Menu Close

साम्‍यवादी विचारांचा पगडा असलेल्‍या ‘जे.एन्.यू.’मध्‍ये अभ्‍यासता येणार छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र !

छत्रपती शिवाजी महाराज
मुंबई साम्‍यवादी विचारांचा पगडा असलेल्‍या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (‘जे.एन्.यू.’त) छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्‍यांच्‍या चरित्रासह सर्वांगाने अभ्‍यास करण्‍यासाठी अध्‍यासन केंद्र उभारले जाणार आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज अध्‍यासन केंद्र’ असे या केंद्राचे नाव असून यासाठी महाराष्‍ट्र शासनाने १० कोटी रुपयांचा निधी संमत केला आहे. या अध्‍यासन केंद्रामध्‍ये छत्रपती शिवरायांचे चरित्र, धोरण, राज्‍यकारभाराची पद्धत आणि शिकवण यांचा अभ्‍यास करता येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या ३५० व्‍या राज्‍याभिषेक महोत्‍सवानिमित्त महाराष्‍ट्राचे सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अशा प्रकारचे अध्‍यासन केंद्र उभारण्‍याची संकल्‍पना मांडली होती. जवाहरलाल नेहरू विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. शांतीश्री पंडित यांच्‍यासमवेत सुधीर मुनगंटीवार यांनी याविषयीची चर्चा केली आहे. या अध्‍यासनासाठी अभ्‍यासक्रम आखण्‍यासाठी, विषय मांडणीसाठी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍याविषयी संशोधनासाठी महाराष्‍ट्र शासन जवाहरलाल नेहरू विद्यापिठाला सहकार्य करणार आहे. स्‍वत: सुधीर मुनगंटीवार यामध्‍ये लक्ष घालणार आहेत. महाराष्‍ट्र शासनाकडून लवकरच हा निधी वितरित केला जाणार आहे.

 

गमिनी काव्‍याचेही होणार संशोधन !

छत्रपती शिवाजी महाराज यांची अंतर्गत सुरक्षा, पश्‍चिम हिंदी महासागरातील मराठा नौदल रणनीती, गनिमी कावा, गड-दुर्गांच्‍या तटबंदीतील रणनीती, मराठा इतिहास आदी विषयावर संशोधनात्‍मक कार्य होणार आहे. या अध्‍यासनाद्वारे मराठी भाषेतूनही पदविका, पदवी आणि विद्यावाचस्‍पती पदवी (पी.एच्.डी.) दिली जाणार आहे. मराठा साम्राजाची सैन्‍य व्‍यूहरचना, गड आणि तटबंदी रचना यांविषयीचा अभ्‍यासक्रम येथे उपलब्‍ध असणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्‍या नियमानुसार हे अध्‍यासन कार्य करणार आहे.

छत्रपती शिवरायांचा सर्वांगाने अभ्‍यास होणे आवश्‍यक ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्‍कृतिक कार्यमंत्री, महाराष्‍ट्र

सुधीर मुनगंटीवार, सांस्‍कृतिक कार्यमंत्री, महाराष्‍ट्र
छत्रपती शिवरायांचा रणसंग्रामातील पराक्रमच नव्‍हे, तर त्‍यांचा राज्‍यकारभार, त्‍यांचे राज्‍यकारभारातील तत्त्वज्ञान, राज्‍यकारभाराकरता उभारलेली सुसंघटित प्रशासकीय यंत्रणा, राज्‍यकारभारात स्‍वभाषेला दिलेले महत्‍व, परराष्‍ट्रविषयक धोरण, परकीय आक्रमण मोडून स्‍वकीय राज्‍य उभारण्‍याचे कार्य, महाराजांचे राजकीय तत्त्वज्ञान यांसह भारताचे राजकारण आणि समाजमन यांवर महाराजांच्‍या कारभाराचा दीर्घकालीन सकारात्‍मक परिणाम, यांचा अभ्‍यासही अध्‍ययन केंद्रात व्‍हायला हवा. छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्‍यवस्‍थापन कौशल्‍य, त्‍यांची व्‍यवस्‍थापनाची तत्त्वे, संस्‍कृती, मंदिरे, व्‍यापार, शेती, जलसंधारण आणि सिंचन, गाव, वस्‍त्‍या तसेच शहरे यांचे व्‍यवस्‍थापन अन् नियोजन, संरक्षण यंत्रणा यांविषयीची धोरणे, व्‍यवस्‍थापन, परकीय आक्रमकांविषयीचे धोरण, संत-महात्‍मे यांविषयीचे धोरण, अशा विविध अंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि राज्‍यकारभार यांचा अभ्‍यास केंद्रात होणे आवश्‍यक आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *