माता सीता आणि श्री हनुमान यांचा अवमान करणारे नाटक सादर केल्याचे प्रकरण
पुद्दुचेरी – पुद्दुचेरी विद्यापिठात काही दिवसांपूर्वी सादर झालेल्या हिंदुविरोधी ‘सोमयनाम्’ नाटकाच्या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने ‘प्रदर्शन कला विभागा’च्या विभागप्रमुखाला पदावरून हटवले आहे. ‘इझिनी २०२४’ या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी हे नाटक सादर करण्यात आले. यात माता सीता आणि श्री हनुमान यांचा अवमान करण्यात आला होता. त्याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले होते.
या नाटकाच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारही प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. पोलिसांनी या नाटकाचे दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.
विद्यापिठाचे साहाय्यक निबंधक डी. नंदगोपाल यांनी ‘विद्यापिठामध्ये शांततापूर्ण आणि बंधुभावपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. विद्यापीठ परिसरात धार्मिक भावना दुखावणारे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही,’ असे स्पष्ट केले.