सातारा : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त येथील हिंदु महासभेच्या वतीने सावरकर भक्तांचा मेळावा घेण्यात आला. हा मेळावा छत्रपती प्रतापसिंह उद्यानातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात उत्साहात पार पडला.
या वेळी हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद गांधी, जिल्हाध्यक्ष श्री. दत्ता सणस, कार्यकारणी सदस्य श्री. उमेश गांधी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश निकम, सनातन संस्थेच्या सौ. माधुरी दीक्षित, सावरकर साहित्याचे ज्येष्ठ विचारवंत श्री. गिरीश बक्षी, ज्येष्ठ लेखक श्री. जगन्नाथ शिंदे आदी मान्यवर आणि समाजातील अनेक ज्येष्ठ सावरकर भक्त आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
मान्यवरांच्या शुभहस्ते स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि कयपंजीने दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. ज्येष्ठ विचारवंत श्री. गिरीश बक्षी आणि ज्येष्ठ लेखक श्री. जगन्नाथ शिंदे यांचे स्वा. सावरकर यांच्याविषयी मार्गदर्शन झाले. या वेळी वाई तालुक्यातील गोवे-दीघर येथील सुपुत्र श्री. मधुकर बाळाजी पिसाळ यांना सहकाररत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील श्री. राजेंद्रकुमार शिंगटे यांना कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. माधुरी प्रकाश दीक्षित यांचाही सत्कार करण्यात आला. सौ. माधुरी दीक्षित यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी सत्कार अर्पण केला.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश निकम यांचा सत्कार !
स्वा. सावरकर यांच्याप्रमाणे राष्ट्रकार्यासाठी झोकून देऊन कार्य करणार्या हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश निकम यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी श्री. मंगेश निकम यांनी कारागृहातील त्यांच्या काही आठवणींना सावरकरांच्या कारागृहातील आठवणींची किनार देत मनोगत व्यक्त केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात