Menu Close

मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करण्याची प्रक्रिया भाजपशासित राज्यांपासून चालू करावी !

‘अखिल भारतीय संत समिती’च्या राष्ट्रीय परिषदेत संतगणांची मागणी !

डावीकडून स्वामी ज्ञानेश्वर देवाचार्य, श्रीमहंत ज्ञानदेव सिंह, अविचल देवाचार्य, देवेंद्र फडणवीस, राजराजेश्वराचार्य, दिनेशचंद्र, स्वामी जीतेंद्रानंद सरस्वती

मुंबई – मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करण्याची प्रक्रिया भाजपशासित राज्यांपासून चालू करण्यात यावी, अशी मागणी ‘अखिल भारतीय संत समिती’च्या राष्ट्रीय परिषदेत करण्यात आली. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते पू. गौरीशंकर दास यांनी ही मागणी केली. इस्लामी अतिक्रमण करून मशिदींमध्ये रूपांतर करण्यात आलेली मंदिरे अतिक्रमणमुक्त करण्याची प्रक्रियाही भाजपशासित राज्यांपासून चालू करण्याची मागणीही पू. गौरीशंकर दास यांनी केली. या दोन्ही मागण्यांना परिषदेला उपस्थित सर्व संतांनी एकमुखी पाठिंबा दिला.

येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ येथे २ आणि ३ मार्च या कालावधीत अखिल भारतीय संत समिती राष्ट्रीय परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या परिषदेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह देशभरातील संतमहंत मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या परिषदेमध्ये हिंदु धर्मावरील विविध आघात आणि समस्या यांविषयी चर्चा करण्यात आली.

आलोक कुमार यांनी सांगितले की, श्री काशी-ज्ञानवापी यांविषयी पुरातत्व विभागाचा अहवाल आणि सापडलेले सर्व पुरावेही हिंदूंच्या बाजूने आहेत. श्री काशी-ज्ञानवापी आणि श्रीकृष्ण जन्मभूमी आम्ही राज्यघटनात्मकरित्या प्राप्त करू !

नोव्हेंबर २०२५ मध्ये होणार आंतरराष्ट्रीय हिंदू संमेलन ! – पद्मश्री स्वामी ब्रह्मानंदेशाचार्य

जगातील १०० हून अधिक देशांत हिंदू रहातात. ते त्या-त्या देशांत सामाजिक आणि आर्थिक योगदान देतात. जगातील या सर्व हिंदूंच्या मार्गदर्शनासाठी अखिल भारतीय संत समितीचा विस्तार आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात येणार आहे. यासाठी नोव्हेंबर २०२५ मध्ये वाराणसी येथे आंतरराष्ट्रीय हिंदू संमेलनाचे आयोजन केले जाईल.

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचे आवाहन !

अयोध्येत प्रभु श्रीरामांचे भव्य मंदिराच्या निर्माणामुळे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. याचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना विजयी करून पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचे आवाहन या परिषदेत उपस्थित सर्व संतांनी केले. या वेळी स्वामी विश्वेश्वरानंद गिरि यांनी मंदिरातील अर्पणाचा उपयोग केवळ हिंदु समाजासाठी व्हावा, असे मत व्यक्त केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काशी, अयोध्या आणि जगन्नाथपुरी प्रमाणे महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा विकास केला जाईल, असे आश्वासन या परिषदेत दिले. परिषदेला उपस्थित सर्व संतगणांचे श्री. ऋत्विक औरंगाबादकर यांनी आभार मानले.

हिंदूंसाठी आचारसंहितेची निर्मिती होणार !

पालटणार्‍या काळानुसार हिंदूंसाठी आचारसंहिता निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती या परिषदेत देण्यात आली. श्रीकाशी विद्वत परिषदेद्वारा या संहितेचे प्रारूप निर्माण करण्यात येत असून हे कार्य अंतिम टप्प्यात आहे. हे प्रारूप सिद्ध झाल्यानंतर हिंदु धर्मातील १२७ संप्रदायांच्या आचार्यांद्वारे या संहितेची समीक्षा करून ती हिंदूंसाठी लागू करण्यात येईल, असे या वेळी सांगण्यात आले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *