Menu Close

सातारा जिल्ह्यातील ३२ हून अधिक मंदिरांमध्ये आदर्श वस्त्रसंहिता लागू ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)

पत्रकार परिषदेला संबोधित करतांना श्री. हेमंत सोनवणे, अधिवक्ता दत्तात्रय कुलकर्णी, शिवाजीराव तुपे, श्री. सुनील घनवट, दत्तात्रय सणस, सौ. रूपा महाडिक

सातारा – राज्यशासनाने वर्ष २०२० मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात आदर्श वस्त्रसंहिता लागू केली आहे. एवढेच नाही, तर देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी अन्य प्रार्थनास्थळे, खासगी आस्थापना, शाळा-महाविद्यालये, न्यायालये, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे. याच पार्श्‍वभूमीवर मंदिरांचे पावित्र्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील ३२ हून अधिक मंदिरांच्या विश्‍वस्तांनी मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीला अनुरूप आदर्श वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिले. राजवाडा येथील समर्थ सदनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

या वेळी व्यासपिठावर महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सातारा जिल्हा निमंत्रक आणि पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिराचे सचिव श्री. शिवाजीराव तुपे, नागठाणे येथील चौंडेश्‍वरी देवस्थानचे विश्‍वस्त अधिवक्ता दत्तात्रय कुलकर्णी, हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख कार्यवाह अधिवक्ता दत्तात्रय सणस, रणरागिणी शाखेच्या सौ. रूपा महाडिक, हिंदु जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. घनवट पुढे म्हणाले

१.  ५ फेब्रुवारी २०२३ या दिवशी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना झाली. महासंघाचे कार्य उत्तरोत्तर वाढत असून केवळ वर्षभरातच ते संपूर्ण राज्यात पोचले आहे. तुळजापूर मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यासाठी विरोध झाला; मात्र सध्या महाराष्ट्रात ४५७ हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.

२. मंदिरांमध्ये देवदर्शनासाठी तोकड्या कपड्यात किंवा परंपराहिन वेशभूषेत जाणे, हे ‘व्यक्तीस्वातंत्र्य’ असू शकत नाही. प्रत्येकाला आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत, याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे; मात्र मंदिर हे धार्मिक स्थळ आहे. तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचरण व्हायला हवे. तेथे व्यक्तीस्वातंत्र्याला नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे.

या वेळी श्री. शिवाजीराव तुपे यांनी सात्त्विक भारतीय पोशाखाचे महत्त्व विशद करत मंदिरांमध्ये सात्त्विक वस्त्रसंहितेविषयीचे सूचना फलक लावण्यासाठी मंदिर विश्‍वस्तांना आवाहन केले. अधिवक्ता दत्तात्रय कुलकर्णी यांनी मंदिर विश्‍वस्तांनी सजगतेने सात्त्विक वस्त्रसंहितेसाठी दर्शनाला येणार्‍या भाविकांमध्ये जागृती करण्याविषयी मनोगत व्यक्त केले. अधिवक्ता दत्तात्रय सणस यांनी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ला सर्वतोपरी कायदेशीर साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले.

 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *