जळगाव : देहलीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये राष्ट्रपुरुषांचा घोर अवमान करणार्या सर्व संबंधितांवर गुन्हा प्रविष्ट करावा तसेच शासनाने हिंदूंच्या धार्मिक प्रथा-परंपरा मोडीत न काढता त्याविषयी धर्माचार्य आणि शंकराचार्य यांचे मार्गदर्शन घेऊन निर्णय घ्यावा या दोन विषयांवर २८ मे या दिवशी महापालिकेसमोर विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रेयस पिसोळकर म्हणाले की, आपल्या राष्ट्रासाठी प्राणांचे बलीदान करणार्या क्रांतीकारकांना या देशात आतंकवादी संबोधले जात आहे आणि दुसरीकडे संसदेवर आक्रमण करणार्यांचे समर्थन केले जाते आहे, हे आपले दुर्दैव आहे. आता मात्र या गोष्टी चालणार नाहीत. या गुन्हेगारांवर गुन्हे प्रविष्ट करण्यात यावेत, अशी आम्हा सर्व हिंदूंची मागणी आहे. हिंदूंच्या प्रथा परंपरांविषयी शासन ढवळाढवळ करून निर्णय घेते; मात्र इतर धर्मियांच्या विषयी त्यांची भूमिका वेगळी असते.
यानंतर जोरदार घोषणा देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे वरील मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. उपस्थित धर्माभिमान्यांनी हातात हस्तफलक, भगवे ध्वज धरून आणि घोषणा देऊन निदर्शने केली. या वेळी जळगाव शहरातील, तसेच ग्रामीण भागांतील काही धर्माभिमानी उपस्थित होते. या दोन विषयांवर स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. अनेकांनी रस्त्यावरून जातांना आंदोलन पाहून थांबून स्वाक्षरी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात