृष्णा नदीत मिसळून तीर्थक्षेत्र असलेल्या नृसिंहवाडी येथे जात असल्याने भाविकांच्या धार्मिक भावना दुखावत आहेत. या संदर्भात प्रदूषण मंडळ आणि महापालिका प्रशासन कोणतीच कारवाई करत नाही. तरी ‘इचलकरंजी अ‍ॅग्रो फूडस् अ‍ॅण्ड ग्यामा एन्टरप्रायझेस’ हा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा, या मागणीसाठी 500 हून अधिक हिंदुत्वनिष्ठ, शिवभक्त यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. या प्रसंगी पंचगंगेचे प्रदूषण करणारा कत्तलखाना 15 दिवसांत बंद झालाच पाहिजे; अन्यथा नागरिक तो बंद पाडतील, अशी चेतावणी ‘कत्तलखाना हटाव-पंचगंगा बचाव’ मोर्चाद्वारे देण्यात आली. मोर्चाच्या अंती नायब तहसीलदार संजय काटकर यांनी निवेदन स्वीकारले आणि या मागण्या वरिष्ठांच्या कानावर घालू असे आश्‍वासन त्यांनी दिले.

या मोर्चात ‘इचलकरंजी नागरिकांच्या जिवाशी खेळणारा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद झालाच पाहिजे’, ‘कत्तलखान्यास नि:शुल्क जागा आणि सुविधा देणार्‍या महापालिका धिक्कार असो’,‘इचलकरंजी येथील नागरिकांच्या जिवाशी खेळणारा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद झालाच पाहिजे’, यांसह देण्यात आलेल्या अन्य घोषणांनी शिवतीर्थ परिसर दणाणून गेला. या मोर्चासाठी तळमळीने कार्य करणारे आणि मोर्चाचे एक प्रमुख आयोजक श्री. संतोष हत्तीकर यांचे वडील कै. राजाराम हत्तीकर यांचे 25 फेब्रुवारीला अकस्मित निधन झाल्याने मोर्चाच्या प्रारंभी त्यांना श्रद्धांजली वहाण्यात आली, तसेच काही काळ ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप करण्यात आला.

मोर्चाला संबोधित करतांना प.पू. संतोष-बाळ महाराज

मोर्चा प्रांत कार्यालयावर आल्यावर मोर्चाला संबोधित करतांना प.पू. संतोष-बाळ महाराज म्हणाले, ‘‘महाराष्ट्राचे ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या इचलकरंजी शहरास आज पाण्याचा प्रश्‍न भेडसावत आहे. एका बाजूला पंचगंगेच्या पाण्याच्या प्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर होत असतांना महापालिकेने नदीच्या प्रदूषणात भर टाकणार्‍या या कत्तलखान्यास अनुमती देणे धक्कादायक आहे. या कत्तलखानाच्या आडून अनेक अवैध व्यवसाय होत आहेत. तरी या कत्तलखान्यावर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी आम्ही करत आहोत.’’

मोर्चाला संबोधित करतांना श्री. सुनील घनवट

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘‘या कत्तलखान्यात प्रतिदिन 350 ते 400 जनावरांची कत्तल केली जाते. महापालिका, प्रदूषण मंडळ यांचे सर्व नियम धाब्यावर बसवून हा कत्तलखाना चालू आहे. असे असूनही प्रशासन मात्र कागदी घोडे नाचवण्यापलिकडे काहीच करत नाही. वर्ष 2013 मध्ये इचलकरंजी शहरात आलेल्या कावीळीच्या साथीत 39 लोक मृत्यूमुखी पडले हाते. आताही कत्तलखान्याचे रक्त आणि मांसमिश्रीत पाणी पंचगंगा नदीत मिसळत आहे. चारच दिवसांपूर्वी पंचगंगा नदीच्या काठावर सहस्रो मासे मृत झाले होते. आता मासे मेले आहेत, त्याही पुढे जाऊन प्रशासन आता माणसे मृत्यूमुखी पडण्याची वाट पहात आहे का ? त्यामुळे येत्या 15 दिवसांत कत्तलखाना बंद न झाल्यास पुढील मोर्चा हा कत्तलखान्यावर असेल. या कत्तलखान्यात छुप्या पद्धतीने गोहत्या होते का ? त्याचाही शोध घेतला पाहिजे.’’ या प्रसंगी श्री. पंढरीनाथ ठाणेकर, श्री. शिवानंद स्वामी, तसेच शिवसेनेचे श्री. मोहन मालवणकर यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.

‘कत्तलखाना हटाव-पंचगंगा बचाव’ मोर्चात सहभागी हिंदुत्वनिष्ठ, शिवप्रेमी

 

या प्रसंगी प.पू. संतोष-बाळ महाराज, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री श्री. पंढरीनाथ ठाणेकर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. दत्ता पाटील, सर्वश्री जितेंद्र मस्कर, मनोहर म्हेत्रे, सचिन कुरुंदवाडे, शिवभक्त श्री. आनंदा मकोटे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. प्रसाद जाधव आणि श्री. गणेश सुतार, हिंदुत्वनिष्ठ श्री. विवेक स्वामी, शिवसेनेचे श्री. मोहन मालवणकर, विश्‍व हिंदु परिषदेचे शहराध्यक्ष श्री. बाळासाहेब ओझा, महेश सेवा समितीचे अध्यक्ष श्री. नंदकिशोर भूतडा, ह.भ.प. दीपक बरगाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री. रवी गोंदकर, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, अखिल भारत हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे, महिला आघाडीच्या सौ. शोभाताई शेलार-पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, ‘शिवशाही’ फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सुनील सामंत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे, यांसह आळते, इंगळी, हुपरी, रेंदाळ, कबनूर, शिरदवाड, अतिग्रे, साजणी, यड्राव, चंदूर, इचलकरंजी शहर येथील धर्मप्रेमी उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *