Menu Close

मुंबईजवळील घारापुरी गुहा भगवान शिवाचे प्राचीन स्थान; महाशिवरात्रीला पूजेची अनुमती मिळावी !

महाराष्ट्र मंदिर महासंघाची केंद्रीय पुरातत्व विभागाकडे मागणी !

घारापुरी लेणी

मुंबई – येथील घारापुरी बेटावर असलेल्या घारापुरी लेण्यांमधील शिवपिंड हे भगवान शिवाचे प्राचीन स्थान आहे. हिंदूंचे धार्मिक स्थान असलेल्या या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी समस्त हिंदूंना पूजेची अनुमती मिळावी, यासाठी ७ मार्च या दिवशी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने केंद्रीय पुरातत्व विभागाच्या मुंबई विभागीय कार्यालयात निवेदन देण्यात आले. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. पुरातत्व विभागाच्या प्रादेशिक निर्देशक श्रीलक्ष्मी टी. यांनी या वेळी निवेदन स्वीकारले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. बळवंत पाठक, वज्रदल संघटनेचे संजय चिंदरकर यांसह हिंदुत्वनिष्ठ वेणुगोपाळ बल्ला, विलास निकम हे उपस्थित होते. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत देशभरात जेवढी धार्मिक स्थाने आहेत, त्या सर्व ठिकाणी पूजेची अनुमती मिळावी, यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आवाज उठवण्यात आला आहे. ८ मार्च या दिवशी महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्वप्रथम घारापुरी गुहेतील शिवपिंडीच्या पूजेची अनुमती द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे.

असा झाला लढ्याला प्रारंभ !

शिवपिंडीची प्रातिनिधिक पूजा

सर्वप्रथम सुदर्शन वाहिनीचे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी १४ फेब्रुवारी २०२४ या दिवशी झालेल्या एका कार्यक्रमात उपस्थित हिंदूंना घारापुरी येथील शिवपिंडीच्या ठिकाणी पूजेसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनावरून १५ फेब्रुवारी या दिवशी श्री. सुरेश चव्हाणके, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांच्या नेतृत्वाखाली हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तेथील शिवपिंडीची प्रातिनिधिक पूजा केली. महाराष्ट्र मंदिर महासंघाने पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्वच धार्मिक स्थळी पूजेचा अधिकार मिळावा, या मागणीसाठी आंदोलन उभारले आहे.

घारापुरी बेट हे भगवान शिवाचे प्राचीन धार्मिक स्थळ !

घारापुरी येथील लेण्यांना ‘युनेस्को’ने (‘संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्थे’ने) ‘वारसास्थळ’ म्हणून मान्यता दिली आहे. या लेण्या ६ व्या ते ८ व्या शतकांतील असल्याचे मानले जाते. येथील ५ गुहा एकाच भव्य शिलेमध्ये असून येथील दगडांवर भगवान शिवाच्या विविध कथांमधील प्रसंगांची भव्य शिल्पे कोरण्यात आली आहेत. ही शिल्पे म्हणजे भारतीय शिल्पकलेचा सर्वोत्कृष्ट नमुना मानला जातो. पोर्तुगिजांच्या काळात या शिल्पांची तोडफोड केली गेली. ब्रिटिशांच्या काळात या शिल्पांवर चक्क गोळीबारीचा सराव करून याची विटंबना करण्यात आली. त्यामुळे सद्यःस्थितीत येथील बहुतांश शिल्पे भग्न झाली आहेत. ही लेणी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असून सध्या तेथील शिवपिंडीची पूजा-अर्चा बंद आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *