नवी देहली – ज्ञानवापी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यास तळघरात हिंदूंना पूजा करण्याची अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. वाराणसी जिल्हा न्यायालयाने हिंदूंना ज्ञानवापीच्या दक्षिणेकडील तळघर असलेल्या व्यास तळघरात देवतांची पूजा करण्याची अनुमती दिली होती, जी उच्च न्यायालयानेही कायम ठेवली होती.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, १७ जानेवारी आणि ३१ जानेवारी या दिवशी दिलेल्या आदेशानंतर मुसलमानांकडून ज्ञानवापी परिसरात कोणताही अडथळा न येता नमाजपठण केले जात आहे, तर हिंदू करत असलेली पूजा तेथील तळघरापुरती मर्यादित आहे. तळघर सध्या आहे त्या स्थितीत ठेवले पाहिजे जेणेकरून दोन्ही समुदाय वरील अटींनुसार धार्मिक कृती करू शकतील. पूजा करण्यासाठी जाण्याचा आणि नमाजपठण करण्यासाठी जाण्याचा मार्ग वेगवेगळा असल्याने त्यामुळे कसलीही अडचण येत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात