Menu Close

श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे पुन्हा संवर्धन करण्यापूर्वी त्याचे दायित्व निश्‍चित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी

मागील रासायनिक संवर्धनाच्या वेळी मूर्तीला हानी पोचवणार्‍यांवर गुन्हे नोंद करा !

कोल्हापूर (महाराष्ट्र) : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर अनेकदा रासायनिक संवर्धन करण्यात आले आहे. या संवर्धनामुळे मूर्तीची स्थिती गंभीर होत आहे. असे असतांना आता पुन्हा एकदा १४ आणि १५ एप्रिल या दिवशी भारतीय पुरातत्व विभागाकडून श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे संवर्धन केले जाणार आहे. या संवर्धनामुळे मूर्तीची हानी झाली, तर त्याचे नेमके दायित्व निश्‍चित करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी एकत्र आलेले महाराष्ट्र मंदिर महासंघ, अखिल भारत हिंदू महासभा, अंबाबाई भक्त समिती, हिंदु जनजागृती समितीचे पदाधिकारी आणि श्री एकमुखी दत्त मंदिराचे पदाधिकारी !

हेे निवेदन जिल्हाधिकारी तथा पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी स्वीकारले. या प्रसंगी श्री एकमुखी दत्त मंदिराचे मठाधिपती श्री. संतोष गोसावी महाराज, अखिल भारत हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे, अंबाबाई भक्त समितीचे श्री. प्रमोद सावंत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे आणि श्री. शिवानंद स्वामी हे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,

१. यापूर्वी वर्ष २०१५ पासून अनेकदा करण्यात आलेल्या संवर्धनातून काहीही साध्य झाले नसतांना आता पुन्हा मूर्तीचे संवर्धन केले जाणार आहे. वर्ष २०१५ मध्ये झालेल्या संवर्धनामुळे मूर्तीवर गंभीर परिणाम झाले आहेत, असा स्पष्ट अहवाल आहे. त्यामुळे आता जे संवर्धन होणार आहे, त्या संवर्धानामुळे मूर्तीची हानी झाली, तर त्याचे नेमके दायित्व निश्‍चित करणे आवश्यक आहे. हे दायित्व निश्‍चित होत नाही, तोपर्यंत संवर्धनास स्थगिती देण्यात यावी.

श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या मुखाच्या उजवीकडील भागावर नाकापासून गालापर्यंत गेलेला तडा आणि झालेली झीज
श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या चरणांची झालेली झीज

२. यापूर्वी ज्यांच्यामुळे मूर्तीची हानी झाली, त्या सर्व संबंधितांवर गुन्हे नोंद करावेत, तसेच मूर्तीचे सूत्र हे धार्मिक सूत्र असल्याने त्या संदर्भात  संत, धर्माचार्य, शंकराचार्यांचे विविध पीठ आदींचे मार्गदर्शन घ्यावे.

(ही छायाचित्रे देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक)

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक –

https://drive.google.com/file/d/10E1jyP9SePvjOEjMZstne0afPz25vlp_/view

मंदिर महासंघाने उपस्थित केलेला प्रश्‍न

हिंदु जनजागृती समितीने मोठ्या प्रमाणात विरोध केल्यानंतरही वर्ष २०१५ मध्ये श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे रासायिक संवर्धन करण्यात आले. पुरातत्व विभागाने केलेल्या रासायनिक प्रक्रियेतील फोलपणा वर्ष २०१७ मध्येच दिसण्यास प्रारंभ झाला आणि मूर्तीवर पांढरे डाग दिसू लागले. त्या वेळीही परत एकदा रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. नुकतेच पुरातत्व विभागाचे निवृत्त अधिकारी आर्.एस्. त्र्यंबके आणि विलास मांगीराज यांनी मूर्तीच्या संदर्भात न्यायालयात सादर केलेल्या अहवालात श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या गळ्याखालच्या भागांची झीज झाली असून ती झीज २०१५ या वर्षी झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची आहे, असे नमूद केले आहे. वर्ष २०१५ मध्ये जेव्हा रासायनिक संवर्धन करण्यात आले, तेव्हा मूर्तीच्या रासायनिक संवर्धनानंतर मूर्तीच्या स्थितीस प्रक्रिया करणारे पुरातत्व विभाग सर्वस्वी उत्तरदायी असेल, असे माननीय जिल्हाधिकार्‍यांनी त्या वेळी सांगितले. असे असतांना ९ वर्षानंतरही मूर्तीच्या स्थितीस जे उत्तरदायी आहेत, त्यांच्यावर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही ?, असेही मंदिर महासंघाने विचारले आहे.

हे ही वाचा – केंद्रीय पुरातत्व विभागाकडून पुन्हा एकदा श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे अशास्त्रीय पद्धतीने संवर्धन करण्याचे निश्‍चित !

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *