लंडन : आर्थिक विपन्नावस्था आणि अनेक वर्षांच्या यादवीतून सुटका करून घेण्यासाठी सीरियातून आलेल्या १० शरणार्थींना आश्रय देण्याऐवजी दोन लाख पौंडाचा दंड भरण्याचा निर्णय स्वित्झर्लंडमधील एका श्रीमंत गावातील रहिवाशांनी घेतला आहे.
राजकीय अस्थिरतेने ग्रासलेल्या आफ्रिका व आशिया खंडातील देशांमधून युरोपमध्ये आलेल्या शरणार्थींपैकी ५० हजार जणांना आश्रय देण्याचा निर्णय स्वित्झर्लंडने घेतला आहे. या शरणार्थींना देशातील २५ विविध राज्यांमध्ये वसविण्यात येणार असून त्यासाठी कोटा ठरवून देण्यात आला. ठरलेल्या शरणार्थींना आश्रय न दिल्यास दंड भरावा लागणार आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या आॅबेरविल-लिएली या गावात या कोटा पद्धतीनुसार सीरियातून आलेल्या १० शरणार्थींना वसविण्यात यायचे होते. हे गाव अतिश्रीमंत असून युरोपमधील सर्वात श्रीमंत गावांमध्ये त्याची गणना होते. गावाची एकूण लोकसंख्या २२ हजार असून त्यापैकी ३०० व्यक्ती दशलक्षाधीश आहेत.
शरणार्थींना आश्रय द्यायचा की नाही यावर आॅबेरविल-लिएली गावात सार्वमत घेण्यात आले व त्यात बहुसंख्य रहिवाशांनी ‘शरणार्थी नकोत’ असे मत दिले. यानंतर गावात फूट पडली. शरणार्थी स्वीकारण्यास नकार देणाऱ्यांवर वांशिक पक्षपाताचा आरोप केला जात आहे. गावाचे मेयर आंद्रियास ग्लॅरनर यांनी मात्र या आरोपाचे खंडन केले आहे.
संदर्भ : लोकमत