काठमांडू – नेपाळमध्ये राजेशाही आणि हिंदु राष्ट्र यांची पुनर्स्थापना करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. राजेशाही पुनर्स्थापित करण्याची मागणी करत शेकडो आंदोलक काठमांडूच्या रस्त्यावर उतरले. या वेळी आंदोलक आणि पोलीस यांची झटापट झाली. आंदोलकांना मागे ढकलण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
वर्ष २००८ मध्ये राजा ज्ञानेंद्र यांना सत्तेवरून हटवण्यात आले होते. त्यांच्या समर्थकांनी पंतप्रधानांचे कार्यालय आणि इतर प्रमुख सरकारी विभाग यांठिकाणी मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. राजे ज्ञानेंद्र यांचे मुख्य समर्थक असणारा राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने या मोर्चाचे आयोजन केले होते. या वेळी आंदोलकांनी ‘राजेशाही परत आणा, प्रजासत्ताक रहित करा’ अशा घोषणा दिल्या. आंदोलकांनी दावा केला, ‘आम्हाला आमचा राजा आणि देश प्राणापेक्षा अधिक प्रिय आहे.’
स्रोत: दैनिक सनातन प्रभात