विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई – अलीबागला हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचे सुभेदार ‘मायनाक भंडारी’ यांचे नाव द्यावे. अलीबागचे नामकरण ‘मायनाकनगरी’ असे करावे, अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याविषयी २२ मार्च या दिवशी नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
हिंदवी स्वातंत्र्यपूर्व काळात येथील मायनाक भंडारी यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला. त्यांच्या पराक्रमाची आठवण म्हणून ‘अलीबाग’ शहर आणि ‘अलीबाग’ तालुका यांचे नामकरण ‘मायनाकनगरी’ करावे, असे नार्वेकर यांनी पत्रात म्हटले आहे. अलीबाग येथे मायनाक भंडारी यांचे भव्य स्मारक बांधण्याची मागणीही राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. अखिल भारतीय भंडारी महासंघाच्या मागणीवरून राहुल नार्वेकर यांनी ही नामांतराची मागणी केली आहे.
सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी मात्र अलीबागचे नामांतर केल्यास ‘सरखेल कान्होजी राजे आंग्रे’ यांचे नाव द्यावे, असे मत व्यक्त केले आहे.
अलीबाग हे नाव अली नावाच्या एका इतिहासकालीन अधिकारी व्यक्तीवरून पडले आहे.
कोण होते मायनाक भंडारी ?
मायनाक भंडारी हे दर्यासारंग शिवाजी महाराजांच्या आरमाराचे सुभेदार होते. वर्ष १६७९ मध्ये मुंबई बंदरावरील खांदेरी-उंदेरी हा भूभाग कह्यात घेण्यासाठी इंग्रजांनी सैन्य पाठवले. त्या वेळी इंग्रजांच्या आरमाराला तोंड देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी मायनाक भंडारी यांना पाठवले. मायनाक भंडारी यांनी चिकाटीने लढा देऊन इंग्रजांना पराभूत केले. हिंदवी स्वराज्यासाठी मायनाक भंडारी यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे येथील सुवर्णदुर्ग जिंकला. रत्नागिरी जिल्ह्यातील भाटे येथे मायनाक भंडारी यांची समाधी आहे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात
0 Comments