मुंबई – पुरातत्व विभागाने केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यापूर्वी, तसेच युनेस्कोने ‘जागतिक वारसा’ म्हणून घोषित करण्याच्या आधीपासून हिंदूंचे प्राचीन धार्मिक स्थान असलेल्या घारापुरी गुहेतील शिवपिंडीचे महाशिवरात्रीच्या दिवशी सहस्रावधी भाविकांनी दर्शन घेतले. भाविकांनी शिवपिंड आणि ब्रह्मा-विष्णु-महेश या त्रिमूर्तींचे मनोभावे पूजन केले. पहाटेपासून सायंकाळी उशिरापर्यंत येथे दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
उरण तालुक्यातील विविध गावांसह आजूबाजूच्या ग्रामस्थांनी महाशिवरात्रीला घारापुरी येथे येऊन भगवान शिवाची पूजाअर्चा केली. ‘जागतिक वारसा’ म्हणून दर्जा असल्यामुळे, तसेच केंद्रीय पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक असल्यामुळे घारापुरी गुहेतील शिवपिंडीची पूजाअर्चा करण्यास पुरातत्व विभागाकडून प्रतिबंध आहे. केवळ पर्यटनस्थळ म्हणून पाहिले जात असल्यामुळे अनेकजण येथे पादत्राणे घालून प्रवेश करतात. हिंदूंना या ठिकाणी नियमितपणे, तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ने आंदोलन केले होते. केंद्रीय पुरातत्व विभागाकडे महासंघाने निवेदनाद्वारे तशी मागणीही केली आहे. घारापुरी ग्रामपंचायतीकडूनही घारापुरी गुहा हे शिवाचे प्राचीन धार्मिक स्थान असल्याचे पत्र वेळोवेळी पुरातत्व विभागाला देण्यात आले आहे; मात्र केंद्रीय पुरातत्व विभागाकडून हा विषय डावलण्यात येत आहे. अद्यापही याविषयीची अधिकृत भूमिका केंद्रीय पुरातत्व विभागाकडून घोषित करण्यात आलेली नाही.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात