Menu Close

सनातन संस्थेला गोवण्याचे शहरी नक्षलवाद्यांचे प्रयत्न विफल !

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या निकालावर सनातन संस्थेची मुंबई येथे पत्रकार परिषद !

पत्रकार परिषदेत (डावीकडून) अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, श्री. चेतन राजहंस, श्री. रमेश शिंदे, श्री. सतीश कोचरेकर

मुंबई – १० मे या दिवशी डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे साधक श्री. विक्रम भावे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हिंदू आतंकवादाला प्रस्थापित करण्यासाठीच या प्रकरणी सनातन संस्थेला नाहक गोवण्यात आले होते, हे न्यायालयाच्या या निकालातून स्पष्ट झाले असून दाभोलकर परिवार आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा हात असल्याचे विधान करून हत्येच्या तपासाची दिशा भरकटवण्याचे काम केले होते. ज्यामुळे सीबीआयची चौकशी पूर्ण झाल्यानंतरही न्याय मिळण्यासाठी ११ वर्षांचा कालावधी लागला, असे सूत्र सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेला संबोधित करतांना केले.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

मुंबईतील मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. राजहंस यांच्यासोबत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता घनश्याम उपाध्याय आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश कोचरेकर व्यासपिठावर उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांच्या प्रश्नांना सर्वश्री चेतन राजहंस, रमेश शिंदे आणि अधिवक्ता घनश्याम उपाध्याय यांनी उत्तरे दिली.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा संपूर्ण भारतातील पहिला खटला आहे, ज्यामध्ये गुन्हे अन्वेषण विभागाने तपास पूर्ण केल्यानांतरही निकाल देण्यास ८ वर्षांचा कालावधी लोटला. हत्येचा प्रमुख सूत्रधार अद्याप पकडला गेला नाही, हे एकच सूत्र दाभोलकर परिवाराने या प्रकरणी पुढे केले. डॉ. तावडे, विक्रम भावे आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना जाणूनबुजून यामध्ये गोवण्यात आले आणि आज निकालही तसाच आला. तत्कालीन सरकार, तपास अधिकारी यांनी सनातनला गोवून हिंदुत्ववाद्यांना अपकीर्त करण्याचे षड्यंत्र रचले होते, जे विफल ठरले. या प्रकरणी ज्यांना शिक्षा झाली, त्या निकालाविषयी आम्ही वरील न्यायालयात दाद मागू. आम्हाला विश्वास आहे की, भविष्यात त्यांचीही निर्दोष मुक्तता होईल. – अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, उच्च आणि सर्वोच्च न्यायालय

भगवा आतंकवाद बिंबवण्यासाठीच तपासाची दिशा भरकटवली ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था.

श्री. राजहंस पुढे म्हणाले की, वर्ष २००८ ते २०१४ या राज्यातील काँग्रेसच्या राजवटीत भगव्या आतंकवादाचे षड्यंत्र राबवण्यात आले. वर्ष २०१४ च्या निवडणुकीत सत्तापालट होऊ द्यायचा नसेल, तर भगवा आतंकवाद लोकांच्या मनावर बिंबवायला हवा, असा त्यांचा प्रयत्न चालू होता. त्यासाठीच या प्रकरणाची दिशा भरकटवली गेली. डॉ. दाभोलकरांची हत्या ज्या दिवशी झाली, त्याच दिवशी खंडेलवाल आणि नागोरी या २ कुख्यात गुंडांना मुंब्रा अन् कोपरखैरणे येथून खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या बंदुकीतूनच दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यात आल्याचे फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातून सिद्ध झाले होते. त्यांची अधिक तपासणी केल्यानांतर गोव्यातून मंगेश चौधरी आणि रुसूल अन्सारी या दोघांना अटक करण्यात आली. रसूल अन्सारी याला अटक केल्यानांतर पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेले हिंदु आतंकवादाचे षड्यंत्र उघड झाले. सीबीआयने या सर्वांना ‘क्लीन चिट’ देऊन खंडेलवाल आणि नागोरी यांना सोडण्यात आले. त्यानंतर या प्रकरणात सनातन संस्थेला गोवण्याचे प्रयत्न चालू झाले.

श्री. राजहंस पुढे म्हणाले की, सनातनच्या सोळाशे साधकांच्या परिवारांच्या आणि हितचिंतकांच्या चौकशा करण्यात आल्या. सनातनच्या आश्रमांवर धाडी घालण्यात आल्या. सनातनच्या आर्थिक खात्यांची चौकशी करण्यात आली. या प्रकरणात सनातनचे साधक श्री. विक्रम भावे यांच्यावर खोटा आरोप करून त्यांना अकारण २ वर्षे कारागृहात डांबण्यात आले. डॉ. तावडे यांना अटक केल्यानंतर दाभोलकर परिवाराने ‘डॉ. तावडे हेच दाभोलकर हत्येचे प्रमुख सूत्रधार’ असल्याचे सांगायला आरंभ केला. त्यांनी सनातनचे साधक सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी दाभोलकरांची हत्या केल्याची दवंडी पिटवली. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सनातन संस्थेचे अकोलकर आणि पवार यांची मारेकरी म्हणून भित्तीपत्रके लावून सनातन संस्थेची अपकीर्ती केली. आरंभी खंडेलवाल आणि नागोरी अन् नंतर सनातनच्या विविध साधकांना यामध्ये गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी ‘सनातनचा गट’ कार्यरत असून राज्यात आतंकवादी कारवाया करू पाहत असल्याचे चित्र निर्माण करून युएपीए (बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा) लावण्यात आला; परंतु न्यायालयाने आज हा कायदा रहित ठरवला.

सूत्रधार मोकाट; तर डॉ. तावडे यांना या खटल्यात का गोवले ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा येण्यापूर्वी त्याच्या मसुद्याचा अभ्यास करून त्यातील जाचक कलमे कशी न्यून करता येतील, याविषयीचा अभ्यास करत होते. डॉ. दाभोलकर हत्येच्या प्रकरणी त्यांना अटक केल्यानंतर दाभोलकर परिवाराने डॉ. तावडे हेच दाभोलकरांच्या हत्येमागील प्रमुख सूत्रधार असल्याचे सर्वांना सांगितले. आज ११ वर्र्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर हेच दाभोलकर कुटुंबीय दाभोलकर हत्येचे प्रमुख सूत्रधार मोकाट असल्याचे सांगत आहेत. त्यासाठी ही मंडळी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही याविषयी गुन्हे अन्वेषण विभागाला विचारले असता त्यांना चौकशी पूर्ण झाल्याचेच सांगितले आहे. दाभोलकर परिवाराच्या म्हणण्यानुसार प्रमुख सूत्रधार जर अद्याप बाहेरच आहेत, तर डॉ. तावडे यांना या प्रकरणी का गोवण्यात आले ? डॉ. तावडे यांना या प्रकरणात गोवण्यात आले, तेव्हा जो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार न्यायालयात वर्ष २०१६ मध्ये सादर करण्यात आला, त्या संजय साडविलकरांवर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात ६०० किलो चांदीचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. हा घोटाळा हिंदु जनजागृती समितीने वर्ष २०१५ मध्ये उघड केला होता. त्यामुळे या ठिकाणी संशयाला वाव आहे.

रमेश शिंदे पुढे म्हणाले की, अधिवक्ता पुनाळेकर यांच्यावर शस्त्र नष्ट करण्याचा आदेश दिल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. हे शस्त्र शोधण्यासाठी नॉर्वेतील ज्या आस्थापनाला कंत्राट दिले होते, त्या आस्थापनाने ३ मास शोध घेऊन समुद्राच्या तळातून एक ‘एअरगन’ बाहेर काढली. डॉ. दाभोलकर यांच्यावर झाडण्यात आलेली गोळी या ‘एअरगन’मधून झाडलेली नव्हती, हेही पुढे सिद्ध झाले. त्यामुळे हा सर्व खर्च वाया गेला. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांना न्यायालयीन साहाय्य करणारे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना नाहक गोवण्यात आले होते, हेच यातून सिद्ध होते. विक्रम भावे यांनी मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाची सत्यता एका पुस्तकाच्या माध्यमातून समोर आणली होती. याशिवाय ते अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना त्यांच्या कामात साहाय्य करत होते. त्यांच्यावर दाभोलकर हत्येपूर्वी तेथील जागेची रेकी केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्यांनी ज्या वेळी रेकी केली, त्या वेळी त्यांच्या भ्रमणध्वनीचे ‘लोकेशन’ (ठिकाण) त्या ठिकाणचे असायला हवे; मात्र ते तसे नव्हते.

…यापेक्षा पोलिसांचा श्वान प्रामाणिक !

काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येची घटना समजल्यानंतर काही मिनिटांतच ‘हत्येमध्ये गोडसे प्रवृत्तीचा हात’, असे विधान केले आणि तेथूनच खोटारडेपणाला प्रारंभ झाला. ‘मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना हत्येमध्ये कुणाचा हात आहे, हे कसे समजले ? पोलिसांनी त्यांची चौकशी केली का ?’, असे प्रश्न उपस्थित होतात आणि हत्येचे षड्यंत्र रचले जाऊन ‘हत्येनंतर काय बोलायचे ?’, हे आधीच ठरवण्यात आले होते का ? अशी शंका वर्ष २०१३ मध्ये यायची; पण ती शंका नसून ते सत्य होते, असे वाटत आहे. हत्येच्या दिवशी पोलिसांच्या श्वानपथकातील श्वानाने डॉ. दाभोलकर यांच्या चपलेचा वास घेतल्यावर तो डॉ. दाभोलकर रहात असलेल्या घराच्या दिशेने जाण्याऐवजी ‘बालगंधर्व नाट्यगृहा’च्या दिशेने गेला. याचा अर्थ काय ? डॉ. दाभोलकर घरून चालत न येता ‘बालगंधर्व नाट्यगृहा’कडून आले होते का ? कि आणखी काही कारण होते, या दिशेने अन्वेषणच झाले नाही. ही गोष्ट पुष्कळ काही सांगून जाते. अंनिस किंवा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याप्रमाणे पोलिसांचा श्वान पूर्वग्रहदूषित नव्हता, तर प्रामाणिक होता. – एक धर्मप्रेमी

साधक अंनिसला केवळ वैचारिक विरोध करत होते. त्यांनी त्यांचे घोटाळे बाहेर काढले होते. यासाठी त्यांना नाहक कारावास भोगावा लागला. पुरोगामी, साम्यवादी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आणि भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी तपासयंत्रणांचे षड्यंत्र न्यायालयाच्या निर्णयामुळे उद्ध्वस्त झाले, हे या निकालातून लक्षात येते !

पुराव्यांअभावी निर्दाेष मुक्तता होणार, हे निश्चित होते ! – विक्रम भावे, सनातन संस्था

श्री. विक्रम भावे

न्यायालयाने आज माझी निर्दाेष मुक्तता केली. माझ्या दृष्टीने अपेक्षितच निकाल होता. मला अटक करतांना चुकीच्या पद्धतीने केली होती. माझ्या विरोधात कोणतेही पुरावे नव्हते. त्यामुळे न्यायालयासमोर कोणते पुरावे आले नाहीत. निर्दाेष मुक्तता होणार, हे निश्चित होते. आज ती प्रत्यक्षात झाली, माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे.

मला अटक करतांनाच सीबीआयच्या अधिकार्‍याने मला सांगितले की, अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या विरोधात जर मी साक्ष द्यायला सिद्ध असेन, तरच ते मला सोडणार होते. अन्यथा ते मला अटक करणार होते; पण मी खोटी साक्ष द्यायला नकार दिल्याने या प्रकरणात त्यांनी मला अटक केली आणि रेकी केल्याचा आरोप त्यांनी माझ्यावर ठेवला; परंतु त्या दृष्टीने आजपर्यंत कोणताही पुरावा ते आणू शकले नाहीत. कित्येक वेळा ते शपथेवर असत्य बोलत राहिले की, माझ्या विरोधात पुरावे आहेत आणि माझ्या जामिनाला विरोध करत राहिले. प्रत्यक्षात जे असत्य होते, ते समोर आले आहे. एकही पुरावा माझ्याविरोधात समोर आला नाही.

माझ्या वडिलांचे निधन झालेले असतांनाही त्यांच्या अंत्यविधीसाठी जाण्याची अधिकार्‍यांनी अनुमती दिली नाही. मला उच्च न्यायालयाने जामीन देतांना अशी अट घातली होती की, हा खटला संपेपर्यंत मी पुणे जिल्ह्याच्या बाहेर जाऊ नये. माझे वडील गावी असतांनाच त्यांचे निधन झाले. मी एकुलता एक मुलगा असूनही मला त्यांच्या अंत्यविधीसाठी जाता आले नाही. मी त्यासाठी न्यायलयात अर्ज  केला; परंतु त्याला अनुमती मिळायलाच तीन आठवडे लागले. त्यानंतर मी अन्य दिवसांचे विधी करू शकलो. यामध्ये पोलिसांनी जाणूनबुजून विलंब केला, असे म्हणता येणार नाही; कारण ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. यामध्ये अर्ज  दिल्यावर क्रमांक लागणे, त्यावर युक्तीवाद होणे असे आहे. हे सगळे होण्यात तेवढा वेळ गेला. अन्यथा ते लवकर होऊ शकले असते, असे मला वाटते.


मुख्यमंत्री,एकनाथ शिंदे

दाभोलकर हत्या प्रकरणात जे आरोपी होते, त्यांना शिक्षा झाली आहे. मी न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करतो. यापुढे दाभोलकर कुटुंबियांना जे काही साहाय्य लागेल, ते शासन देईल, अशी मी ग्वाही देतो.

– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘धर्मो रक्षति रक्षितः ।’प्रमाणे दोघांचे निर्दोषत्व उच्च न्यायालयात सिद्ध होईलच ! – अधिवक्ता कृष्णमूर्ती, मडिकेरी, कर्नाटक

अधिवक्ता कृष्णमूर्ती

दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल पहाता न्यायालयावर काही तरी दबाव आहे, असे वाटत आहे. ३ आरोपींची सुटका केल्याचे मी स्वागत करतो; कारण या प्रकरणातील आरोपपत्र मी पाहिले आहे. ५ आरोपी या प्रकरणात गुंतल्याचा त्यात कोणताही पुरावा नाही. या प्रकरणी काही झाले, तरी न्यायालयात विजय निश्चित आहे. ‘धर्मो रक्षति रक्षितः ।’प्रमाणे यावर विश्वास ठेवूनच या दोघांचे निर्दोषत्व उच्च न्यायालयात सिद्ध होईलच, अशी आशा करत आहे. न्याय, सत्य आणि धर्म नेहमी विजयी होतो. न्यायालयाचा निर्णय हा सीबीआयला चपराक आहे.

दाभोलकर यांच्याहत्येच्या वेळेचे गूढ !

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या कधी झाली, हे एक मोठे गूढ आहे. प्रथमदर्शी अहवालात मृत्यूची वेळ वेगळीच आहे, तसेच डॉ. दाभोलकर यांच्या हत्येची नेमकी वेळ दर्शवणारा एकही वैद्यकीय अहवाल सरकारी पक्षाने सादर केलेला नाही. काही साक्षीदार ‘डॉ. दाभोलकर यांना घायाळ अवस्थेत पाहिले’, तर काही ‘त्यांना गोळी लागली होती’, असे सांगतात, पोलीस ‘त्यांना मृत अवस्थेत पाहिले’, असे म्हणतात ! डॉ. दाभोलकर हे आदल्या रात्री कुठे होते ? आणि ते हत्येच्या ठिकाणी कसे आले ? हेही सरकारी पक्षाने सिद्ध केले नाही. त्यामुळे ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या आणि हत्येची नेमकी वेळ कोणती ?’ हे एक मोठे गूढ आहे.

(आरोपींच्या अधिवक्त्यांनी केलेल्या युक्तीवादावरून)

संशयितांच्या वतीने खटला लढवणारे अधिवक्ते !

मुंबई उच्च न्यायालयाचे धडाडीचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर आणि अधिवक्त्या सुवर्णा वत्स-आव्हाड यांनी संशयितांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली. अन्वेषण यंत्रणांनी खोटे पुरावे आणि साक्षीदार उभे करून आरोपींचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा जणू कट रचला होता; मात्र अभ्यासपूर्ण आणि परखडपणे प्रतिवाद करून या सर्वच रणझुंजार अधिवक्त्यांनी लढा दिला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *