एडिनबर्ग : स्कॉटलंडमधील हेलेन्सबर्ग या शहरातील ३ ते १८ वर्ष वयाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्या प्रख्यात लोमंड शाळेत हिंदु धर्मावर माहिती देणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना हिंदु धर्मातील रूढी, परंपरा, धर्माचा इतिहास आणि तत्त्वे यांची ओळख करून देण्यात आली. तसेच हिंदूंची श्रद्धास्थाने यांची माहिती देण्यात आली.
या कार्यशाळेत सहभाग घेणार्या विद्यार्थ्यांनी हिंदू पोशाख परिधान केले होते आणि ध्यानधारणा करण्याचा प्रयत्न केला. या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांचे जीवन संपूर्णपणे कसे जगावे आणि उत्तम जागतिक नागरिक कसे बनावे याचे शिक्षण देणे, असा होता. या शाळेच्या जगातील अमेरिका, जर्मनी, दक्षिण आफ्रिका आणि चीन या देशांतही शाखा कार्यरत आहेत. श्रीमती जोहाना उर्कहार्त या प्राचार्य असून अलिस्टर होप हे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात