बंगालमधील संदेशखाली येथील हिंदु महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण !
उच्च न्यायालयाला असा आदेश द्यावा लागतो, यावरून बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती स्पष्ट होते ! बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावून तेथील परिस्थिती सुधारणे, हाच यावरील एकमेव उपाय आहे. – संपादक
कोलकाता (बंगाल) – कोलकाता उच्च न्यायालयाने संदेशखालीतील हिंदु महिलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात आरोपी असणारा तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहान याला अटक करण्याचा आदेश दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेख पसार आहे.
१. न्यायालयाने म्हटले की, शेख शाहजहानवर पोलीस कारवाई का करत नाहीत ? त्याच्या अटकेवर बंदी आहे का ? शेख शाहजहानच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून तो मुख्य आरोपी आहे. अशा परिस्थितीत त्याला तात्काळ अटक करण्यात यावी.
२. ‘संदेशखाली प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाने स्वतंत्र समिती स्थापन करावी’, अशी मागणी न्यायालयात एका याचिकाकर्त्याने केली आहे. या मागणीवर न्यायालयाने म्हटले, ‘आम्ही तसे करू; पण राज्य सरकार, पोलीस, सीबीआय आणि ईडी यांनी न्यायालयात उपस्थित रहावे.’
३. या प्रकरणात शेख शाहजहान आणि त्यांचे दोन सहकारी शिबू हाजरा अन् उत्तम सरदार या दोघांवर महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी शिबू हाजरा आणि उत्तम सरदार यांच्यासह १८ जणांना अटक केली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरावर आक्रमण
संदेशखाली येथील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे नेते शंकर सरदार यांच्या घरावर स्थानिक हिंदु महिलांनी आक्रमण केले आणि घराची तोडफोड केली, तसेच यापूर्वी तृणमूलचे नेते अजित मैती यांना चप्पलने मारहाण करण्यात आली होती.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात