१. मुझफ्फरपूर शहराचे नाव पालटण्यासाठी प्रयत्न
मी भारत आणि नेपाळ यांच्या सीमावर्ती भागातील ‘मिथिलांचल’मधून आलो आहे. ही सीतामातेची जन्मभूमी असून याचा मला अभिमान आहे. जिल्ह्याचे नाव विचारल्यास मात्र मला दुर्दैवाने ‘मुझफ्फरपूर’ असे सांगावे लागते. याचे मला फार वाईट वाटते; कारण हे नाव एका परकीय आक्रमकाच्या नावावर आधारित आहे. मी शिकत असतांना विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होतो. तेव्हापासून मला ‘मुजफ्फरपूर’ हे नाव खटकत होते. वर्ष १९८० मध्ये मी ‘आपल्या शहराचे नाव पालटले पाहिजे’, असे माझ्या सर्व मित्रांना सांगितले. त्यात काही अन्य संघटनांतील मित्रही होते. एक दिवस आम्ही एकत्र बसून ‘यापुढे आपण ‘मुझफ्फरपूर’ असे म्हणायचे नाही’, असे ठरवले.
२. क्रांतीकारक खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चंद चाकी यांच्यामुळे मुझफ्फरपूर इतिहासात प्रसिद्ध !
मुझफ्फर खां नावाचा अकबराचा तहसीलदार होता. त्याच्या नावाचे येथे एक गाव होते. तेथे तो महसूल गोळा करण्याचे काम करत होता. त्याने गावाचे मूळ नाव पालटून त्याला स्वत:चे नाव दिले. त्यामुळे आम्ही या गावाला ‘मोदफलपूर’ असे म्हणायचे ठरवले.
मुझफ्फरपूर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. वर्ष १८५७ मधील स्वातंत्र्ययुद्ध काही कारणास्तव सुप्त झाले होते. त्यानंतर दीर्घकाळापर्यंत असे वाटू लागले की, आता भारताचे लोक स्वातंत्र्यासाठी कोणतेही युद्ध करणार नाहीत. अशा वेळी मुझफ्फरपूरच्या मातीत ‘खुदीराम बोस’ आणि ‘प्रफुल्ल चंद चाकी’ हे दोन युवक संघर्षासाठी उभे राहिले. त्यांनी स्वातंत्र्यासाठी बलीदान दिले. त्यामुळे मुझफ्फरपूर सर्वत्र ओळखले जाऊ लागले.
३. मुझफ्फरपूरचे ‘मोदफलपूर’ नामकरण
दुसरी गोष्ट मुझफ्फरपूरची ‘शाही लिची’ संपूर्ण जगात ओळखली जाते. त्यामुळे मुझफ्फरपूरला ‘स्वीट सिटी’ असेही म्हटले जाते. अशा प्रकारे वर्ष १९८० ते १९८२ च्या आसपास समविचारी संघटनांना संघटित करून एकत्र बसण्याची पद्धत चालू झाली. आम्ही २०-२५ लोकांसमवेत समन्वय समिती बनवली होती, ती ४०- ४५ वर्षांपासून कार्य करत आहे. मुझफ्फरपूर नाव पालटण्यामागील तर्क असा आहे की, मुझफ्फरपूरची ‘लिची’ ही मोदकासारखी किंवा लाडूसारखी दिसते. त्यामुळे त्याचे नाव ‘मोदफल’ असले पाहिजे आणि त्यावरून गावाचे नाव ‘मोदफलपूर’ असे करण्यात आले. तेव्हापासून आम्ही ‘मुझफ्फरपूर शहराचे नाव ‘मोदफलपूर करण्यात यावे’, याविषयी निवेदन दिले. यासाठी स्थानिक प्रशासनाचा अनेक वेळा पाठपुरावा केला; पण प्रशासनाने अद्याप तसे केले नाही.
आम्ही हा विषय लावून धरला आहे. आम्ही आर्य समाज मंदिरामध्ये रितसर यज्ञ हवन करून मुझफ्फरपूरचे ‘मोदफलपूर’ असे नामकरण केले आहे. त्या वेळी २०० हून अधिक हिंदू उपस्थित होते.
४. पशूवधगृह बंदीसाठी प्रयत्न
आम्ही विविध संघटनांशी समन्वय साधून कार्य करतो. आम्ही केवळ शहराचे नामकरणच नाही, तर विविध क्षेत्रांमध्ये कार्य करत आहोत. मुझफ्फरपूर हे एक लहानसे शहर आहे. त्याची लोकसंख्या अनुमाने ५ लाख असून त्यात ५० सहस्र मुसलमान आहेत. त्यांच्याकडून अनुमाने १५० पशूवधगृहे चालवली जात होती. ती बंद करण्यासाठी आम्ही पुष्कळ प्रयत्न केले. आम्ही केंद्र सरकारच्या ‘क्रूएलिटी प्रिव्हेंशन सोसायटी’ला लेखी कळवले असता त्यांनीही प्रयत्न केले. त्यांनी एका महिलेला कार्यकारी अधिकारी म्हणून पाठवले. त्यांनी कार्यवाही करण्यासाठी आमच्या समवेत पोलिसांना जाण्यास सांगितले. तेव्हा पोलीस मुळीच सिद्ध नव्हते. ‘ज्या क्षेत्रात सर्वाधिक पशूहत्या होते आणि मांस सीलबंद करून पाठवले जाते, तेथे त्यांनी धाड घालावी’, असे आम्ही त्यांना सांगितले; पण त्यांनी ऐकले नाही. स्थानिक पोलीस ठाण्यातील लोक म्हणायचे, ‘आम्ही दिवसा नाही, तर रात्री धाड घालू.’ तेथे रात्री गेल्यावर एवढी भयाण शांतता असायची की, गायींवर तलवारी चालवणारे ते लोक कदाचित् आम्हालाच ठार मारतील, असे वाटत होते. त्यांना हात लावण्यास पोलीस धजत नव्हते. धर्मांधांच्या मनात कसलीही भीती नव्हती, तर पोलिसांना प्रत्येक सप्ताहाला पैशाचे भले मोठे पाकीट (लाच) मिळत होते. त्यामुळे ते त्यांना हात लावू इच्छित नव्हते. अशाही परिस्थितीत आम्हाला यश मिळाले.
पशूवधगृहापासून ६-७ किलोमीटर अंतरावर औद्योगिक क्षेत्र आहे. तेथे काहींनी अन्न प्रक्रियेसाठी परवाने घेऊन ठेवले होते. त्याच ठिकाणी गोमांस सीलबंद करून ते देश-विदेशात पाठवले जात होते. केंद्र सरकारच्या विभागांचे साहाय्य मिळाल्यावर आम्हाला तेथे धाड घालता आली. त्या धाडीमध्ये एका रात्रीत ५०० टन गोमांस सापडले. त्या भागात एकूण १५० पशूवधगृहे होती, जी सर्व बंद झाली. दुर्दैवाने अशा गोष्टींमध्ये सामान्य जनता साहाय्याला पुढे येत नाही. केवळ आपल्यालाच पुढाकार घेऊन या गोष्टी कराव्या लागतात.
कालांतराने ती पशूवधगृहे पुन्हा उघडू लागली. एक बाजूला आम्ही ती बंद करत होतो, तर दुसर्या बाजूने ती उघडली जात आहेत. पशूधनाची अनेक वेळा तस्करी होते. त्यात आम्हालाच खटला सहन करावा लागतो. आमच्यावर दरोडा घालण्याचा खटला प्रविष्ट (दाखल) केला जातो. जेव्हाही आम्ही काही कृती करतो, तेव्हा आमच्यावर गंभीर कलमे लावली जातात. अशा प्रकारे आमच्या ‘समन्वय समिती’मध्ये हिंदु जनजागृती समितीसह १४-१५ संघटना आहेत.
५. धर्मांतर केलेल्या हिंदूंना परत स्वधर्मात घेणे
गेल्या ४ दशकांपासून आमची समन्वयक समिती धर्मांतर केलेल्या हिंदूंना स्वधर्मात घेण्याचे कार्य (शुद्धीकरण) करत आहे. केवळ मुझफ्फरपूर किंवा मोदफलपूर जिल्ह्यातच नाही, तर आसपासच्या जिल्ह्यातही आमच्या या कार्याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे. आम्ही लोकांचे शुद्धीकरण करून घेतो. त्यांना आश्रय, संरक्षण, नोकरी मिळवून देतो, तसेच त्यांना व्यवसाय करण्यासाठी साहाय्य करतो. त्यामुळे ‘सीतामढी’ आणि ‘शिवहर’ इत्यादी सीमावर्ती जिल्ह्यांमधूनही शुद्धीकरण करण्याविषयी भ्रमणभाष येतो.
६. झोपडपट्टीमध्ये मूलभूत सुविधांचा विकास
मुझफ्फरपूरमध्ये श्रावणी मेळा भरतो. या श्रावणी मेळ्यात आम्ही लोक प्रत्येक वर्षी शिबिर आयोजित करतो. साधारणतः आमचे २०० कार्यकर्ते हे समन्वय समितीविषयी सांगतात. बिहारची सर्वांत मोठी झोपडपट्टी ही मोदफलपूर शहरापासून २ किलोमीटर अंतरावर आहे. ती झोपडपट्टी आमच्या समन्वय समितीच्या वतीने दत्तक घेण्यात आली आहे. पूर्वी या वस्तीत शाळा नव्हती, तसेच तेथे कोणतीही वैद्यकीय व्यवस्था, रस्ते, पाणी, यांची सुविधा नव्हती. हे सर्व बिहारमध्ये ‘जंगलराज’ असे म्हटले जात होते, त्या वेळी केले.
७. राष्ट्रवादी साहित्यकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे
साम्यवाद्यांची बौध्दिक जगात दहशत आणि वर्चस्व आहे. त्याप्रमाणे मोदफलपूरमध्येही बिहारमधील साम्यवाद्यांची संघटना आहे. त्यांचे वर्चस्व असल्यामुळे जे साहित्यिक त्यांच्या मंचाचे सदस्यत्व घेत नाहीत, त्यांच्या साहित्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात नाही. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळत नाही. त्यामुळे आम्ही हिंदीतील राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या नावाने ‘राष्ट्रकवी दिनकर अकादमी’ स्थापन केली. तेथे त्यांच्या समांतर २० वर्षांपूर्वीपासून कवीसंमेलनाचा कार्यक्रम चालू केला आहे. वर्ष २००८ मध्ये दिनकर यांची जन्मशताब्दी होती, तेव्हा आम्ही ‘राष्ट्रकवी दिनकर अकादमी’ स्थापन केली. आता हा कार्यक्रम प्रतिवर्षी ३ दिवसांचा आणि ७ भाषांमध्ये ‘तिरहोत्साही महोत्सव लिटरेचर फेस्टिव्हल’ म्हणून आयोजित करतो. जे लोक काव्यवाचन करतात, त्यांच्या समांंतर आम्ही कार्यक्रम आयोजित करून नवीन उगवत्या कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देतो. जे हिंदू त्यांच्या नावाला उपनाव उर्दू लावत होते, त्यांना आमच्या व्यासपिठावर निमंत्रित करत नाही, उदा. मनोज मुंतशिर आहे. आमच्या शहरातील प्रसिद्ध कवी प्रल्हाद नारायण खन्ना यांनीही त्यांचे नाव ‘खन्ना मुझफ्फरपुरी’, असे केले होते. त्यामुळे लोकांनी त्यांना बहिष्कृत केले. आम्ही राष्ट्रवादी विचारसरणीच्या साहितिकांना प्रोत्साहन देतो, तसेच त्यांनी संकलन केलेल्या साहित्याला प्रसिद्धी देतो.
८. पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये साहाय्य
पाटलीपुत्र (पाटणा) येथे बागेश्वर धाम महाराजांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. पाटलीपुत्र प्रशासनाने त्यांना सभेसाठी जागा उपलब्ध करून दिली नव्हती. त्यामुळे तेथील हिंदु समाजाने हा कार्यक्रम करण्याचा संकल्प केला. नौबतपूर येथील तरेत पाली मठाने त्यांची भूमी प्रवचनासाठी दिली. गावातील अन्य शेतकर्यांनी त्यांचे शेत रिकामे करून देण्याची सिद्धता दर्शवली. खरे तर त्या भूमीत पीक आले होते. गहू पिकायला आला होता आणि मका तर अजून हिरवाच होता. असे असतांनाही शेतकर्यांनी त्यांची दीड सहस्र एकर भूमीवरील हिरवे पीक कापून भूमी सिद्ध केली. तेथे भारतातून प्रतिदिन १ लाख लोक उपस्थित रहात होते. शेवटी तेथे एवढी गर्दी होऊ लागली की, सर्व भक्तांना त्यांचे तिकीट रहीत करून घरीच दूरचित्रवाहिनीवर प्रवचनाचा लाभ घेण्याची विनंती करावी लागली. या आयोजनात आमची ‘समन्वय समिती’ होती. या समितीमध्ये आम्ही आणखी काही समित्यांना जोडून घेतले होते. आम्ही १ कोटी रुपये आणि तत्सम किमती साहित्य जमवून प्रवचनासाठी व्यवस्था केली. त्या प्रवचनाचे आयोजन आम्ही बिहारी जनतेने यशस्वी करून दाखवले. जेव्हा दूरचित्रवाहिन्यांच्या लोकांनी आम्हाला विचारले की, ‘‘तुम्ही लोक हे सर्व कशासाठी करत आहात ? हे कार्य पाहून जणू सरकारच हे करत असल्यासारखे वाटते.’’ आम्ही म्हटले, ‘‘आम्ही संपूर्ण हिंदु आहोत, तर सरकारी लोक अपूर्ण हिंदु आहेत.’’
– आचार्य चंद्रकिशोर पराशर, संयोजक, भारतीय सांस्कृतिक संघटन समिती, बिहार.
आचार्य चंद्रकिशोर पराशर यांचा परिचय
बिहार येथील आचार्य चंद्रकिशोर पराशर ‘आंतरराष्ट्रीय सनातन हिंदू वाहिनी’चे संस्थापक आहेत. या संघटनेच्या माध्यमातून ते हिंदूसंघटन आणि हिंदु धर्मावर होणारे आघात थांबवण्याचे कार्य करतात. मुझफ्फरपूरमध्ये त्यांनी सर्व हिंदूंच्या संघटनासाठी ‘भारतीय सांस्कृतिक संघटन समिती’ या नावाने समन्वय समिती चालू केली. ते प्रत्येक मासात त्याची बैठक घेऊन कार्याची दिशा निश्चित करतात, उदा. अवैध पशूवधगृहे बंद करणे; कॉन्व्हेेंट शाळांमध्ये जो हिंदूंच्या सण-उत्सवांना विरोध होतो, त्याविषयी वैध मार्गाने आंदोलन करणे, असे सर्व कार्य ते करत आहेत.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात