-
अभिषेक मुरुकटे यांनी मागवलेल्या माहितीच्या अधिकारातून उत्पादन शुल्क विभागाची निष्क्रीयता उघड !
-
उत्पादन शुल्क विभागाकडून नामांतर शक्य नसल्याचा कांगावा करत शासन आदेश रहित करण्याची मागणी !
बार-मद्यालये यांना अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांची नावे असती, तर उत्पादन शुल्क विभागाने असेच उत्तर दिले असते का ? -संपादक
मुंबई : मुंबईसह उपनगरांतील ६५ टक्के बार-मद्यालयांना देवतांची नावे आहेत. यामध्ये ‘श्रीकृष्णा बार अँड रेस्टॉरंट’, ‘दुर्गा रेस्टॉरंट अँड बार’, ‘सिद्धिविनायक बार अँड रेस्टॉरंट’, ‘गणेश बिअर शॉपी’, ‘महालक्ष्मी वाईन्स’ आदी देवतांच्या नावांचा समावेश आहे. यासह बार-मद्यालये यांना संत आणि ऐतिहासिक गड-दुर्ग यांचाही नावे आहेत; मात्र अशा नावांमध्ये पालट करणे शक्य नसल्याचा कांगावा करत उत्पादन शुल्क विभागाने याविषयीचा शासन आदेश रहित करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाचे समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत मागवलेल्या माहितीतून हा प्रकार उघड झाला आहे.
मद्यालये यांना देवता, राष्ट्रपुरुष आणि महनीय व्यक्ती यांची नावे असल्यास त्यांमध्ये पालट करावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने ७ एप्रिल २०२२ या दिवशी शासन आदेश काढला आहे. या शासन आदेशानुसार मुंबईतील किती मद्यालये-बार यांच्या नावांमध्ये पालट करण्यात आला ? याची माहिती श्री. अभिषेक मुरुकटे यांनी राज्य उत्पादन शुल्क आयुक्तालयाला विचारली होती. त्यावर दिलेल्या माहितीमध्ये उत्पादन शुल्क विभागाने मुंबई आणि उपनगरे यांमध्ये असलेली सर्व मद्यालये अन् बिअर बार यांच्या नावांची सूची दिली आहे. यामध्ये असलेल्या एकूण ३१८ बार आणि मद्यालयांमध्ये तब्बल २०८ बार अन् मद्यालये यांना देवतांची नावे असल्याचे आढळून आले आहे.
श्री. अभिषेक मुरुकटे यांनी राज्य उत्पादन शुल्क आयुक्तालयाला विचारलेली माहिती आणि त्यावर उत्पादन शुल्क विभागाने दिलेली मुंबई आणि उपनगरे यांमध्ये असलेली सर्व मद्यालये अन् बिअर बार यांच्या नावांची सूची –
https://drive.google.com/file/d/17wG0j6gYa_cpcEZlFEe4AGegFxlbpbmq/view
(म्हणे) ‘जाणीवपूर्वक धार्मिक नावे देण्यात आलेली नाहीत !’ – उत्पादन शुल्क विभाग
बार-मद्यालये यांना देण्यात आलेली नावे अप्रत्यक्षरित्या देवता, राष्ट्रपुरुष, महनीय व्यक्ती, गड-दुर्ग यांच्याची साधर्म्य असणारी असली, तरी ही नावे जाणीवपूर्वक किंवा धार्मिक हेतूने देण्यात आलेली नाहीत. ही नावे त्यांचे कौटुंबिक सदस्य, पूर्वज, वंशज आदींची आहेत. बार-मद्यालये यांच्या अनुज्ञप्तीसाठी अनेक आस्थापने, आयकर विभाग, मुंबई महानगरपालिका, अन्न आणि औषध प्रशासन, अधिकोष, ट्रेडमार्क कायद्याच्या अंतर्गत नोंदणीकृत विविध प्राधिकरणे यांच्यासमवेत पत्रव्यवहार करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या नावात पालट करणे अल्प कालावधीत शक्य नाही. त्यामुळे याविषयीचा शासन आदेश रहित करावा आणि यापुढे नावे देतांना आवश्यक सुधारणा करावी, अशी विनंती आम्ही सरकारकडे केली आहे, असे उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
देवता, राष्ट्रपुरुष आणि महनीय व्यक्ती यांची नावे असलेल्या बार-मद्यालयांची नावे पालटण्यासाठी सरकारकडून ६ मासांचा कालावधी देण्यात आला होता; मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या वरील उत्तरातून २ वर्षांनंतरही त्यावर कार्यवाही होऊ शकली नाही ? हे उघड होते.
सरकारने उत्पादन शुल्क विभागाला कार्यवाहीचा आदेश द्यावा ! – अभिषेक मुरुकटे, समन्वयक, सुराज्य अभियान, हिंदु जनजागृती समिती
‘वेळ लागेल; म्हणून कार्यवाही करता येणार नाही’, हा उत्पादन शुल्क विभागाचा कामचुकारपणा आहे. कुणी कितीही काहीही म्हटले, तरी ‘सिद्धिविनायक’, ‘श्री दुर्गादेवी’, ‘श्रीकृष्ण’, ‘श्रीराम’ ही हिंदूंच्या देवतांची नावे आहेत आणि या देवतांच्या नावावरूनच व्यक्तींना नावे देण्यात येतात. समाजात ही नावे संबंधित व्यक्तीची म्हणून पाहिली जात नाहीत, तर हिंदूंच्या देवतांची म्हणून पाहिली जातात. बार-मद्यालये यांना नावे देण्यासाठी अन्य अनेक नावे आहेत. त्यासाठी देवतांच्या नावांचा वापर करण्याची काहीही आवश्यकता नाही. हा हिंदूंच्या धार्मिक भावनांचा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने उत्पादन शुल्क विभागाची मागणी मान्य न करता ठराविक समयमर्यादा देऊन बार-मद्यालये यांना असलेल्या देवतांच्या नावात पालट करण्याची कार्यवाही करण्यास सांगावे. ज्या अधिकार्यांनी या आदेशाकडे दुर्लक्ष केले, त्यांना जेवढे महिने कार्यवाहीला विलंब झाला, तेवढ्या पुढील महिन्यांचे अर्धेच वेतन द्यावे.