Menu Close

गोमंतकाला विदेशी नागरिक आणि कॅसिनो यांच्या हातात सोपवून रेप कॅपिटल बनवू नका ! – रणरागिणी शाखा

नायजेरियन नागरिकाने महिलेवर बलात्कार केल्याचे प्रकरण

पणजी : देवभूमी असलेल्या गोमंतकाला केवळ आर्थिक लाभासाठी कॅसिनो आणि विदेशी पर्यटक यांच्या हातात सोपवून रेप कॅपिटल बनवू नका आणि गोमंतकातील भगिनींना पुन्हा अत्याचारित होऊ देऊ नका, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री गडेकर यांनी केले आहे. केवळ मंदिरांच्या गाभार्‍यात प्रवेश करून महिलांच्या समान अधिकारांचा आणि स्वातंत्र्याचा पुरोगाम्यांकडून उदो उदो केला जात असतांना, त्यांच्या शीलरक्षणासाठी मात्र कुणी काही करतांना दिसत नाही. कॅसिनो, मद्य आणि अमली पदार्थ यांच्या सारख्या अनैतिक धंद्यांना जेथे उघड साहाय्य केले जाते, तेथे महिला सुरक्षित कशा राहू शकतील ? तेव्हा गोव्यातील भाजप शासनाने त्वरित कॅसिनो आणि अनधिकृतपणे रहाणारे विदेशी नागरिक यांच्यावर कारवाई करून त्यांना प्रतिबंध करावा, अशा मागणीचे प्रसिद्धीपत्रक हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेने प्रसारित केले आहे.

या पत्रकात पुढे म्हटले आहे, गोव्यातील शासन आणि पोलीस यांच्यात जणू पुरुषार्थच शिल्लक नसल्याने त्यांचा कुणाला धाकच राहिलेला नाही. देहलीचा पत्रकार तरुण तेजपाल गोव्यात येऊन स्वतःच्या मुलीच्या वयाच्या महिला पत्रकारावर बलात्काराचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर जामिनावर सुटून उजळमाथ्याने फिरतो. विदेशी पर्यटक येऊन गोव्यात अमली पदार्थांच्या रेव्ह पार्ट्या करतात, महिलांची छेडछाड करतात, आता तर बलात्कारही करू लागले आहेत. इतकेच काय गोव्यातील पोलीस ठाण्यावर आक्रमण करणारा आमदार आता अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या प्रकरणात गुंतला आहे. मग या सर्व प्रकरणात या गुन्हेगारांवर कठोर कारवाईची अपेक्षा कोणाकडून करावी ?
या घटना गोव्याची प्रतिमा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मलीन करणार्‍या असून राज्यशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पहाणे अत्यावश्यक आहे. केवळ निर्भया निधी घोषित करून चालणार नाही, तर कुणी निर्भया बनू नये, यासाठी प्रयत्न करावा अन्यथा या बलात्कार्‍यांना धडा शिकवण्यासाठी त्यांना रणरागिणींच्या हाती सोपवावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखा करत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *