भुसावळ (जिल्हा जळगाव) : शहरातील मुख्य बाजारपेठ चौकात हिंदूंचे प्रेरणास्थान आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा त्वरित उभारण्यात यावा, या मागणीसाठी २ जून या दिवशी हिंदूंच्या विराट मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेले १९ हून अधिक वर्षे हा पुतळा उभारण्यासाठी राज्यकर्त्यांनी दाखवलेल्या अक्षम्य अनास्थेमुळे या प्रकल्पासाठी २ वेळा भूमीपूजन होऊनही त्याचे काम रखडले होते. या संदर्भात जागृत हिंदूंनी ढिम्म प्रशासनाला जाग आणण्यासाठी विराट मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. पद, पक्ष, संप्रदाय विसरून एक हिंदु आणि छत्रपती शिवरायांचा भक्त म्हणून या विराट मोर्च्यात बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. ३१ मे या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी धर्माभिमानी श्री. विलास चौधरी, जय श्रीराम ग्रुपचे अध्यक्ष श्री. विकास साबळे, हिंदुत्ववादी अधिवक्ता श्री. मनीष वर्मा उपस्थित होते. जामनेर रस्त्यावरील श्री अष्टभुजा माता मंदिरापासून नगरपालिकेपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
श्री. घनवट पुढे म्हणाले, “छत्रपति शिवरायांचे युद्धकौशल्य आज आंतरराष्ट्रीय स्तरावर शिकवले जात असतांना शिवरायांच्या महाराष्ट्रातच त्यांची उपेक्षा होणे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवरायांनी शिकवण दिलेल्या क्षात्रतेजाचे आज सर्वत्र जागरण होणे आवश्यक आहे. साधा पुतळा बसवण्यासही २ दशके कालावधी लावणे, हे भारतियांना षंढ बनवण्याचे छुपे षड्यंत्र आहे. हे षड्यंत्र उधळून लावण्यासाठी, तसेच राष्ट्रीय अस्मिता जागृत ठेवण्यासाठी राष्ट्रपुरुष, तसेच क्रांतीवीरांचे असे पुतळे सर्वत्र उभे व्हायला हवेत.”
व्यापक स्तरावर प्रसार
या मोर्च्यासाठी गावागावांमधून धर्माभिमानी ग्रामस्थांच्या बैठका घेण्यात येत असून घरोघरी प्रसार करण्यात येत आहे. शहरात मोक्याच्या जागी फलक (होर्डिंग्ज) लावण्यात आलेले असून सामाजिक प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनही व्यापक स्तरावर प्रसार चालू आहे.
भुसावळ (जिल्हा जळगाव) येथे पत्रकार परिषदेतील प्रश्नोत्तरे
प्रश्न १ : २ महिन्यांनी भुसावळ येथे नगरपालिकेची निवडणूक आहे, तर त्या निवडणुकीच्या दृष्टीने तुम्ही हा विषय निवडला आहे का ?
श्री. सुनील घनवट : नगरपालिकेच्या निवडणुकीचा या विषयाशी काही संबंध नाही. आमच्या दृष्टीने गेली १९ वर्षे प्रलंबित असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथे उभा रहाणे महत्त्वाचे आहे.
प्रश्न २ : जर पुढे हे काम लगेच पूर्ण झाले नाही, तर तुमचे पुढचे धोरण काय असणार ?
श्री. सुनील घनवट : जर हा विषय पुढेही प्रलंबित राहील, तर आता भुसावळमध्ये या विषयावर आंदोलन करतो आहे. पुढे राज्यभर या विषयावर आंदोलन करण्यात येईल.
क्षणचित्र : या पत्रकार परिषदेला गुप्तचर विभागाचा (आयबी) प्रतिनिधीसुद्धा उपस्थित होता.
भुसावळ येथे मोर्चा
दिनांक – २ जून २०१६
वेळ – सकाळी ९.३०
स्थळ – श्री अष्टभुजा माता मंदिर
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात