विविध मोहिमांच्या माध्यमातून युवा वर्ग कृतीशील होणे, हे हिंदु राष्ट्र स्थापनेचे दर्शकच होय ! -संपादक
सोलापूर (महाराष्ट्र) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वृत्तीची तरुण पिढी निर्माण करण्यासाठी आणि तरुण पिढीला ध्येयवादी बनवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ असा दृष्टीकोन ठेवून भुईकोट गड येथे एकदिवसाच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. समितीचे श्री. मिनेश पुजारे, श्री. धनंजय बोकडे आणि श्री. रोहन कलशेट्टी यांनी सहभागी युवकांना मोहिमेचा उद्देश सांगितला. सहभागी युवकांनी गडावर स्वच्छता करत प्लास्टिकच्या बाटल्या गोळ्या केल्या. युवकांनी गड परिसरात असलेल्या पुरातन महादेव मंदिराची स्वच्छता केली. या मोहिमेत जिल्ह्यातील पुष्कळ युवक-युवती सहभागी झाले होते.
या प्रसंगी समितीच्या कु. वर्षा जेवळे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. शेवटी हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन इतिहासाचा जागर करत मोहिमेचा समारोप करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन युवकांनी राष्ट्र-धर्म कार्यात झोकून द्यावे ! – दत्तात्रय पिसे, हिंदु जनजागृती समिती
या मोहिमेच्या समारोप प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे यांनी सहभागी युवकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक बळाच्या जोडीला आध्यात्मिक बळही प्राप्त केले होते. हे आध्यात्मिक बळ त्यांचे गुरु श्री समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराम महाराज यांच्याकडून त्यांना मिळाले. याचा परिणाम इतिहास घडण्यात झाला. त्यामुळे हिंदुत्वाचे कार्य करणार्यांनी छत्रपतींपासून प्रेरणा घेऊन आजच्या काळात हिंदु राष्ट्र स्थापन कारण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक बळासह साधना करून आध्यात्मिक बळ प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा !
अभिप्राय
१. श्री. अग्नी चेलमल, नरसिंग विडी घरकुल, सोलापूर – गडाची स्वच्छता करायला मिळाली. सेवा करायला मिळाली. त्यामुळे आनंद वाटला. यापुढे अशी कोणतीही मोहीम असली तरी मला सांगा, मी सहभागी होईन.
२. श्री. आनंद झिंगाडे, नवीन विडी घरकुल, सोलापूर – ‘पुन्हा कधी मोहीम करूया’, असे सारखे वाटत आहे. आता असेच सातत्याने हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करायचे आहेत.
३. कु. संजना रोहिटे, जुना विडी घरकुल, सोलापूर – या मोहिमेत सहभागी होऊन पुष्कळ आनंद मिळाला. ‘येथून पुढे समितीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्रासाठी राबवण्यात येणार्या प्रत्येक उपक्रमात मी सक्रीय सहभागी होणार’, असे मी ध्येय घेते.
४. श्री. अमोघसिद्ध खजुर्कर, डोणगाव – शिवरायांचे मावळे जसे प्रयत्न करत होते, तसे मनाचे आत्मबळ, लढण्याचे शास्त्र शिकता आले. मावळे ज्या विचाराने एकत्र होते, त्याचप्रमाणे आपण हिंदु जनजागृती समितीच्या या मोहिमेमुळे एकत्र आलो आहोत. आपले विचार एक होत आहेत, असे जाणवते. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी जसा श्री भवानीदेवीचा नामजप केला, तसा आपणही करायला हवा’, असे शिकायला मिळाले.