- कोपरखैरणे येथे ‘नवी मुंबई हिंदु ब्रेन्स’ च्या वतीने ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर चर्चासत्र
- हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित होऊन कृतीशील होण्याचा धर्माभिमान्यांचा निर्धार
कोपरखैरणे : १ सहस्र २०० वर्षे विस्थापित राहिलेल्या यहुदींनी स्वतंत्र राष्ट्राचे स्वप्न पाहून इस्रायलच्या रूपाने सत्यात आणले. दुसरीकडे स्वतंत्र होऊन ६० वर्षे होऊनही भारत हिंदु राष्ट्र व्हावे, यासाठी आकांडतांडव करावा लागत आहे. १ सहस्र ४०० वर्षे इस्लाम आणि २०० वर्षे ख्रिस्ती यांचा छळ सोसूनही हिंदू मात्र शांतच राहिले. स्वभाषा, स्वधर्म आणि स्वराष्ट्र यांविषयी नेहमी जागरूक रहायला हवे, असे प्रतिपादन हिंदु महासभेचे श्री. मंगेश म्हात्रे यांनी केले. २९ मे या दिवशी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत येथील सेक्टर १ मधील भारतीय जागरण शाळेत ‘नवी मुंबई हिंदू ब्रेन्स’च्या वतीने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या चर्चासत्रात हिंदु महासभा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री योग वेदांत सेवा समिती, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रौद्रशंभो प्रतिष्ठान, हिंदु जनजागृती समिती आदी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे ४७ धर्माभिमानी हिंदू बांधव सहभागी झाले होते.
हिंदु राष्ट्र हे स्वप्न नसून सत्यात येणारी पहाट आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्येकाने स्वत:च्या कृतीद्वारेच प्रारंभ करायला हवा. यासाठी संघटित होऊन कृतीशील होण्याचा निर्धार ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावरील चर्चासत्रासाठी एकत्रित आलेल्या धर्माभिमानी हिंदूंनी केला. चर्चासत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
या वेळी स्वा. सावरकरांची शौर्यगाथा सांगतांना श्री. मंगेश म्हात्रे म्हणाले, “स्वा. सावरकर हे परिस होते. त्यांनी मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, सेनापती बापट अशा अनेक क्रांतीकारकांना घडवले. हिंदु राष्ट्र ही राजकीय वा सोयीची गोष्ट नाही, ती एक आदर्श जीवनप्रणाली आहे. स्वत:च्या छोट्या-छोट्या कृती आदर्श करून आपले वर्तन आदर्श करायला हवे. धर्मपालनाच्या कृती करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी स्वत: मध्ये तळमळ वाढवूया.”
या वेळी उपस्थित अन्य हिंदुत्ववाद्यांनीही राष्ट्र आणि धर्म यांवरील त्यांचे विचार व्यक्त केले. या चर्चासत्रात इंग्रजाळलेली शिक्षणपद्धती पालटून गुरुकुलपद्धती लवकरात लवकर चालू करण्यात यावी, देशभरात १ लीपासून संस्कृत विषय अनिवार्य करण्यात यावा, शाळा आणि महाविद्यालय यांत हिंदूंचा खरा ज्वलंत इतिहास शिकवण्यात यावा, शाळांतून धर्मशिक्षण चालू करण्यात यावे आदी मागण्या हिंदुत्ववाद्यांनी केल्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात